नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे कौतुक करायचे किती..?
By अतुल कुलकर्णी | Updated: October 26, 2025 11:13 IST2025-10-26T11:09:18+5:302025-10-26T11:13:06+5:30
समृद्धी महामार्गाद्वारे नाशिक, संभाजीनगर, नागपूरला जाणारे आणि मुंबई-गोवा महामार्गाद्वारे कोकणात जाणारे प्रवासी तर फारच भाग्यवान ठरले

नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे कौतुक करायचे किती..?
अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
विविध खात्यांच्या मंत्री महोदयांनो, नमस्कार.
आपल्या कृपेने व दूरदृष्टीपणामुळे आमची दिवाळी आगळीवेगळी झाली. या दिवाळीत जे जे नावीन्य आम्ही अनुभवले ते आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे, तर "गेल्या ६० वर्षांत अशी दिवाळी झाली नाही, आणि भविष्यातही होणार नाही..." असेच म्हणावे लागेल. कारण पुढच्या ६० वर्षात दिवाळी कशी होईल, याची झलक आम्ही यावर्षीच अनुभवली. आमच्यापैकी काहींना नाशिक, पुणे, संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी दिवाळीसाठी जायचे होते. आपल्यामुळे आम्ही वेगवेगळ्या एक्स्प्रेस वे वर दिवाळी साजरी केली. आमच्या मागेपुढे लांबच लांब गाड्या होत्या. फटाक्यांच्या आवाजाऐवजी गाड्यांचे वेगवेगळे हॉर्न वाजत होते. मधेच लवंगी फटाक्यांचे आवाज काढत सोबतची लहान मुलं रडत होती. आमच्यातले काही आईबाप "प्रेमाने" त्यांच्या गालावर टिकल्या उडवत होते. पाहुण्यांसाठीचा फराळ आम्ही वेगवेगळ्या एक्स्प्रेस वे वरच संपवला. अशा दिवाळीची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
समृद्धी महामार्गाद्वारे नाशिक, संभाजीनगर, नागपूरला जाणारे आणि मुंबई-गोवा महामार्गाद्वारे कोकणात जाणारे प्रवासी तर फारच भाग्यवान ठरले. समृद्धी महामार्ग इतका गजबजलेला त्यांनी पहिल्यांदा पाहिला. सोबत नेलेला लाडू-चिवडा समृद्धी महामार्गातच संपला. गाडीत पेट्रोल, डिझेल टाकण्यासाठी दोन-दोन किलोमीटरची रांग कशी असते, हा अनुभव घेणे केवळ तुमच्यामुळेच शक्य झाले. समृद्धी महामार्गावर अर्धा कप चहा तीस रुपयांना मिळतो हेही आम्हाला कळाले. मुंबई-गोवा महामार्गावर पुस्तकच काढले पाहिजे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी का म्हणाले याचा शोध लागला. दिवाळीत प्रवास करणारे लाखो प्रवासी सरकारचा, मंत्र्यांचा कसा आणि किती उद्धार करतात, हेही याचि देही याचि डोळा अनुभवले...! काही प्रवाशांनी तर अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या आई-वडिलांची पदोपदी "प्रेमाने" केलेली आठवण स्मरणात राहणारी होती.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक रस्त्यावर पाहुणेरावळे किमान एक ते दीड तास कसे थांबतील याचे तुम्ही केलेले नियोजन अफलातून होते. दिवाळी, छठपूजेनिमित्त लाखो मुंबईकर बाहेर गेले. म्हणून उरलेले मुंबईकर रस्त्यावर उतरले खरे. मात्र, त्यांना त्यांच्या घरी परत जाण्यासाठी किमान दोन ते अडीच तास लागत होते. आपण नेमलेल्या ठेकेदारांनी ठिकठिकाणी करून ठेवलेल्या खड्यांमुळे हे शक्य झाले. त्यासाठी त्यांचे विशेष आभार..! अशा ठेकेदारांवर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्यांचे आणखी विशेष आभार..!! आणि आपल्यासारख्या अनुभवी, अभ्यासू नेत्यांची सरकार चालवण्यासाठी निवड करणाऱ्या जनतेचे तर लाख-लाख आभार..!!!
यावर्षी दिवाळीत अनेक चमत्कार घडले. आमच्या शेजाऱ्याकडे दुधामध्ये फक्त युरिया निघाला. आमच्याकडे दूध तापवले की रबर पण निघत होते. चिवड्यासाठीच्या शेंगदाण्यात तेवढ्याच आकाराचे रंगीत दगड निघाले. शेतात पिकवलेले तांदूळ तर सगळेच खातात; पण आम्ही प्लास्टिकचे तांदूळ खाल्ले..! खव्यामध्ये साबुदाण्याची पावडर, कॉर्नफ्लॉवर यांचा संगम बघायला मिळाला. शुद्ध साजूक तुपात पामतेल, डालडा कसा असतो, ते बघितले. मिठामध्ये चुन्याची पावडर... हळदीमध्ये पिवळा स्टार्च आणि भुसा... तिखटामध्ये विटांची पावडर, ऑइल केक पावडर तर वेगवेगळ्या फ्रुट ज्यूसमध्ये साखरेचा सिरप आणि कृत्रिम रंगांची लयलूट होती. चकल्या तळण्यासाठी आणलेले तेल चार-पाच वेळा तळून पुन्हा फिल्टर केलेले होते. विशेष म्हणजे त्यात पाम ऑइल होते. त्यामुळे चकल्या फारच कुरकुरीत झाल्या. साखरेत खडूची पावडर, वॉशिंग सोडा मिसळल्यामुळे आमच्याकडे आलेली साखर पांढरीशुभ्र दिसत होती. तुमच्याकडे काळपट साखर आली असेल. त्यामुळे तुम्हाला टुक टुक....
तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या छान-छान भेट वस्तू मिळाल्या असतील. आमची दिवाळी भरपूर भेसळीचे पदार्थ खाल्ल्यामुळे अतिशय उत्तम झाली. त्यामुळे पुढची दिवाळी येईपर्यंत आम्हाला वारंवार अपचन, गॅस, आतड्यांची सूज, वाईट कोलेस्टेरॉल, रक्तदाब अशा भेटी हमखास मिळतील, असे डॉक्टर सांगत होते. कृत्रिम रंग, रासायनिक स्वाद वापरलेले पदार्थ खाल्ल्यामुळे आमच्या त्वचेवर पुरळ, खाज, लालसरपणा दिसेल. डोळ्यांची जळजळ नक्की वाढेल, असेही त्यांनी सांगितले. आपण दिवाळीला आमची किती काळजी घेता. त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही आमच्या परीने आपल्याला मतदानातून रिटर्न गिफ्ट देण्याचा नक्की प्रयत्न करू....