शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

संतांचे दंडधारी मारेकरी

By admin | Updated: July 4, 2014 10:37 IST

हा विषय समाजाच्या, सरकारच्या व पोलीस यंत्रणेच्या काळजीचा आहे. अशी काळजी घेणे, हेच आपण सुसंस्कृत असल्याचे लक्षण आहे.

देशातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेले साईबाबा हे देव नव्हे, दैवत नव्हे आणि संतही नव्हे, असे सनसनाटी विधान करून द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी देशातल्या वाढत्या धर्मांधतेत स्वत:च्या बाष्कळ कर्तृत्वाची भर घातली आहे. हिंदू धर्मात संत ठरविले वा निवडले जात नाहीत. रोमन साम्राज्यात दैवते निवडली जात, तर रोमन कॅथलिकांमध्ये पोप एखाद्या सत्प्रवृत्ताला संतत्व बहाल करीत असतात. हिंदू धर्मात संतत्व मानले आणि मिरविले जाते. तो जनतेच्या श्रद्धेचा विषय असतो. आपली सगळी संतपरंपरा अशी जनतेने शतकानुशतके खांद्यावर मिरविली आहे. त्यामुळे आपल्यातील संतत्व ही पदवी वा किताब नव्हे, तो जनसन्मान आहे. तो दिला जात नाही, तसा तो काढूनही घेता येत नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर किंवा तुकोबारायांना लाभलेले संतत्व सामान्य माणसांच्या मनातून उगवले आणि त्यांच्या श्रेष्ठत्वावर वाहिले गेले. त्यातून हिंदूंची सहिष्णुता आणि मोठेपण असे, की हे संतत्व बहाल करताना त्यांनी त्या सत्पुरुषाच्या कुलपरंपरेकडे पाहिले नाही. त्यामुळे हिंदूंनी मुसलमान पीरांचीही पूजा केली. त्यांची नावे स्वत:च्या मुलांना दिली. पीर आणि संत यात द्वैत मानण्याएवढे हिंदूंचे मन कधी एकारले व कलुषित नव्हते. त्यांनी साईबाबांना मानले आणि गजानन महाराजांचीही पूजा केली. याच श्रद्धेने समाजातले ऐक्य व एकात्मभाव आजवर जपला. या पार्श्‍वभूमीवर द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांचे संतत्व नाकारणारी आरोळी आपल्या पीठावरून ठोकली असेल, तर तिचा उद्देश तपासला पाहिजे. त्याचबरोबर या शंकराचार्यांचे वजनही एकदा मोजून पाहिले पाहिजे. हिंदुत्वातील सहिष्णुता घालवायची आणि त्यात परधर्माच्या द्वेषाचे विष पेरायचे, असा उद्योग या देशात काही राजकीय संघटनांनी व पक्षांनी फार पूर्वी सुरू केला. स्वधर्माचे नाव घ्यायचे ते फक्त तोंडी लावण्यापुरते आणि अन्य धर्मांच्या द्वेषाची विषाक्त गाणीच तेवढी गात राहायचे, हा या वर्गाचा उद्योग. समाज त्यांना ओळखून आहे. पण त्यांना विरोध करणार्‍या व सर्वधर्मसमभावाची सहिष्णू बाजू घेणार्‍या राजकीय संघटना राजकारणातील व अन्य काही कारणांखातर कधीकधी दुबळ्य़ा होतात. अशा वेळी या धर्मांधांचे फावते आणि नेमक्या अशाच वेळी कधी पुरीच्या शंकराचार्यांना, तर कधी द्वारकेच्या शंकराचार्यांना वाचा फुटते. साईबाबांचे कूळ कोणते, त्यांचा मूळ धर्म कोणता, याची चौकशी कोणताही साईभक्त कधी करीत नाही. श्रद्धेचे ते कामच नव्हे. अशा वेळी ‘तो तुमचा नव्हे’ हे त्यांना सांगणे वा ‘तो त्यांच्यातला आहे’ असे म्हणणे हे पापकृत्य आहे. सार्‍यांना आपल्या दरबारात सुखाचा आश्रय देणार्‍या साईबाबांसारख्या विभुती समाजच नव्हे, तर देशही जोडत असतात. असा देश जुळणे ज्यांना मान्य नाही आणि त्यातली धार्मिक भांडणे ज्यांच्या लाभाची आहेत ते अशी खुसपटे काढतात. मग त्यांना साईबाबा हा मुसलमान धर्मात जन्माला आलेला फकीर दिसू लागतो. प्रत्यक्षात साईबाबा धर्मांवर उठलेले, धर्म बंधनांहून मोठे झालेले आणि सार्‍या मानवजातीला कवेत घेण्याएवढे विस्तारले होते, हे समजून घेण्याचा आवाकाच या टीकाकारांकडे नसतो. त्यातून त्यांचे कोणी ऐकत नाही. शंकराचार्यांचा मान केवढा, त्यांचे अनुयायी किती, त्यांचे सामाजिक वजन केवढे आणि त्यांना जुमानतो कोण? आपला शब्द कोणी ऐकत नाही, हे त्यांनाही कळते आणि श्रीमद् आद्य शंकराचार्यांंच्या थोरवीला आपण शोभणारे नाही, याचीही त्यांना जाणीव असते. पण, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि राजकारणातले सन्मान त्यांना खुणावत असतात. सत्तेवरचे राजकारणही त्यांच्या प्रतिभांना अशी कुरूप पालवी फोडत असतात. मग त्यांना आपले आणि आपल्याहून मोठे झालेल्यांचे कुलवृत्तांत जात आणि धर्म आठवू लागतात. प्रश्न तेवढय़ावर थांबत नाही. द्वारकापीठाच्या शंकराचार्यांचे अनुकरण करण्याची बुद्धी मग काही पडित राजकारण्यांनाही होते. लोकसभेपासून म्युनिसिपालटीपर्यंंत सर्वत्र पडून घायाळ झालेली व कुठेही न दिसणारी ही माणसे मग साईबाबांपासून गजानन महाराजांपर्यंंतच्या सार्‍या नि:शस्त्र संतांवर वार करताना दिसतात. खरे तर या प्रकाराकडे प्रसिद्धीचा विनोदी खेळ म्हणूनच शहाण्यांनी पाहिले पाहिजे. पण आपले दुर्दैव हे, की आपल्यात माथेफिरूही थोडे नाहीत. त्यांनी यातूनच बळ उचलले आणि दंगली घडविल्या तर ? आपल्या देशात दंगलींना लहानशी कारणेही पुरतात. म्हणून हा विषय समाजाच्या, सरकारच्या व पोलीस यंत्रणेच्या काळजीचा आहे. अशी काळजी घेणे, हेच आपण सुसंस्कृत असल्याचे लक्षण आहे.