पाणीदार जिल्ह्यात टंचाईच्या झळा
By Admin | Updated: January 30, 2016 03:43 IST2016-01-30T03:43:23+5:302016-01-30T03:43:23+5:30
कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांवर छोटी-मोठी धरणे आहेत. या धरणांमध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगावर कोसळणारा

पाणीदार जिल्ह्यात टंचाईच्या झळा
- वसंत भोसले
कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातून वाहणाऱ्या सर्वच नद्यांवर छोटी-मोठी धरणे आहेत. या धरणांमध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगावर कोसळणारा सरासरी १५०० ते ३००० मिमी पाऊस ही धरणे भरून टाकतो. चालू वर्षी सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. कारण पावसाचे प्रमाण पन्नास टक्क््यांपेक्षा कमी राहिले. कोल्हापूर जिल्ह्याचे भूषण असलेल्या राजर्षी शाहू महाराज निर्मित राधानगरी धरण याला अपवाद होते. उर्वरित सर्व धरणांमध्ये सरासरी सत्तर टक्केच पाणीसाठा झाला. पावसाचे प्रमाण कमी आणि पाण्याचा साठाही कमी असल्याने शेतीला यावर्षी आतापासूनच पाणी कमी पडू लागले आहे. गेली अनेक वर्षे धरणे आॅगस्ट अखेरीस भरून वाहू लागत, त्यामुळे पिण्याचे पाणी असो की शेतीचे, टंचाई ही कधी निर्माण होतच नव्हती. गावागावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रश्नच कधी उद्भवत नव्हता. यंदा मात्र ती वेळ येणार आहे.
याचाच अर्थ पाणीटंचाई न जाणवणारा जिल्हा म्हणून असलेली कोल्हापूरची ओळख चालू वर्षी मात्र त्याला अपवाद ठरणार आहे. पाऊस कमी झाल्याने शेतीच्या पाण्याची मागणी सप्टेंबरपासूनच होऊ लागली. मात्र प्रशासनाने धरणातील पाण्याचा साठा कमी असल्याने उपसा बंदीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला आठवड्याची असणारी उपसाबंदी आता १७ दिवसांपर्यंत वाढवली आहे. परिणामी सढळ हाताने आणि पाट पाण्याने उस पिकवण्याची सवय झालेल्या शेतकऱ्यांना हा निर्णय अडचणीचा वाटू लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील शेतजमिनीपैकी ८० टक्के शेतजमीन सिंचनाखाली आलेली आहे. उर्वरित २० टक्के शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, तरी देखील खरीप आणि रब्बीची दोन्ही पिके घेतली जातात. कमी पावसामुळे पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन भोगावती , चिकोत्रा , दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, कुंभी, कासारी, वारणा आदी नद्यांच्या खोऱ्यात उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने उपसाबंदी आवश्यक आहे. मात्र शेतात उभ्या असलेल्या ऊसाला पाणी टंचाईची झळ भासू लागली आहे. त्यामुळे उभी पिके वाळू लागली आहेत. साखर कारखान्यांचा हंगाम एक महिना उशिरा सुरु झाल्याने शेतातील उभ्या ऊसाची तोडणी लांबत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडत आहे. शिवाय नव्याने ऊसाची लागवड करण्यासही शेतकरी धजावत नाहीत. गहू, हरभरा, ज्वारी, आदी रब्बी पिकांच्या वाढीवरही यावर्षी परिणाम झाला आहे. पाऊस कमी असला तरी थंडी चांगली असल्याने रब्बी हंगाम जेमतेम टिकून राहिला आहे.
शेजारच्या सातारा, सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात आतापासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तर सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांना पाणी टंचाईची प्रचंड झळ जानेवारीपासूनच जाणवत आहे. जत तालुक्यात तर ३६ गावांना आणि ९० वाड्या-वस्त्यांना टँकरने गेली तीन महिने पाणीपुरवठा सुरु आहे. पावसाळा येण्यास अद्याप पाच महिन्यांचा अवधी आहे; तोपर्यत या तालुक्यांना टँकरच्या पाण्यावरच गुजराण करावी लागणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून काही ठिकाणी चारा लागवडीचे प्रयोग प्रशासनाकडून सुरु आहेत पण ते कितपत पुरे पडतील, याची साशंकताच आहे. कृष्णा खोऱ्यातील या तीनही जिल्ह्यातील नद्यांवर धरणे बांधली आहेत. पाणी अडवले आहे. मात्र पाण्याचा विनियोग, पीक पद्धती याचे शास्त्रीय नियोजन नसल्याने पावसाने थोडी ओढ देताच टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.