या गोरक्षकांपासून दलितांना वाचवा

By Admin | Updated: August 4, 2016 05:23 IST2016-08-04T05:23:29+5:302016-08-04T05:23:29+5:30

स्वामी विवेकानंदांचे वचन, त्यांचे नाव पुढे करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी व त्यांच्या गुजरात या राज्यानेही लक्षात घेऊ नये याएवढा दैवदुर्विलास दुसरा नाही

Save the Dalits from these gurudwaras | या गोरक्षकांपासून दलितांना वाचवा

या गोरक्षकांपासून दलितांना वाचवा


‘या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन वा मुसलमानांनी केलेल्या अत्त्याचारांमुळे नव्हे तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्त्याचारांमुळे झाली हे समजून घ्या.’ हे स्वामी विवेकानंदांचे वचन, त्यांचे नाव पुढे करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी व त्यांच्या गुजरात या राज्यानेही लक्षात घेऊ नये याएवढा दैवदुर्विलास दुसरा नाही. आपल्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायानुसार मेलेल्या गायीचे कातडे सोलत असलेल्या चार दलित तरुणांना एका मोटारीच्या मागे दोरांनी बांधून व त्यांना अर्धवस्त्र करून त्यांच्या पार्श्वभागावर तासनतास काटेरी काठ्यांनी अखंड फटकारे मारणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या माणसांनी (ते मात्र स्वत:ला गोरक्षक, हिंदुत्ववादी आणि विवेकानंदांचे अनुयायी म्हणवितात) जो अमानवी इतिहास गुजरातमध्ये घडविला आणि दूरचित्रवाहिन्यांनी तो देशाला दाखवून त्याचे डोळे ओले केले त्या पाशवीपणाला वर्तमानात उपमा द्यायचीच तर ती तालिबानांच्या वा इसीसवाल्यांच्या अत्याराचांचीच द्यावी लागेल. दलितांवरील अशा अत्त्याचारात ज्यांना धर्मरक्षण आणि गोरक्षण दिसते त्यांना धर्माचे वा विवेकानंदांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, हे स्पष्टपणे बजावले पाहिजे. भर पावसात ती चार निरपराध माणसे अमानुष मार खात आहेत आणि तो स्वस्थपणे पाहणाऱ्यांतले कोणीही पुढे होऊन त्यांना हे थांबवा असे म्हणत नाही हा भागही आपल्या समाजाचे मुर्दाडपण सांगणारा व आपल्यातली मानवी संवेदना संपली असल्याचा पुरावा ठरेल असा आहे. आपल्या धर्मातील जाती व्यवस्थेनेच जी कामे करण्याची सक्ती समाजातील काही जातींवर लादली त्या धर्माचीही या धर्मवीर म्हणविणाऱ्यांनी अवहेलनाच केली. दलितांवरील अत्त्याचारांच्या घटना, मुसलमानांचे मुडदे पाडण्याचे प्रकार आणि स्त्रीवर्गाची विटंबना करण्याचे बीभत्स चाळे दिल्लीत मोदींचे सरकार सत्तारुढ झाल्यापासून वाढले आहेत आणि त्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि देशातील इतरही प्रगत म्हणविणारी राज्ये मागे राहिली नाहीत. या अत्त्याचारांविरुद्ध सत्ताधारी बोलत नाहीत आणि विरोधकांचा आवाजही क्षीण झालेला दिसतो. या स्थितीत अत्याचारपीडितांनाच आपण एकत्र येऊन या घटनांचा मुकाबला करावा असे वाटू लागले तर तो त्यांचा दोषही नाही. परवा अहमदाबाद या गुजरातच्या राजधानीत दलितांचा जो प्रचंड आणि आक्रोशी मेळावा झाला तो या साऱ्या प्रकारांची प्रतिक्रिया सांगणारा होता. या मेळाव्यात त्यांनी घेतलेले निर्णय महत्त्वाचे व साऱ्या समाजाला मोठा धक्का देणारे आहेत. ‘यापुढे मेलेली जनावरे ओढून नेण्याचे काम कोणताही दलित माणूस वा वर्ग करणार नाही. नालीत शिरून किंवा मॅनहोलमध्ये उतरून त्यातली घाण साफ करण्याचे काम तो करणार नाही. सवर्णांचा वा अन्य कोणीही केलेला कोणताही अन्याय वा अत्याचार यापुढे तो सहन करणार नाही’ इ.. गुजरातच्या गोरक्षकांनी चालविलेल्या गोशाळांमधील काही गायी अलीकडेच मेल्या तेव्हा त्या उचलायला वा त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावायला ही माणसे आली नाहीत तेव्हा त्याची दुर्गंधी साऱ्या परिसरात पसरली व ती दूर करण्याची जबाबदारी या तथाकथित गोरक्षकांवर आली. त्यांनी ती स्वत: पार न पाडता त्यासाठी पोलिसांची मदत घेतली. दलितांच्या रक्षणासाठी धावून न गेलेले गुजरातचे पोलीस या गोरक्षकांना दुर्गंधीपासून वाचवायला मात्र तत्काळ धावून गेल्याचे दिसले. आपले गो-प्रेम कोणत्या पातळीवरचे वा लायकीचे आहे याची मोठी साक्ष याहून दुसरी नसावी. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या आता त्यांच्या पदावरून पायउतार झाल्या आहेत. पण त्या दलितांवरील या अत्त्याचाराचे प्रायश्चित्त म्हणून नाही तर त्यांच्या मुलामुलींनी केलेल्या शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला आली म्हणून. स्वच्छ भारत व भ्रष्टाचारमुक्त भारत असे गर्जून सांगणाऱ्या सत्तारुढ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची जी भ्रष्ट प्रकरणे एवढ्यात उघडकीला आली त्यांनी या गर्जनांचा पोकळपणाही त्या गोरक्षकांच्या गायीवरील प्रेमाएवढाच उघड केला. पटेलांचा वर्ग विरोधात गेला आहे आणि दलितांनी विरोधात कंबर कसली आहे, या पार्श्वभूमीवर केवळ ‘आपले वय झाले म्हणून मी राजीनामा देत आहे’ हे आनंदीबेन यांचे सांगणे नुसते अविश्वसनीयच नाही तर हास्यास्पदही आहे. आपल्या राजीनाम्याच्या निवेदनात दलित तरुणांना त्यांच्या गोरक्षकांनी केलेल्या अमानुष मारहाणीविषयी त्यांनी एखादा शब्द उच्चारला असता तरी त्यांचे जाणे काहीसे बरे ठरले असते. पण अशा प्रकारांविषयी नरेंद्र मोदी बोलत नाहीत, जेटलींना त्याचे काही वाटत नाही, राजनाथांना त्याविषयीची साधी संवेदनाही नाही आणि संघ?... तो तर अशावेळी आपण राजकारणापासून दूर असल्याचे नाटकीपण पांघरून उपरणे झटकणारा आहे. या स्थितीत या पाशवी कृत्यांचे ओझे आनंदीबाईंनी तरी कशाला वाहून न्यायचे, हा खरा प्रश्न आहे आणि तो आपल्या राजकारण व समाजकारणाएवढाच धर्मकारण करणाऱ्यांनाही भेडसावणारा आहे.

Web Title: Save the Dalits from these gurudwaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.