बाह्यरंगापेक्षा अंतरंगाचा शोध घ्या!

By Admin | Updated: April 22, 2017 04:21 IST2017-04-22T04:21:31+5:302017-04-22T04:21:31+5:30

यापूर्वीच्या शतकांत जगातील एका मोठ्या क्षेत्राने रंगभेदाचा संघर्ष बघितला आहे, त्याच्या झळा सोसल्या आहेत. रंगभेदाविरुद्ध राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर

Search for internal intersection! | बाह्यरंगापेक्षा अंतरंगाचा शोध घ्या!

बाह्यरंगापेक्षा अंतरंगाचा शोध घ्या!

- सविता देव हरकरे

यापूर्वीच्या शतकांत जगातील एका मोठ्या क्षेत्राने रंगभेदाचा संघर्ष बघितला आहे, त्याच्या झळा सोसल्या आहेत. रंगभेदाविरुद्ध राष्ट्रपिता महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग यांनी टोकाचा संघर्ष केला होता. या कारणावरून जगातील अश्वेतांचे सर्वात मोठे आंदोलन उभे झाले होते. आपल्या देशात रंगभेद आणि अस्पृश्यतेविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढा सर्वज्ञात आहे. या कटु अनुभवांमुळे कालांतराने पश्चिमी आणि आफ्रिकी देश रंगभेदाच्या मुद्द्यावर संवेदनशील झाले असले तरी ही संवेदनशीलता आशियाई देशांपर्यंत पोहोचली नाही. कारण त्यात धर्म आणि जातीचा मुद्दाही समाविष्ट होता. परंतु आज आमच्या देशाच्या कायद्यात धर्मरंग आणि जातीवर आधारित भेदभावाला कुठलाही थारा नाही. देशाने भौतिक आणि मानवी विकासाच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. विज्ञान तंत्रज्ञानात उत्तुंंग झेप घेतली. अशात विविध प्रश्नांबाबतच्या जागरूकतेसोबतच वर्ण, जात, धर्मावर आधारित भेदभावही संपुष्टात यायला हवा होता. परंतु विद्यमान परिस्थिती आणि घटनांकडे बघितल्यावर आपण दीड-दोनशे वर्षांपूर्वी जेथे होतो तेथेच आहोत की काय, असा प्रश्न पडावा.
आर्थिक, वैज्ञानिक, आरोग्य या सर्वच क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली याबद्दल दुमत नाही. पण येथील सामाजिक परिवर्तन अथवा सुधारणांचा वेग मात्र अपेक्षेपेक्षा फारच मंद आहे, असेच म्हणावे लागेल. अलीकडच्या काळातील काही घटनांमधून याची प्रचिती येते आणि रंगभेदाची व्याप्ती पूर्वीपेक्षा वाढते आहे काय, असा प्रश्न पडतो. रंगावरून शिवीगाळ, चेष्टा करणे, कमी लेखणे हे निंद्य प्रकार या देशात अजूनही घडतात. एखादी व्यक्ती अथवा समूहाला त्याच्या रंगावरून कमी लेखणे चुकीचे आहे, हे येथील लोकांना उमगलेले नाही. सामान्यांचे सोडून द्या; राजकीय नेतेसुद्धा अशा टीकाटिप्पणीत मागे नसतात. भाजपा नेते तरुण विजय यांनी ग्रेटर नोएडाच्या घटनेनंतर केलेल्या एका वक्तव्याने रंगभेदाचा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असला तरी यापूर्वीसुद्धा काही नेत्यांची जीभ घसरलेली आपण बघितली आहे. विजय यांनी सात्त्विक क्रोध व्यक्त करताना आम्ही रंगभेद मानला असता तर दाक्षिणात्य लोक आमच्यासोबत कसे असते. आमच्या चौफेर काळे लोक आहेत, असे वादग्रस्त विधान करून एकाअर्थी आपण रंगभेदी असल्याचेच दाखवून दिले. यासंदर्भातील आणखी काही उदाहरणेही नमूद करता येतील. भाजपाचे केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह काय म्हणाले होते? राजीव गांधींनी सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या नायजेरियन मुलीसोबत लग्न केले असते तर काँग्रेसने त्यांना आपल्या नेत्या म्हणून स्वीकारले असते काय? गेल्या वर्षी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीसुद्धा रंगभेद जिवंत ठेवणारे असेच एक विधान केले होते. संपकर्त्या परिचारिकांना त्यांनी उन्हात बसून आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता. उन्हाने तुमचा रंग काळा होईल आणि लग्नात अडचणी येतील, असे ते बोलून गेले. नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रियंका गांधी वाड्रा प्रचारात उतरणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हा एका पक्षाच्या राजकीय नेत्याने आमच्याकडेही त्यांच्यापेक्षा सुंदर महिला नेत्या आहेत असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होताच. थोडक्यात रंगभेदाची पकड भारतीय समाजात कायम आहे, हे एक कटुसत्य आहे. वरकरणी आम्ही समानता, आधुनिकता आणि पुढारलेपणाचा कितीही ढोल बडवत असलो तरी आतून मात्र यत्किंचितही बदललेलो नाही. ‘गोरी वधू पाहिजे’ अशी जाहिरात देत नसूही; पण मनात मात्र शोध तिचाच असतो. भारतात इंग्रजांच्या शासनकाळात काळ्या गोऱ्यातील भेदभावाने माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. शारीरिक रंगावरून माणसाला माणूस न मानण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसत होती. वन्यप्राणीसुद्धा या तथाकथित सभ्य लोकांपेक्षा अधिक सुसंस्कृत म्हणायचे. त्यांना माणसासारखी बुद्धी नसली तरी रंगावरून ते कधी भेदभाव करताना दिसत नाहीत.
मनुष्यावरील रंगभेदाचा संस्कार फार जुना असला तरी आपल्या देशात इंग्रजांच्या राजवटीत तो अधिक वाढीस लागला. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या बहुसांस्कृतिक भारतीय समाजाला एकजूट ठेवून देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणे हे फार मोठे आव्हान होते. येथील सरकारे, राजकीय नेते आणि लोकांनीही हे आव्हान पेलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, हे खरे. त्यात त्यांना काहीअंशी यशही प्राप्त झाले असेल. पण गेल्या काही वर्षांपासून या भेदभावांना नव्याने खतपाणी देण्याचे काम काही राजकीय लोक करीत आहेत. यामागील त्यांचा स्वार्थही कुणापासून लपून राहिलेला नाही. विशेष म्हणजे काळ्या रंगाला हिणवण्याच्या या प्रथेने आम्ही गौरवर्णीयांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो याचेही भान आम्हाला राहात नाही.
मानव जातीचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. आदिम अवस्थेपासून सुरू झालेला मानवी जीवनाचा प्रवास अनेक टप्पे पार करीत विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला आहे. माणसाला माणूस समजणे हा कुठल्याही सभ्यतेचा मूलमंत्र समजला जातो. माणसाने आज जी प्रगती केली आहे त्यातही या मूलमंत्राचे पालन महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे माणसामाणसात वाढती कटुता संपवायची असेल तर बाह्यरंगापेक्षा मानवाच्या अंतरंगाचा ठाव घेणे आज गरजेचे आहे.

 

Web Title: Search for internal intersection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.