शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन ज्ञान-खाणींचे शास्त्रशुद्ध उत्खनन!

By विजय बाविस्कर | Updated: March 22, 2023 09:27 IST

दुर्मीळ हस्तलिखितांचा शोध, छाननी, लिपीदुरुस्ती, स्कॅनिंग आणि देवनागरी  लिप्यंतर.. पुण्याच्या श्रुतदीप रिसर्च फाउंडेशनच्या बृहद प्रकल्पाबद्दल...

- विजय बाविस्कर (समूह संपादक, लोकमत)

आपला देश अनादिकाळापासून केवळ धनवानच नाही, तर ज्ञानवानही होता. धन आणि ज्ञान म्हणजेच लक्ष्मी आणि सरस्वतीचा निवास म्हणजे भारत देश. त्यामुळेच भारत संपूर्ण विश्वाचे आकर्षण राहिले आहे. विश्वातील पर्यटक हजारो वर्षांपासून आपल्या देशाला भेट देत आणि येथील सुबत्तेचे, संस्कृतीचे कौतुक करत. चीन, आखाती देश, पूर्व आशिया या भागातून आलेल्या पर्यटकांनी भारताबद्दल भरभरून प्रवासवर्णने लिहिली आहेत. इथल्या श्रीमंतीबद्दल, तसेच ज्ञानाच्या खजिन्याबद्दल आपल्या ग्रंथांमध्ये लिहिले आहे. शेकडो वर्षांपासून भारतावर अनेक आक्रमणे झाली.  

संपत्ती लुटण्याच्या हेतूने आलेल्या या आक्रमकांनी राजसत्ता काबीज केल्यानंतर येथील ज्ञानसत्ता मोडून काढण्याची मोहीम हाती घेतली आणि धनासोबत ज्ञानाच्या भांडारावरही हल्ले केले. कोट्यवधी हस्तलिखिते नष्ट करण्यात आली. मात्र, आपले पूर्वज दूरदृष्टी असणारे होते. त्यांनी हस्तलिखितांच्या अनेक प्रती तयार करून देशाच्या विविध भागांमध्ये सुरक्षित ठेवल्या. त्यातील काही प्रती आक्रमकांच्या हल्ल्यातून बचावल्या. मात्र, कालौघात नैसर्गिक आपत्ती, मानवी हस्तक्षेप आदी कारणांमुळे त्यातील अक्षरवाङ्मय पुसट झाले. काहींचा अपभ्रंश झाला, तर त्याच्या पुढील प्रतींमध्ये विशुद्ध रूप हरवत गेले. 

मूळ रूपातील या प्राचीन ज्ञानखजिन्याचा नव्याने शोध घेण्याची आणि तो जनतेसमोर आणण्याची गरज होती. मात्र हे शिवधनुष्य पेलण्यापेक्षाही अवघड काम खरेच...  पुण्याच्या श्रुतदीप रिसर्च फाउंडेशनने हा पुरातन ज्ञानखजिना जनतेसमोर आणण्याचा संकल्प सोडला आणि गेल्या दहा वर्षांमध्ये तब्बल ८० लाख हस्तलिखितांच्या पानांचे स्कॅनिंग आणि ५० हजारांपेक्षा अधिक पानांचे आजच्या देवनागरीमध्ये भाषांतर, लिप्यंतर केले आहे. हस्तलिखितांच्या स्वरूपातील हा प्राचीन ज्ञानवारसा किती असावा, याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. प्रा. डॉ. डेव्हिड पिन्ग्री यांच्या मतानुसार, हस्तलिखितांचा हा ज्ञानखजिना किमान तीन कोटी असावा. अमेरिकी इतिहासकार आणि गणितज्ञ प्रा. डेव्हिड हे ब्राऊन विद्यापीठात अध्यापनाचे काम करत. भारतीय पुरातन इतिहासावर त्यांनी बरेच लिहून ठेवले आहे.

एका अभ्यासानुसार, भारतीय उपमहाद्वीपामधील सुमारे २० टक्के हस्तलिखिते, विविध जैन भांडारांमध्ये सापडतात. तेथे ती जपून ठेवण्यात आली आहेत. मात्र, सध्या असलेल्या एकूण हस्तलिखित ऐवजांपैकी अवघी दीड कोटीच उपलब्ध आहेत आणि त्यांची स्थिती जर्जर आहे. व्हिएन्ना विद्यापीठाचे प्रा. डॉ. डॉमनिक वुजास्टिक यांच्या दाव्यानुसार, भारताचा हा अनमोल ठेवा दर आठवड्याला शंभर या गतीने नष्ट होत आहे. शंभर वर्षांपूर्वी भारतात सुमारे एक हजार हस्तलिखित ग्रंथसंवर्धन केंद्रे होती, आज केवळ चारशे केंद्रे अस्तित्वात आहेत. तेथील कपाटांमध्ये अनेक वर्षे बंदिस्त राहिल्याने या हस्तलिखितांना वाळवी लागली आहे.

श्री वैराग्यरति विजयजी महाराज यांनी  पुण्यात २०१० मध्ये श्रुतभवन संशोधन केंद्राची स्थापना केली. श्रीमत् विजय रामचंद्रसूरीश्वरजी महाराज यांचे ते शिष्य. पुण्यातील श्रुतभवन येथे त्यांच्या नेतृत्वाखाली २५ भाषाविदांचा चमू काम करत आहे. महाराजांनी तरुण चिकित्सक निवडून, त्यांना प्राचीन भाषा आणि लिपींचे संपूर्ण प्रशिक्षण देऊन, या अभिनव प्रकल्पासाठी प्रशिक्षित केले आहे. याखेरीज, भारतभ्रमण करून हस्तलिखितांचा शोध घेणारी दोन पथके काम करतात. वैराग्यरति विजयजी महाराज यांचा मूळ उद्देश भारतभर हस्तलिखितबद्ध असलेले समग्र जैन तत्त्वज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगासमोर आणणे, हा होता.

प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर मात्र त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. जैन तत्त्वज्ञानाव्यतिरिक्त इतर सांस्कृतिक ठेव्यावरदेखील काम सुरू झाले. गेल्या दहा वर्षांच्या काळात तब्बल ८० लाख पानांचे स्कॅनिंग आणि भाषा शुद्धीकरणाबरोबरच, भाषांतर तसेच लिप्यंतराचे काम पूर्ण झाले आहे. श्री वैराग्यरति विजयजी महाराज सांगतात, ‘भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या आणि कालौघात लुप्त झालेल्या सर्व लिप्यांची जननी ब्राह्मी लिपी आहे. त्यामुळे आम्ही निवडलेल्या तरुण पंडितांना सर्वांत आधी ब्राह्मी लिपी शिकवतो, त्याचबरोबरच प्राकृत, संस्कृत भाषांचे ज्ञान आणि पांडुलिपीसारख्या समकालीन भारतीय लिपींचेही ज्ञान देतो.

भारताच्या विविध भागांतून आणलेली हस्तलिखितांची छाननी करतो. त्यांचे योग्य संपादन करणे, व्याकरणदृष्ट्या तपासणी करणे, लिपीदुरुस्ती करणे आणि शेवटी त्यांचे संगणकीय स्कॅनिंग करून जतन करणे, याखेरीज सर्व हस्तलिखितांचे देवनागरीमध्ये लिप्यंतर करणे अशी कामे येथे होतात. भारतातील अशा स्वरूपाचे हे एकमेव संशोधन केंद्र आहे.’ प्राचीन काळात भूर्जपत्र किंवा ताडपत्रावर लिखाण केल्याची लाखो उदाहरणे आहेत. श्रुतभवनमध्ये आज पुन्हा ताडपत्रावर लिखाण केले जात आहे. त्यामागचे कारण विस्मयचकित करणारे आहे. श्री वैराग्यरति विजयजी महाराज यांच्या मते, कितीही उच्च दर्जाच्या कागदावर शाईने लिहिले किंवा छपाई केली, तर त्याची आयुर्मर्यादा ५० ते ७० वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. ताडपत्रावर लिहिलेला मजकूर पाचशे ते सातशे वर्षे टिकतो. श्रुतभवनमध्ये केवळ ताडपत्र लिखाणच केले जात नाही, तर त्यावर लेझरच्या साह्याने अक्षरे कोरण्याचे कामही केले जाते.

खजिन्याला लागलेली वाळवी आणि ही श्रीमंती परत मिळविणारे अध्यक्ष किरीटभाई शेठ, वरिष्ठ सदस्य  भरतभाई शहा, श्रुतभवनच्या आरंभापासून कार्यरत असणारे राजेंद्र बाठिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या प्रकल्पाशी जोडले गेल्याचा सार्थ अभिमान आहे.श्रुतभवनमध्ये गेल्या दशकभरात देशातील चारशे हस्तलिखित ग्रंथभांडारातून आणलेल्या ७ लाख १९ हजार हस्तलिखित ग्रंथांची सूची आहे. ८४ ग्रंथभांडारांचा सुमारे दीड लाख हस्तलिखितांच्या दस्तावेजाचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. त्याची पाने सुमारे ८० लाख एवढी भरतात. यातील ४० भांडारांच्या ६५ हजार हस्तलिखितांचे सूचिपत्र (कॅटलॉग) तयार करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राचीन माहितीच्या संग्रह, पुनर्निर्माण आणि विश्लेषणासाठी जी मानके निश्चित करण्यात आली आहेत, त्यांचेही काटेकोरपणे पालन करून या संशोधनकार्यात आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळला जातो.  

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र