युसुफनंतर शाहरुख

By Admin | Updated: November 5, 2015 03:16 IST2015-11-05T03:16:49+5:302015-11-05T03:16:49+5:30

हे असे काही पहिल्यांदाच होते आहे, असे नाही. मुसलमान म्हटला की, तो पाकिस्तानप्रेमी आणि म्हणूनच भारतविरोधी असणार अशी भावना वा मिजास हिन्दु धर्माच्या तथाकथित

Shahrukh after Yusuf | युसुफनंतर शाहरुख

युसुफनंतर शाहरुख

हे असे काही पहिल्यांदाच होते आहे, असे नाही. मुसलमान म्हटला की, तो पाकिस्तानप्रेमी आणि म्हणूनच भारतविरोधी असणार अशी भावना वा मिजास हिन्दु धर्माच्या तथाकथित आणि स्वयंघोषित तारणहारांमध्ये ओतप्रोत असते. वरतून हे शहाजोग असेही म्हणणार की आमचा विरोध केवळ पाकधार्जिण्या मुस्लिमांनाच आहे. पण कोण कोणाचा धार्जिणा याचा फैसलादेखील पुन्हा हेच लोक करणार. याच मानसिकतेने बऱ्याच वर्षांपूर्वी श्रेष्ठ सिने कलावंत दिलीपकुमार यास पाकिस्तानी हेर ठरविले होते आणि त्यांचा उल्लेख करताना आवर्जून युसुफखान असे म्हटले होते. आता तसाच प्रकार भाजपाचे एक सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केला आहे. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून संवेदनशील आणि कलासक्त लोक जी खंत व्यक्त करीत आहेत, तशीच खंत आजचा आघाडीचा सिने कलावंत शाहरुख खान यानेही व्यक्त केली. भारतीय लोकशाहीने त्याला तसे करण्याचा हक्क आणि अधिकार दिलाही आहे. पण त्याची ही खंत विजयवर्गीय यांना काही रुचली नाही आणि त्यांनी लगेच शाहरुखचे शरीर हिन्दुस्थानात तर मन पाकिस्तानात असते अशी अत्यंत खोडसाळ प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपाचे पूर्वाश्रमीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि विद्यमान पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लगेच जाहीर कान उपटून विजयवर्गीय यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे खासगी आहे, पक्षाची ती भूमिका नाही, असा खुलासाही केला. हा दुसरा अचरट प्रकार. पक्षाचा सरचिटणीस जे मत व्यक्त करतो, ते जर पक्षाचे मत नसेल तर त्याचे पक्षीय पद काढून घेणे हाच त्यावरील योग्य उपाय ठरु शकतो. जावडेकरांनी जाहीर कानउघाडणी केल्यानंतर आता विजयवर्गीय यांनी नेहमीप्रमाणे आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचा लटका खुलासा करताना आपली प्रतिक्रिया मागे घेतली आहे. हिन्दुस्थान असहिष्णु असता तर अमिताभ बच्चन यांच्या खालोखाल शाहरुखवर देशातील जनतेने प्रेम केले नसते, असेही त्यांनी म्हटले आहे. विजयवर्गीय यांना शाहरुखला जर टोलाच मारायचा होता तर शाहरुखने मध्यंतरी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर जाऊन आपल्या असहनशीलतेचे प्रदर्शन घडविताना जी मारामारी केली व वानखेडे बंदी ओढवून घेतली, तिचा तरी हवाला द्यायचा!

Web Title: Shahrukh after Yusuf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.