'मुसलमानांनी हिंदूंचा आदर केला पाहिजे’ हे विश्व हिंदू परिषदेच्या अशोक सिंघल यांनी त्यांना बजावून सांगितल्यानंतर प्रवीण तोगडिया या त्याच संघटनेच्या हुच्च पदाधिकार्याने त्यांना ‘मुजफ्फरनगरच्या दंगलीची आठवण ठेवा’ अशी धमकी दिली आहे. तोगडियांनी आपल्या धमकीत गुजरातचेही नाव का घेतले नाही, हा या स्थितीत पडलेला प्रश्न आहे. मुजफ्फरनगरातील मुसलमानविरोधी दंगल, गुजरातेतील दंगलीच्या तुलनेत लहान होती आणि तीत मारले गेलेले अल्पसंख्य संख्येनेही कमी होते. गुजरातच्या दंगलीत दोन हजारांवर मुसलमान मारले गेले आणि अनेक स्त्रियांवर सामूहिक बलात्कारही झाले होते. धमकी परिणामकारक करायची तर गुजरात हे मुजफ्फरनगरहून अधिक जळजळीत होते. शिवाय गुजरातेतील दंगल ज्यांच्या कृपादृष्टीने घडून आली, ती माणसे आता दिल्लीत सत्तेवर जाऊन बसली आहेत. या तुलनेत मुजफ्फरनगरातील गुन्हेगार अजून संशयास्पद आहेत. ते समाजवादी पक्षाचे असल्याचे सांगितले जात असले, तरी तो पक्ष त्या राज्यापुरता र्मयादित व प्रादेशिक आहे. झालेच तर त्याचे नेते मुलायमसिंह यादव हे मुसलमान व अल्पसंख्यकांचे संरक्षक म्हणूनही ओळखले जाणारे आहेत. त्यामुळे सिंघल आणि तोगडिया यांचा निशाणा त्यांना हवा असणारा असला तरी त्यांची आयुधे चुकली आहेत. गुजरातमधील न्यायालयांनी आता माया कोडनानी या २८ वर्षांची शिक्षा झालेल्या माजी मंत्रिणीला जामिनावर मोकळे सोडले आहे. सुरतमधील बॉम्बस्फोटात अडकलेले ११ जणही न्यायालयाने निर्दोष असल्याचे जाहीर केले आहे. बाबू बजरंगीही असाच सुटकेच्या मार्गावर आहे. अमित शहांना तारखांमागून तारखा मिळत आहेत आणि त्यांना कोर्टात हजर न राहण्याच्या परवानग्याही दिल्या जात आहेत. या देशात हिंदूंची संख्या ८0 टक्क्यांहून अधिक, तर मुसलमानांची १५ टक्के आहे. ज्यांना द्वेषाचे राजकारण पेरून धर्मद्वेषाची पिके काढायची आहेत, त्यांना हा अल्पसंख्याकांचा वर्ग अर्थातच पुरेसा आहे. त्यातून सिंघल व तोगडिया यांना आता कामे उरली नाहीत. दिल्लीत मोदींचे सरकार आल्यापासून विश्व हिंदू परिषदेला तसेही रिकामपण आले आहे. शिवाय मोदींनी या मंडळीला आपल्यापासून जमेल तेवढे दूर ठेवल्याने लोकसभा निवडणुकीच्या काळातही त्यांची नावे फारशी कुठे ऐकू आली नाहीत. त्यामुळे ‘आम्ही आहोत आणि आमचा मुस्लिमद्वेष अजून तेवढाच टोकाचा आहे’ हे सांगण्याची संधीही त्या बिचार्यांना मिळाली आहे. त्यांचे हे विषाक्त बोल, धमकीवजा भाषा, अल्पसंख्याकांच्या मनात भयगंड उभा करणे हा भारतीय दंड संहितेनुसार अपराध आहे. पण सिंघलांना कोण विचारणार आणि तोगडियांना कोण धरणार? आता तर त्यांचे ‘सैंयाच कोतवाल’ झाले आहेत. मात्र सिंघल किंवा तोगडिया ही माणसे येथे महत्त्वाची नाहीत. ती ज्या वृत्तीचे प्रतिनिधित्व करतात ती जास्त घातक आहे. एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेली शंभरावर राष्ट्रे जगात आहेत आणि ती स्वतंत्र व सार्वभौम आहेत. त्यांना धाकात ठेवणे अमेरिका व रशियालाही कधी जमले नाही. या स्थितीत १८ कोटींचा धर्मसमुदाय धाकाच्या बळावर आपण नियंत्रणात ठेवू शकू, असे एखाद्याला वाटणे हाच मुळात वेडेपणा आहे. सिंघल म्हणतात तसा मुसलमानांनी हिंदूंचा आदर जसा करावा, तसा हिंदूंनीही मुसलमानांचा आदर केला पाहिजे. त्याही पुढे जाऊन माणसाने माणसाचा आदर करणे व त्याच्याशी माणसासारखे वागणे ही जगातल्या सर्व धर्मांएवढीच हिंदू धर्माचीही शिकवण आहे. मात्र, त्या महान धर्माचे आपणच मुखंड आहोत, असा भ्रम करून घेतलेली खुजी माणसे जेव्हा अशी धमकीवजा भाषा बोलतात, तेव्हा त्यांची कीव येते. ‘हेच का याचे पुढारी’ असे मनात येऊन त्या थोर धर्माचीही काळजी वाटू लागते. पण त्यांना कोण आवरणार? रामदेवबाबाला मोदींनी आवरले, आसारामला सरकारनेच दूर केले, सिंघल व तोगडियासारख्यांना आता कोण आवरील? की ते असेच बेताल बोलत राहतील? तसा ‘तोगडियांनी त्यांचे मानसिक संतुलन गमावले आहे, नरेंद्र मोदींनी त्यांना आगर्याच्या पागलखान्यात पाठविले पाहिजे’ असा सल्ला काँग्रेसच्या राशिद अल्वींनी दिला आहे. या देशाला धार्मिक सलोखा व शांतता यांची गरज आहे आणि सध्या ती देशात नांदताना दिसत आहे. मात्र असा सलोखा व शांतता हीच सिंघल आणि तोगडिया यांची डोकेदुखी आहे. त्यांना या देशाचे धार्मिक व सांस्कृतिक बहुलपण पाहवणारे नाही. ते नाहीसे करणे व त्यासाठी धमक्या देणे, चिथावण्या देणे, दंगली घडवणे यात त्यांना रस आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त होणे ही राष्ट्रीय गरज आहे.
‘सैंया भये कोतवाल..’
By admin | Updated: July 22, 2014 09:42 IST