शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सेनेची अंतहीन उपेक्षा

By admin | Published: October 14, 2015 12:21 AM

शिवसेनेच्या लाचारीला अंत नाही आणि भाजपाने तिच्या चालविलेल्या उपेक्षेलाही शेवट नाही. महाराष्ट्राच्या भाजपा सरकारात सेना फार काळ ताटकळत राहून व भाजपाने टाकलेली उर्वरित मंत्रीपदे पत्करून सामील झाली.

शिवसेनेच्या लाचारीला अंत नाही आणि भाजपाने तिच्या चालविलेल्या उपेक्षेलाही शेवट नाही. महाराष्ट्राच्या भाजपा सरकारात सेना फार काळ ताटकळत राहून व भाजपाने टाकलेली उर्वरित मंत्रीपदे पत्करून सामील झाली. तिच्या मंत्र्यांना ना वजन ना काही पत्रास. दिल्ली सरकारातही सेना आहे पण १८ खासदार असतानाही तेथे एकाच व तेही कमालीच्या हलक्या खात्याच्या मंत्रीपदावर तिने समाधान मानले आहे. ‘घ्यायचे असेल तर हे एवढे घ्या, नाहीतर बाहेर बसा’ असे तिला भाजपाने ठणकावल्यानंतर तेथे ती अशा दुय्यम वा तिय्यम स्थानावर बसायला तयार झाली. सत्तेतल्या वाट्यासाठी केवढाही कमीपणा घ्यायला तयार असलेली ही सेना राजनैतिक पातळीवर व जनतेच्या व्यासपीठावर मात्र कमालीच्या मोठ्या बाता करणारी आहे. आमचे नेते, म्हणजे उद्धव ठाकरे हे भाजपामधील केंद्रीय नेत्यांशीच तेवढे बोलतील, प्रादेशिक व इतर नेत्यांची ते दखलही घेणार नाहीत असा तिचा मुंबईतला पवित्रा आहे. म्हणायलाच राज्यात युतीचे सरकार आहे. प्रत्यक्षात तो भाजपाचा एकपक्षीय सोहळा असून सेनेकडे त्यातली बाहेरची, मंडप सजवणे, राखणे व फारतर वाजिंत्र वाजविणे अशी कामे आहेत. पण गायींनाही कधीकधी संताप येतो. त्यामुळे ठाकरे अधूनमधून भाजपावर रागावतात. मग ते राज्य सरकारवर टीका करतात तर कधी केंद्राचीही उणीदुणी काढतात. ‘केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर एकवाक्यता असल्यामुळेच आम्ही भाजपासोबत आहोत’ ही तिची दाखवायची, म्हणजे त्या आड आपली लाचारी लपवायची बाजू असते. तिला एवढी लाचारी पत्करायला लावल्यानंतरही भाजपाचे मात्र समाधान होत नाही. मुंबई शहरात सेनेचे राज्य आहे. तिथली महापालिका तिच्या ताब्यात आहे. या मुंबईतल्याच इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक सरकारकडून उभे व्हायचे आहे. या स्मारकाचा आग्रह धरण्यात सेनाही भाजपासोबत राहिली आहे. परवा त्या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हातून झाले. मात्र त्याचे साधे निमंत्रणही सेनेला न देण्याचा आडमुठा अन्याय भाजपाने करून टाकला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या सोहळ््याची निमंत्रणे रिपब्लिकन पक्षाच्या निवडेल व पडेल पुढाऱ्यांसह अनेकांना फोनवरून दिली. विरोधकांनाही तशी पत्रे लिहिली. पण सेनेला ना तसे पत्र आणि ना तसा फोन. प्रकाश मेहरा नावाचे कोणी मंत्री सरकारचे निमंत्रण घेऊन मातोश्रीवर जाणार असे म्हटले गेले. पण मातोश्रीवरून दोनतीनदा विचारणा होऊनही हे मेहरा तिकडे फिरकले नाहीत. उलट ‘मला तेथे जाण्याचा आदेश पक्षाने दिलाच नाही’ असे सांगून तेही मोकळे झाले. आपल्या प्रभावक्षेत्रात आपल्याच सरकारने आयोजिलेल्या एवढ्या मोठ्या सोहळ््याचे साधे निमंत्रण आपल्याला येऊ नये ही बाब उद्धव ठाकऱ्यांना खोलवर झोंबणे स्वाभाविक होते. त्यामुळे मुंबईत तो समारंभ होत असताना त्यांनी मराठवाड्यातले बीड हे जिल्ह्याचे ठिकाण गाठले आणि तेथील अवर्षणग्रस्तांना पैसे देण्याचा कार्यक्रम उरकून टाकला. आपल्याला निमंत्रण येणार नाही आणि आपली उपेक्षा ठरवून केली जाईल याची ठाकऱ्यांना आगाऊ कल्पना असावी. त्याचमुळे त्यांनी बीडचा पर्याय आधीपासून तयार ठेवला असणार. बीडच्या कार्यक्रमात बोलताना ‘आम्हाला सत्तेची गरज नाही. जनतेची सेवाच तेवढी आम्हाला करायची आहे’ असे काहीसे सांगून त्यांनी त्यांच्या झालेल्या अपमानावर चादर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र खरा प्रकार कोणापासून दडून राहिला नाही. ‘याल तर तुमच्यासवे आणि न याल तर तुमच्याशिवाय’ असे सेनेला सांगतानाच ‘याल तरी आम्ही सांगू तसे या’ असेही या निमित्ताने सेनेला भाजपाने बजावून टाकले आहे. दानवे नावाचे चांगले गृहस्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ‘हे असे का झाले’ असे त्यांना पत्रकारांनी विचारले तेव्हा ‘काही प्रश्नांची उत्तरे जास्तीचा गोंधळ उडवतात’ असे हंसरे पण कमालीचे लागट आणि बोचरे उत्तर त्यांनी दिले. त्यात शिवसेनेची उरलीसुरली अब्रूही गेली. आता या प्रकारावरून लोकांचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी सेनेने सुधीन्द्र कुलकर्णी या एकेकाळच्या संघाच्या प्रवक्त्या-प्रचारकाचा आणि त्याच्याही अनेक वर्षे आधी साम्यवादाचा पुरस्कार करणाऱ्याच्या तोंडावर काळा रंग ओतून व त्यास देशद्रोही अशी शिवी देऊन आपला शिमगा साजरा केला. या कुलकर्ण्यांनी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद महमंद कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईला ‘भारत-पाक सलोखा राखण्यासाठी’ आयोजित केले हे त्याचे कारण. काही दिवसांपूर्वी सेनेने गुलाम अलींचा कार्यक्रम अडविला. त्याला जोडून कसुरींचा सोहळा असणे हे निमित्त सेनेच्या कामी बरे आले. मात्र आंबेडकरांच्या सोहळ्यापासून तिला दूर ठेवण्याच्या भाजपाने केलेल्या अपमानाची भरपाई यातून होणारी नाही. या साऱ्या घटनांपासून महाराष्ट्रालाही एक गोष्ट चांगली कळून चुकली आहे. भाजपा सेनेला मोजत नाही. सेनेचे त्याच्या आघाडीत फारसे स्वागत नाही. ‘आलातच तर बसा, आणि जायचे तेव्हा जा’ असा त्या ‘राष्ट्रीय’ पक्षाचा सेनेबाबतचा ‘प्रादेशिक’ खाक्या आहे. सेनेनेही तो तसा घ्यावा आणि पुन्हा हिंदुत्वाचे नाव घेत तो अपमान पचविण्याची ताकद पुन्हा अंगी बाणावी अशीच त्या पक्षाची अपेक्षाही आहे. सेना हे कुठवर सहन करते ते आता बघायचे.