‘सामीच्या संघाने मला क्षणभर तरुण केले’!

By Admin | Updated: April 22, 2016 02:45 IST2016-04-22T02:45:07+5:302016-04-22T02:45:07+5:30

लंडनमधला माझा एक मित्र मार्च महिन्याच्या शेवटी एका पबमध्ये गेला होता. त्यावेळी भारतात रात्र व तिथे दुपार असल्याने पबमध्ये फारशी गर्दी नव्हती.

'Sami team made me young for a moment'! | ‘सामीच्या संघाने मला क्षणभर तरुण केले’!

‘सामीच्या संघाने मला क्षणभर तरुण केले’!

रामचन्द्र गुहा, (ज्येष्ठ इतिहासकार आणि स्तंभलेखक)
लंडनमधला माझा एक मित्र मार्च महिन्याच्या शेवटी एका पबमध्ये गेला होता. त्यावेळी भारतात रात्र व तिथे दुपार असल्याने पबमध्ये फारशी गर्दी नव्हती. मित्राने पब मालकाला टिव्हीवर ‘स्काय स्पोर्ट्स’ चॅनल लावण्याची विनंती केली. त्याला टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी चालू असलेला उपांत्य सामना बघायचा होता. पब मालकाने त्याची विनंती मान्य केली. मग तोही एक बियर मागवून सामना बघू लागला. त्याच्या शेजारी बसलेल्या तिशीतल्या एका इंग्लिश महिलेने सहज विचारले, ‘भारताचा सामना कुणासोबत आहे’? त्याचे उत्तर होते वेस्ट इंडीज. त्यावर ती म्हणाली, ‘मग वेस्ट इंडीजच जिंकणार. माझे वडील मला नेहमी सांगत आले की तेच जिंकतात’. त्या इंग्लिश महिलेचे वडील कदाचित ७० च्या दशकात लहानाचे मोठे झाले असावेत. कारण त्यावेळी वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईडच्या संघाने इंग्लंडच्या टोनी ग्रेगच्या संघाला अक्षरश: लोटांगण घालायला लावले होते. बोथम, गूच, गोवर आणि कंपनीला ब्लॅकवॉश दिल्यानंतर मात्र लॉईडला तिरस्कार आणि कौतुक अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागला होता. हीच आठवण कदाचित त्या क्रिकेटविषयी फारसे ज्ञान नसलेल्या इंग्लिश महिलेच्या वडिलांनी मनात कायम ठेवली असावी.
मी सुद्धा लहानपणापासून असेच मानीत आलो की, वेस्ट इंडीजचा संघ नेहमीच जिंकत असतो. माझ्या आठवणीनुसार कसोटी सामन्यांचे समालोचन ऐकण्याचा माझा पहिला अनुभव १९६६ सालचा आहे. त्या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ गॅरी सोबर्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये खेळत होता. त्यानंतर काही वर्षांनी मी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. मला आॅस्ट्रेलियन दूतावासाकडून १९६०-६१च्या कसोटी सामन्याची ध्वनिचित्रफीत मिळाली होती. १९७१-७२साली सोबर्सने केलेल्या द्विशतकाची ध्वनिचित्रफीतही मिळाली होती. त्या खेळीला डॉन बॅ्रडमन, ‘आतापर्यंत बघितलेली उत्कृष्ट खेळी’ असे म्हणत असत. या चित्रफिती मग मी कॉलेजमध्ये मोठ्या गर्दीसमोर दाखवल्या होत्या. मला विवियन रिचर्डस इतकेच सोबर्सचेही कौतुक होते. मी दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी असताना पहिल्यांदा रिचर्डसला फलंदाजी करताना पाहिले होते. त्याने फिरोज शाह कोटला मैदानावर १९२ धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्याचा एक षटकार तर एवढा उत्तुंग होता की तो फिरोज शाह कोटला मैदानाच्या उत्तर दिशेला आणि मैदानाच्या बाहेर गेला होता. जणू चेंडूने नव्या दिल्लीतून जुन्या दिल्लीत उडी मारली होती. त्याच्या बारा वर्षानंतर रिचर्डसला त्याच मैदानावर खेळताना बघितले होते. त्याने त्या कसोटी सामन्यातसुद्धा विजयी शतक केले होते, पण त्यावेळी तो सामन्याचा चौथा डाव होता. तसा डाव लडखडतच होता, कारण भारताचे जादुई फिरकी गोलंदाज समोर होते. त्याच्या आणखी दोन वर्षांनी फिरोज शाह कोटला मैदानावरच भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रिचर्डस फारशी फलंदाजी करू शकला नाही. पण उत्कृष्ट गोलंदाजी करत त्याने तो सामना वेस्ट इंडिजला जिंकून दिला होता. त्याने त्या सामन्यात सहा बळी घेतले होते.
माझ्या पिढीतल्या भारतीयांसाठी वेस्ट इंडीज संघ महान होता. पण काही वर्षानंतर जेव्हा वेस्ट इंडीज संघ अयशस्वी ठरू लागला, तेव्हा आम्हाला क्रिकेटच्या खेळातून काही तरी हरवले आहे, असे वाटू लागले. त्यापायीच माझ्यासारख्या लोकांसाठी भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर हरणे फारसे मनावर घेण्यासारखे नसते. ही भावना कोलकात्यात जास्त प्रबळ आहे. तिथल्या प्रेक्षकांना भारत-वेस्ट इंडीज सामन्यांचा इतिहास चांगलाच माहित आहे. ज्या बंगाली प्रेक्षकांनी वॉरेल आणि रामदीनला १९५० च्या दशकात खेळताना बघितले होते त्यांनी त्यांच्या आठवणी पुढच्या पिढीकडे सरकवल्या, तर ज्यांनी १९७०च्या दशकात रिचर्डस आणि रॉबर्टसला खेळताना बघितले आहे त्यांनीही त्यांच्या आठवणी पुढे सरकवल्या आहेत.
दरम्यान डेरेन सामी आणि त्याचा संघ टी-२० सामन्यात घौडदौड करीत असताना मी कॅरेबियन क्रिकेटवर आधारित एक उत्कृष्ट पुस्तक वाचत होतो, पुस्तकाचे नाव होते ‘धिस इज फायर इन बॅबिलॉन: हाऊ द वेस्ट इंडीज क्रि केट टीम ब्रॉट अ पीपल टु इट्स फीट’ आणि पुस्तकाचे लेखक आहेत सिमॉन लिस्टर. याच नावाचा एक लघुपटदेखील तयार करण्यात आला आहे. पण लिस्टर यांचे पुस्तक त्याहून अधिक सरस आहे. पुस्तकातल्या ३०० पानात सव्वा तासाच्या लघुपटापेक्षा व्यापक माहिती आहे. विशेष म्हणजे पुस्तकाच्या लेखकाचे कॅरिबियन इतिहासाविषयीचे निरीक्षण लघुपटाच्या दिग्दर्शकापेक्षा अधिक आहे.
इंग्लिश लेखक आणि टीकाकार नेविल कार्डस यांनी १९३०च्या वेस्ट इंडीज संघाचा खेळ पाहून आपल्या अलंकारिक भाषेत म्हटले होते की, ‘वेस्ट इंडीज संघाची क्रिकेट शैली म्हणजे वेस्ट इंडीज मधल्या तळपत्या सूर्यप्रकाशाचा, तिथल्या वातावरणाचा आणि तेथील लोकांच्या नैसर्गिक जीवनशैलीचा परिणाम आहे’. पुस्तकात ते पुढे म्हणतात, ‘क्लाईव्ह लॉईडच्या संघाचे यश हे त्याच्या कठोर मेहनतीवर, कुशल नीतीवर आणि दीर्घकालीन नियोजनावर अवलंबून होते. हीच गोष्ट टी-२०चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघालाही लागू पडते. धोनी जिथे फिरकी गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये पुढे आणण्यास घाबरत होता तिथे सामीने सुरुवातीच्या षटकांमध्ये धीम्या गतीच्या गोलंदाजांना पुढे आणण्याची हिंमत दाखवली होती.
‘फायर इन बॅबिलॉन’ या लघुपटात आफ्रोे-कॅरिबियन लोक राज्यकर्त्या गोऱ्यांवर विजय मिळवत असल्याचे एकांगी चित्रण झाले आहे. पण लिस्टर यांच्या पुस्तकात गुलामगिरीचे भयानक चित्रण आणि क्रिकेटने कशा प्रकारे कृष्णवर्णीय अभिमान तसेच सामाजिक उद्धार करण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला याचे यथोचित लिखाण केले आहे. चित्रपटात इंडो-कॅरीबियन खेळाडूंचा उल्लेख नाही पण लिस्टर यांच्या पुस्तकात १९५० च्या दशकातील रामदिन, १९६० च्या दशकातील कन्हाय आणि सालोमन, ७० च्या दशकातील कन्हाय आणि कालीचरण यांचा वेस्ट इंडीज संघाच्या यशातील सहभाग मात्र आवर्जून उल्लेखलेला आहे. सध्याची नावे म्हटली तर दिनेश रामदिन आणि सॅम्युअल बद्री यांची आहेत.
टी-२० हे कसोटी सामने नाहीत. कसोटीसारख्या दीर्घकालीन उत्कृष्ट क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडीज संघ आव्हानात्मक नाही. कदाचित त्यांचा संघ पुनरागमन करेल सुद्धा. तूर्तास मी डेरेन सामी आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आभार मानतो, क्षणभर का होईना पण त्यांनी मला तरुण केले.

Web Title: 'Sami team made me young for a moment'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.