मनाला पाहाणे
By Admin | Updated: June 1, 2015 23:16 IST2015-06-01T23:16:34+5:302015-06-01T23:16:34+5:30
शरीर आणि मन यांचा परस्परसंबंध पाहताना आणखीही एक गोष्ट सांगता येते की : शरीर हे अस्तित्व आहे; तर मन ही प्रक्रिया आहे. जड देहाला चलीत करणारी,

मनाला पाहाणे
डॉ. दिलीप धोंडगे -
शरीर आणि मन यांचा परस्परसंबंध पाहताना आणखीही एक गोष्ट सांगता येते की : शरीर हे अस्तित्व आहे; तर मन ही प्रक्रिया आहे. जड देहाला चलीत करणारी, क्रियेचे प्रवर्तन करणारी मन नावाची एक अस्तित्व नसलेली गोष्ट आहे. सगळे अर्थ आणि अनर्थ एका मनामुळे होतात. ‘मन चंगा तो कटौती में गंगा’ असं संत रोहिदासांनी म्हटलं आहे. हा अर्थ आणि ‘मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे’ हा अनर्थ.
‘चित्त समाधान । तरी विष वाटे सोने।’ हा अर्थ.
‘तुका म्हणे दुजा । उपचार पीडा पूजा।।’ म्हणजे मन असस्व असेल तर अन्य सुखोपचाराची पूजा केल्यानेही पीडा होते, हा अनर्थ. मनाला पाऱ्यासारखं म्हणून त्याला पाऱ्याची उपमा दिलेली आहे. मनाला पाण्याची उपमा देताना ते जलतत्त्वापासून बनलं असल्याचं मानलं गेलं आहे. ‘खालौरा धावे पाणी’ असं ज्ञानदेव म्हणतात तेव्हा मनाच्या स्वाभाविक प्रवृत्तीचं वर्णन करतात. पाणी खालच्या दिशेनं सहजगत्या जातं तसंच मन अधोगतीला जाऊ शकतं. संतांनी भक्ती हा मानसोपचार फार उत्कृष्टपणे विषद करून सांगितला आहे तो ध्यानात घेणं आवश्यक आहे. ज्ञानदेवांनी तर ते साररूपाने सांगितले आहे. ‘मनाचिये गुंती गुंफियेला शेला’. मनाच्या सूत्रांनी शेला गुंफायचा. आडव्या-उभ्या धाग्यांनी शेला विणायचा. अर्थातच ते धागे मनाचे असायला हवेत.
मी इतरत्र वाचलेली गोष्ट या एकंदर विवेचनावर प्रकाश टाकणारी आहे. गोष्ट अशी आहे. एक योगी चीनला गेले होते. योग्याचा नावलौकीक चीनच्या सम्राटाला माहीत असल्याने तो योग्याला भेटायला गेला. आपली समस्या त्याने योग्याला सांगितली. मी खूप अस्वस्थ असतो. आपण महान योगी आहात. मनाला स्थैर्य लाभेल असा काही तरी उपाय सांगा. योगी म्हणाले, दाखव तुझं मन. सम्राट गडबडला. योगी म्हणाले, ठीक आहे. उद्या मनाला घेऊन ये. सम्राटाला तत्क्षणी काहीच सुचले नाही. परत गेला. रात्रभर झोपला नाही. मन कुठे असते, कसे न्यावे, यापेक्षाही योग्याला काय उत्तर द्यावे? सम्राट दुसऱ्या दिवशी गेला. योग्याने विचारले, आणलंस तुझं मन? सम्राट म्हणाला, तुमचं म्हणणं मला कळलं नाही. मी आहे, म्हणजे माझं मनही आहेच. कुठे? योग्याने विचारले. माझ्यासोबत सम्राट म्हणाला. ठीक आहे. एक गोष्ट तुझ्या बोलण्यातून तूच स्पष्ट केली की, तुझ्या शरीरातच तुझं मन आहे. मग शरीरातच त्याचा शोध घे, योगी म्हणाले. कसे शोधावे? सम्राटापुढे प्रश्न पडला. योग्याने ते ओळखले व म्हटले, डोळे मीट व शोध. सम्राटाने डोळे मिटले व मनाचा शोध घेऊ लागला पण ते काही दिसले नाही. योगी म्हणाले, ते दिसणार नाही, पण अस्वस्थ झालास की डोळे मिटून त्याला पहायला शीक. तुला स्वस्थ वाटेल. मनाला अस्तित्व नाही; पण त्याला शरीरात पाहाणं म्हणजे शरीराला मनाने व्यापणं. ते जितके जितके प्रसरणशील होते तितके ते शांत शांत होते. यालाच ध्यान असे म्हणतात.