शाह यांनी जरा इतिहासही अभ्यासून पाहावा...

By Admin | Updated: August 18, 2016 06:30 IST2016-08-18T06:30:38+5:302016-08-18T06:30:38+5:30

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह त्यांच्या राजकीय क्षमतेसाठी ख्यातकीर्त असले तरी अचाट बोलण्याविषयी आजवर फारसे प्रसिद्ध नव्हते. परंतु स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर उत्तरप्रदेशात काढलेल्या

Shah also looked at a bit of history ... | शाह यांनी जरा इतिहासही अभ्यासून पाहावा...

शाह यांनी जरा इतिहासही अभ्यासून पाहावा...

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह त्यांच्या राजकीय क्षमतेसाठी ख्यातकीर्त असले तरी अचाट बोलण्याविषयी आजवर फारसे प्रसिद्ध नव्हते. परंतु स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर उत्तरप्रदेशात काढलेल्या तिरंगा यात्रेच्या वेळी त्यांनी जे भाषण केले ते त्यांच्याच पक्षातील अनेक अचाटांना चाट पाडणारे होते. राजकारणात, व विशेषत: निवडणुकांचे रणांगण समोर असतानाच्या राजकारणात अमर्याद बोलण्याची उर्मी भल्याभल्यांना येते. मात्र ती त्यांचे राजकारणी असणेच अधोरेखित करते. त्यांच्यातला मुत्सद्दी त्यातून पुढे येत नाही आणि तो त्यांच्यात नसावाच असे त्यांना पाहाणाऱ्यांना वाटू लागते. आपल्या दूरचित्रवाहिन्यांवर चालणाऱ्या वादविवादात परस्परांच्या अंगावर ओरडून बोलणारे पक्षांचे प्रवक्ते पाहिले की ते फक्त प्रचारक आहेत आणि त्यांचा सत्याशी फारसा संबंध नाही हे जसे कळते, तसाच काहीसा हा प्रकार आहे. ‘देशाने गेल्या ७० वर्षांत जराही प्रगती केली नाही. त्यात आज जी थोडीफार प्रगती दिसते ती आताचे आमचे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या दोन वर्षातली आहे’ असे सांगून शाह यांनी बेफाम आणि बेफाट बोलण्यात आपण कोणाच्याही मागे नाही हे साऱ्यांना दाखवून दिले आहे. पं. जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्यलढ्याचे नेतेही होते. घटना समितीतही त्यांची भागीदारी फार मोठी होती. त्यांच्या कारकीर्दीत येथे लोकशाही रुजली आणि संविधान कार्यान्वित झाले. कृषी व औद्योगिक विकासाचा पाया रचला गेला. सुतळीचा तोडाही न होणाऱ्या देशात रेल्वेची इंजिने तयार होऊ लागली आणि अणुशक्ती केंद्राची स्थापनाही झाली. दुष्काळ संपले, आरोग्यसेवा वाढल्या, शिक्षण प्रसारात मोठी वाढ झाली आणि कोणत्याही जागतिक सत्तागटात सामील न झालेल्या दीडशेवर देशांचे नेतृत्व त्यांनी भारताकडे आणले. त्यांच्या पश्चात पंतप्रधानपदावर आलेल्या लालबहादूर शास्त्रींनी पाकिस्तानचा पहिला निर्णायक पराभव केला. इंदिरा गांधींनी देशाची अर्थव्यवस्था गोरगरिबांच्या जवळ नेली आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देश हे नवे राष्ट्रच निर्माण केले. खलिस्तानची चळवळ समाप्त केली. काश्मीरात शांतता आणली आणि देशात धार्मिक तणाव उभा होणार नाही याची सातत्याने काळजी घेतली. राजीव गांधी यांनी देशाला तंत्रज्ञानाची व दळणवळणाच्या क्रांतीकारी साधनांची ओळख करून दिली तर नरसिंहराव यांनी देशाची अर्थव्यवस्था प्रथमच खुली केली. रावांचे अर्थमंत्री राहिलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीत देशाच्या विकासाचा वेग पाच टक्क्यांहून वाढत जाऊन तो नऊ टक्क्यांवर गेलेला दिसला. त्यांची दुसरी कारकीर्द तेवढी यशस्वी झाली नसली तरी हा वेग सात टक्क्यांच्या खाली कधी आला नाही. (मोदींच्या सरकारला अजून तो वेग गाठणे जमलेले नाही हे येथे नोंदवायचे) या काळात देशात विरोधी पक्षांची सरकारेही सत्तेवर आली. मोरारजीभाई, विश्वनाथ प्रतापसिंह, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आणि प्रत्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांची सरकारेही देशाने अनुभवली. वाजपेयींच्या कारकीर्दीत देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढता राहिला. त्यांची व्यक्तिगत लोकप्रियताही मोठी होताना जगाला दिसली. वाजपेयींच्या रुपाने पुन्हा एकवार एक स्टेट्समन देशाच्या पंतप्रधानपदी आलेला साऱ्यांनी अनुभवला. या काळात देशाची गंगाजळी वाढली, त्याच्या श्रीमंतीत भर पडली, त्याचे औद्योगीकरण वाढले, कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडून आली. आताचे मोदी सरकार एवढ्या साऱ्या विकासाच्या प्रवासानंतर सत्तेवर आले आहे. धर्माचे नाव पुढे करून मते मागितलेल्या त्यांच्या पक्षाने एका लाटेवर निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांच्या कारकीर्दीला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या उपलब्धीच्या हजारो कोटींच्या जाहिराती सरकारने लोकांसमोर प्रदर्शित केल्या. प्रत्यक्षात देशाचे औद्योगिक उत्पादन या काळात कमी झाले. बेरोजगारांची संख्या वाढली. स्त्रियांवरचे अत्त्याचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसले. दलितांवरील अत्त्याचारांची वार्षिक संख्या दीड हजारावरून साडे सहा हजारांवर गेलेली दिसली. मोदींच्या राजकारणातील दोष अरुणाचल आणि उत्तराखंड या दोन राज्यात न्यायालयांनीच उघड केले. अमित शाह यांच्या पक्षाने देशाची राजधानी गमावली आणि बिहारमध्ये मोठा पराभव पत्करला. या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्ष येत्या काही दिवसांत पंजाब, गोवा आणि उत्तरप्रदेशातील विधानसभांच्या निवडणुकांना सामोरा जात आहे. बिहारमधील पराभवानंतर अमित शाह यांनाच बदलले जाईल की काय याची चर्चा राजधानीत झाली हे येथे नोंदविण्याजोगे. शाह यांना स्वतंत्र भारताच्या विकासाचा इतिहास ठाऊक नाही. जुन्या नेतृत्वाच्या उपलब्धी ज्ञात नाहीत. अशा व्यक्तीकडून प्रचारबाजी आणि आपल्या नेतृत्वाचा भक्तीपर गौरव याखेरीज दुसऱ्या कशाची अपेक्षाही करायची नसते. त्यामुळे त्यांचे परवाचे भाषण त्यांच्या इतिहासाला साजेसे आहे एवढेच म्हटले पाहिजे.

Web Title: Shah also looked at a bit of history ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.