सावित्रीबाईंची आठवण पदोपदी येते, कारण...

By वसंत भोसले | Published: March 10, 2022 09:01 AM2022-03-10T09:01:01+5:302022-03-10T09:03:08+5:30

महिला शिक्षण, त्यांच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी अखंड लढा दिला, समाजमन बदलताना नवा विचार दिला. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त...

Savitribai Phule is remembered day by day, because ... | सावित्रीबाईंची आठवण पदोपदी येते, कारण...

सावित्रीबाईंची आठवण पदोपदी येते, कारण...

googlenewsNext

- वसंत भोसले, संपादक, लोकमत, कोल्हापूर

सावित्रीबाई आणि जोतिराव फुले या दोन महात्म्यांचे पदोपदी स्मरण होत राहते. रशिया-युक्रेन युद्ध पेटले आणि हजारो भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्याची धडपड सुरू झाली, तेव्हाही सावित्रीबाईंचे तीव्रतेने स्मरण झाले. भारतीय विद्यार्थी हजारोच्या संख्येने वैद्यकीय शिक्षण युक्रेनमध्ये घेत होते. त्यापैकी निम्याहून अधिक मुली होत्या. सावित्रीबाई यांचे जन्मगाव सातारा जिल्ह्यातील नायगावपेक्षाही लहान खेड्यापाड्यातील मुली डॉक्टर होण्यासाठी चक्क युक्रेनपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. १ मे १८४८ रोजी महात्मा जोतिराव फुले यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पुण्यातील भिड्यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरू झाली. ही घटना १७४ वर्षांपूर्वीची आहे. त्या शाळेत शिक्षिका म्हणून ठामपणे उभ्या राहून मुलींना साक्षर बनविणाऱ्या सावित्रीबाई यांना जाऊन आज १० मार्च रोजी १२५ वर्षे झाली.

तसा हा कालखंड मोठा आहे तरी तो समाज उन्नतीच्या एका मोठ्या वळणाचा आहे. समाजातील नीतिभ्रष्टता, शूद्रातिशूद्रावरील वाढते अत्याचार, स्त्रियांवरील अन्याय, बालविवाह, विधवा विवाह, भ्रूणहत्या, शेतकरी-कामगारांचे शोषण थांबिवणे, त्यांना साक्षर करण्यासाठी अभिनव विचार जोतिरावांच्या मनात होते आणि त्यांना सक्रिय साथ देणाऱ्या सावित्रीबाई होत्या. तत्कालीन समाजजीवनाच्या अध:पतनामुळे हा नवा विचार त्यांनी मांडला आणि सावित्रीबाईंनी त्यात कृतिशील भागीदारी करीत प्रत्यक्षात उतरविला.

आज युक्रेनवरून परतणाऱ्या मुलींची शिक्षणाची आस त्याच विचारातून आलेली असणार आहे. अत्यंत सामान्य कौटुंबिक परिस्थिती असलेल्या समाजातील या मुली आहेत. अन्याय कशाला म्हणायचे हेदेखील ज्या समाजाला समजत नव्हते, असंख्य वर्षे अन्यायात पिचत राहिल्यामुळे त्यांचे विचार करण्याचे सामर्थ्य देखील नष्ट झाले होते, ती जाणीव आता बदलली आहे. त्याची सुरुवात सावित्रीबाईंनी पावणेदोनशे वर्षांपूर्वी केली. त्यासाठी हालअपेष्टा स्वीकारल्या. कर्मठ समाजाकडून अपमान, शेणाचा माराही सहन केला. 

ही सर्व कृती साधी नव्हती. कारण समाज जेवढा कर्मठ, तेवढाच असमर्थ होता. त्यांना जाणीव करून देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. त्याची सुरुवात कोणीतरी, कोठेतरी करावी लागते. बंड करावे लागते. स्वत:च्या सासऱ्यांनी कर्मठ समाजाच्या दबावामुळे घरातून बाहेर काढले, तेव्हा सुखासुखीचा संसार सोडून कर्मठ समाजाच्या हल्ल्याचे चटके त्यांनी सोसले. म्हणून हा जागतिक पातळीपर्यंत पोहोचणारा बदल आज आपणास पाहायला मिळतो आहे. समाजात असंख्य बदल झाले असले तरी त्या कर्मठ समाजाची री ओढणारा वर्ग आजही अस्तित्वात आहे. जोतिराव आणि सावित्रीबाईंच्या नावे तो खडे फोडत असतो; पण कोणीही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा विचारही करू शकत नाही. एखाद्या कर्मठाने तसा विचार केलाच तर पोटची कन्याही बंड करणार एवढ्या क्रांतिकारक बीजांची पेरणी सावित्रीबाईंनी केली.

चीनसारखा देश महासत्ता होण्याचे एक प्रमुख कारण स्त्रियांचा मुख्य प्रवाहातील मोठ्या प्रमाणातील सहभाग, असे विवेचन अर्थशास्त्रज्ञ करतात. त्या वाटेवर जाण्याच्या तयारीत भारतही आहे. त्यासाठी सावित्रीबाईंच्या विचाराने शूद्रांना, स्त्रियांना मुख्य प्रवाहात मोठ्या प्रमाणात आणावे लागणार आहे. कर्मटपणा बाजूला ठेवून फुले दाम्पत्याचा विचार तेव्हाच व्यापक पातळीवर स्वीकारला असता तर स्वातंत्र्यांची पहाट, समाजाचे संक्रमणही आधीच झाले असते. या पार्श्वभूमीवर देशातील पहिल्या मुलींच्या शाळेतील पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. समाजाचे परिवर्तन त्यामधील माणसांच्या बदलाने होते. तो विचार सर्व समाजाला स्वीकारावा लागला. 

जोतिराव फुले यांनी विविध पातळीवर अनेक समाजपरिवर्तनाचे लढे दिले. शिक्षणामुळे समाज शहाणा होईल, आपल्या एकतंत्री कर्मठ धर्मसत्तेला आव्हान देईल, म्हणून या दाम्पत्यावर हल्ले करण्यात आले, धमक्या देण्यात आल्या. अशा कसोटीच्या काळात सावित्रीबाईंनी दाखविलेले  धैर्य एखाद्या योद्ध्यापेक्षा कमी नाही. त्यांनी ध्येयाने लढा दिला किंबहुना ज्योतिराव यांच्या पाठीशी राहून तो लढा तीव्र केला. कृतीचा निर्धार तर होताच, मात्र खरा आधार श्रेष्ठ अशा विचारांचा, मूल्यांचा होता. सहचारिणी म्हणून जोतिरावांबरोबर ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे होते. त्यांना समाजशिक्षणाच्या माध्यमातूनच हे धैर्य प्राप्त झाले होते. त्यांनी तत्कालीन समाजातील अंतरंगाचे आणि क्रौर्याचेही सूक्ष्म निरीक्षण केले होते. परिणामत: त्यांचा विचार आणि कृतीची जोड अधिक मजबूत झाली. आजचे भारतीय समाजमन स्त्रियांना शिक्षण, शूद्रातिशूद्रास न्याय देण्याची भूमिका घेते किंबहुना त्याच विचारांचा विजय झाला. तो मानवतेच्या कल्याणाचा आणि मानवी उत्क्रांतीचादेखील मार्ग होता. यासाठी सावित्रीबाईंचे पदोपदी स्मरण होत राहते!

Web Title: Savitribai Phule is remembered day by day, because ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.