शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दादांची रिक्षा अन् बसस्टॉपवर उभे एकटेच फडणवीस; दादांनी कचकन् ब्रेक मारला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 07:52 IST

बसस्टॉपवर फडणवीस एकटेच उभे पाहून दादांना गलबलून आलं. दादांनी कचकन् ब्रेक मारला न् ते म्हणाले, ‘का होऽऽ बस हुकलीय की काय तुमची?’

- सचिन जवळकोटे

इंद्र दरबारात भलतंच आक्रित घडलं.. नृत्य करणाऱ्या अप्सरांनी चक्क दरबारातील प्रमुखांच्या आसनावर स्थानापन्न होण्याचा हट्ट धरला. हे पाहून दरबारात अस्वस्थता वाढली. इंद्रांनी टाळी वाजवत नारदमुनींना पाचारण केलं. अप्सरा हट्ट दूर करण्याची आज्ञा केली. नारदांनीही आश्चर्यानं रंभेला विचारलं, ‘‘आता हे काय नवीन? ज्यानं त्यानं स्वत:चं काम करावं. दुसऱ्याच्या कामात कशाला नाक खुपसायचं?”तेव्हा उर्वशी फुरंगटून म्हणाली, ‘हा नियम मग, भूतलावर का लागू नाही? राज्यकारभार हाकणाऱ्यांनी रिक्षा चालविलेली चालते. मग आम्ही राज आसनावर बसलो, तर बिघडलं कुठं?’ 

रिक्षाची ही नवीनच ‘ब्रेकिंग’ ऐकून गोंधळलेल्या इंद्रांनी नारदांकडं बघितलं. त्यांच्या नजरेतला आदेश ओळखून मुनींनीही तत्काळ भूतलाकडं कूच केली. एका ऑटो कंपनीत खुद्द अजितदादा चक्क रिक्षा चालवताना दिसले. चक्कर मारता-मारता अनेकांना ते लिफ्टही देत होते. त्यांना अगोदर हातात मृदंग घेऊन उभारलेले चंदू दादा पुणेकर दिसले.पहिल्या ‘दादां’नी रिक्षा थांबविताच मृदंगावर थाप मारत दुसरे ‘दादा’ बोलले, ‘कोल्हापूरचे मुश्रीफभाई टाळ वाजवू शकत असतील तर मी का नाही?’  त्यांच्या थापेला दाद देत अजितदादांनी विचारलं, ‘चलाऽऽ कुठं सोडू?.. कोथरुडला की कोकरुडला?’ 

आपल्याला कोल्हापूर व्हाया सांगली रिटर्न पाठविण्याचा विचार केला जातोय, हे लक्षात घेताच चंदू दादा तिथून हळूच सटकले. रिक्षा निघाली. रस्त्यात यात्रा दिसली. नारायण कणकवलीकर लोकांसमोर वाकून ‘विश्वास’ मागत होते. तेव्हा जमावातला एकजण पुटपुटला, ‘काय गरज यात्रा काढायची.. आमचा तुमच्यावर खूप विश्वास. कुठल्याही पार्टीत जास्त दिवस तुम्ही टिकत नसता, हाच मोठा विश्वास.’हे ऐकताच नारायणपुत्रानं तत्काळ मोबाईलवर ‘टिवटिव’ केलं, ‘आता जो कुणी बोलला तो नक्कीच परबांचा हस्तक. मी  आता त्याची हिस्ट्रीच बाहेर काढणार.’ 

एवढ्यात रिक्षात आठवले येऊन बसले. त्यांनी नेहमीप्रमाणं मूडमध्ये येत नारायणांना सल्ला दिला, ‘तुम्ही बोलत रहा, ओरडत रहा, तरच तुमची खुर्ची टिकली समजायची.’ त्यानंतर त्यांनी कोटावरच्या बटणाशी चाळा करत एक ताजी गरमागरम कविता सादर केली.. राणेंना प्रकरण पडलं महागात,कारण त्यांची जीभ तिखट..  म्हणूनच ऐकत जा, माझी कविता फुकट. पुढची कविता कानावर नको पडायला, म्हणून दादांनी घाईघाईनं त्यांना कॉर्नरला सोडलं.. अन् रिक्षा सोडली सुसाट.

पुढच्या चौकात परब अन् नाथाभाऊ दिसले. बिच्चारे दोघंही हिरमुसल्या चेहऱ्यानं एकमेकांच्या चेहऱ्यावरचा घाम पुसत होते. दादांनी ब्रेक लावत विचारलं, ‘काय, नाष्टा वगैरे करायचा का?’  खरंतर अपचन झाल्यानं दोघांचंही पोट बिघडलं होतं. तरीही दादांना दुखवायचं नाही म्हणून रिक्षात बसता-बसता नाथाभाऊंनी विचारलं, ‘काय खायचं? ’ तेव्हा दादा सहजपणे बोलून गेले, ‘इडली!’.. पण, काय सांगावं, हा शब्द कानावर पडताच दोघेही क्षणार्धात गायब.

आता ‘इडली’मध्ये एवढं घाबरण्यासारखं काय होतं, याचा विचार करत अन् डोकं खाजवत दादांनी गिअर टाकला. रिक्षा पुढं निघाली. बसस्टॉपवर फडणवीस एकटेच उभे होते. त्यांना पाहून दादांना गलबलून आलं. दादांनी कचकन् ब्रेक मारला, ‘का होऽऽ बस हुकलीय की काय तुमची ?’ जाकिटाच्या खिशातला हात काढत खिन्नपणे फडणवीस म्हणाले, ‘तुम्हाला तीन चाकी रिक्षा भेटली म्हणून माझी बस हुकली!’ 

एवढ्यात या दोघांवर बारीक लक्ष ठेवूनच असलेल्या रौतांनी तातडीनं थोरले काका बारामतीकरांना कॉल केलाच. मग काय.. उद्धोंसह थोरले काका स्पॉटवर हजर. बाळासाहेब संगमनेरकरही घाईघाईनं पोहोचलेच. त्या दोघांना बघून दादा गडबडले. त्यांनी किक मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काकांनी रिक्षाची चावी काढून ‘उद्धों’ना दिली, न् म्हणाले, ‘चला, आता तुम्ही बसा पुढच्या सीटवर. आम्ही बसतो मागं.‘ नाराज झालेले दादा चरफडत खाली उतरले, ‘माझी खुर्ची उद्धोंना देऊन मग मी कुठं बसू?’ त्यांच्या या प्रश्नावर रौतांनी मधला मार्ग काढला. म्हणाले, ‘तुम्ही क्लिनरच्या सीटवर बसा.’ हे ऐकून दादा अजून चिडले. ‘रिक्षाला कुठं असली सीट असते का?’  त्यांच्या या अस्वस्थ प्रश्नावर ‘थोरले काका’ शांतपणे उत्तरले, ‘का.. डीसीएम पोस्ट तरी कुठं कायद्यात असते का? आपण तयार केलीच ना?’ नारायऽऽणऽऽ नारायऽऽणऽऽ sachin.javalkote@lokmat.com

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना