समता हीच खरी कविता ?

By Admin | Updated: January 30, 2016 03:53 IST2016-01-30T03:53:15+5:302016-01-30T03:53:15+5:30

जगातील अवघ्या ६२ धनवंतांची संपत्ती त्यांच्या तळाशी असलेल्या ३६० कोटी लोकांच्या एकूण मालमत्तेहून मोठी आहे, हा आॅक्सफॅम या जागतिक कीर्तीच्या संघटनेचा अहवाल

Samata is the real poem? | समता हीच खरी कविता ?

समता हीच खरी कविता ?

जगातील अवघ्या ६२ धनवंतांची संपत्ती त्यांच्या तळाशी असलेल्या ३६० कोटी लोकांच्या एकूण मालमत्तेहून मोठी आहे, हा आॅक्सफॅम या जागतिक कीर्तीच्या संघटनेचा अहवाल भारतातील गरीबांएवढेच जगभरच्या गरीबांचे डोळे उघडणारा व सध्याच्या व्यवस्थेत त्यांच्यावर लादल्या गेलेल्या विषमतेएवढाच त्यांच्या होत असलेल्या लुटीची जाणीव करून देणारा आहे. आॅक्सफॅम ही मार्क्सवाद्यांची संघटना नाही तर ती जगभरातील सामाजिक व सेवाभावी संस्थांसाठी पैसे गोळा करणारी व राजकारणापासून दूर असलेली एक जागतिक कीर्तीची प्रतिष्ठित संघटना आहे. जगातील लोकसंख्येची एक टक्का धनवंत विरुद्ध ९९ टक्के गरीब अशी सरळ विभागणी करणारी ही आकडेवारी आहे. औद्योगीकरण व जागतिकीकरण यासोबतच उत्पादकतेत झालेली प्रचंड वाढ यामुळे जगाच्या सुबत्तेत मोठी भर पडली. मात्र तिचे न्याय्य वाटप कधी झाले नाही आणि त्याचा आग्रह धरणाऱ्या संघटनाही दरम्यानच्या काळात दुबळ््या झाल्या. समाजवादी विचारांची गेल्या चार दशकात झालेली पीछेहाट आणि स्पर्धेच्या व खुल्या अर्थव्यवस्थेवर उमटविली गेलेली पुरोगामीत्वाची मोहर यामुळे आलेल्या सुबत्तेचे न्याय्य वाटप करणे हा विचारच नव्हे तर ती भावनाही मागे पडली. दरम्यान ज्यांच्या वाट्याला प्रचंड श्रीमंती आली त्यांनी आपल्या सुबत्तेच्या रक्षणासाठी आवश्यक त्या यंत्रणाही निर्माण केल्या. मार्क्स धर्माला अफूची गोळी म्हणायचा. आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य, हे पूर्वजन्मीच्या पापामुळे आले आहे असा समज गरीबांच्या मनात रुजविल्याखेरीज तो वर्ग आहे तसा जगण्यात समाधान मानत नाही आणि तो तशा समाधानात गर्क झाल्याखेरीज धनवंतांची सुखाची साधने सुरक्षितही होत नाहीत. त्यामुळे वाढती धार्मिकता वा धर्मांधळेपणा हेही या धनवंतांनीच स्वत:भोवती उभारलेले संरक्षक कवच आहे असे मार्क्स म्हणायचा. सामान्य माणसे जातीधर्माचे, वर्णपंथाचे किंवा तसलेच किरकोळ संघर्ष करण्यात जोवर गुंतलेली असतात तोवर त्यांच्या मनात त्यांच्या वाट्याला आलेल्या अभावाची खरी कारणे शोधण्याचा विचारही येत नाही. आजच्या आपल्या जगाचे खरे अर्थचित्र असे आहे. खंत याची की यात काही गैर आहे, कोणीतरी लुटत आहे व आपण लुटले जात आहोत याची साधी भ्रांतही कोणाला असत नाही. भारतासारख्या देशात काही लक्ष कोटींची मालमत्ता असणारी किमान एक डझन औद्योगिक घराणी आहेत आणि त्यांचा वार्षिक आयव्यय देशातील कोणत्याही राज्याच्या जमाखर्चाहून मोठा आहे. ही माणसे मग दानशूर होतात. समाजातल्या दानजीवी संस्थांवर व व्यक्तींवर ती दानाची मुक्त उधळण करतात. ती उधळण जमा करणाऱ्या व ती या दानजीवी वर्गात वाटणाऱ्या संस्थाही आता जगाच्या पातळीवर चांगल्या गलेलठ्ठ झाल्या आहेत. एनजीओ या नावाचे जे आपल्यातील आदरणीय समाजसेवक विदेशी पैशावर देशाची सेवा करतात ते यातलेच. यातले अनेक समाजसेवक गरीब व विकसनशील देशातील नवे उद्योग व प्रगतीच्या नव्या योजना अडवून धरणाऱ्या चळवळी चालवीत असतात. तसे करून त्यांना पैसा देणाऱ्या देशांच्या व त्यातील बड्या धनवंतांच्या मालमत्ता वाढत राहतील याची ते काळजी घेतात. अरुंधती रॉय या जागतिक कीर्तीच्या लेखिकेच्या संशोधनाचा एक निष्कर्ष असा की जगभरच्या बड्या धनवंतांनी या संस्थांकडे सोपविलेल्या दानाच्या रकमेचा वार्षिक आकडा ४५५ अब्ज डॉलर्स एवढा मोठा आहे. एका अर्थाने ही जागतिक स्तरावर काम करणारी एक पर्यायी अर्थव्यवस्था आहे. ती धनवंतांची संपत्ती वंचितांच्या रोषापासून दूर ठेवते आणि वंचितांच्या वर्गांना वर बसलेले धनवंत दानशूर असून ते आपल्याला मदत करणारे आहेत अशा भ्रमात ठेवीत असते. स्वाभाविकच मग या दानशूरांच्या दानगिरीचा गौरव होतो आणि त्यामुळे दिपून गेलेली माणसे आणि माध्यमे त्यांनी केलेल्या मिळकतीचे खरे मार्ग शोधण्याच्या भानगडीत पडत नाहीत. जगातल्या या दुहेरी अर्थव्यवस्थेची सुरुवात १९१० च्या दशकातच अमेरिकेत निर्माण झालेल्या काही फाऊंडेशन्सनी केली. आता या फाऊंडेशन्सच्या लहानमोठ्या आवृत्त्या साऱ्या जगभरात तयार झाल्या आहेत. त्यांच्याकडून उपकृत होणाऱ्यात केवळ सामाजिक संस्थाच असतात असे नाही. राजकीय पक्ष, पुढारी, माध्यमे आणि समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरविणारी अनेक माणसेही त्यात असतात. धनवंतांवर जास्तीचे कर लावा आणि त्यातून येणारे उत्पन्न गरीबांच्या विकासावर खर्च करा हा विचारच मग पराभूत होतो. कारण कर लावणाऱ्या राज्यासारख्या संस्था व तिचे चालक याच धनवंतांच्या सोयीनुसार अर्थकारण आखतात आणि राज्य कारभार चालवितात. सारांश, बडे अर्थकारण, बडे राजकारण आणि तेवढेच मोठे धर्मकारण यांची वंचितांच्या वर्गाविरुद्ध एक अघोषित पण सर्वंकष अशी युती जगात कार्यरत असते. परिणामी विषमता हे वास्तव होते आणि समतेला कवितेखेरीज फारसे मोठे मोल उरत नाही.

Web Title: Samata is the real poem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.