(रा.स्व.) संघम् शरणम् गच्छामि

By Admin | Updated: October 19, 2016 06:34 IST2016-10-19T06:34:42+5:302016-10-19T06:34:42+5:30

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर मूलत: रा.स्व. संघाचे एक स्वयंसेवक आणि त्यातून ‘आयआयटीयन’.

(RV) Sangam Saranam Gachhami | (रा.स्व.) संघम् शरणम् गच्छामि

(रा.स्व.) संघम् शरणम् गच्छामि


गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर मूलत: रा.स्व. संघाचे एक स्वयंसेवक आणि त्यातून ‘आयआयटीयन’. तांत्रिक शिक्षण घेतलेले व संघाच्या मुशीत वाढलेले लोक सामान्यत: अत्यंत आत्मकेन्द्री आणि बरेचसे घुर्रट वगैरे असतात, असा अनेकांचा अनुभव. पण पर्रिकर तसे नसावेत असा संशय घ्यायला त्यांनीच एकदा नव्हे दोनदा जागा करुन दिली आहे. उलट ते विनोदीच असावेत की काय असेच आता त्यांच्या संबंधित वक्तव्यांवरुन वाटू लागले आहे. मागील महिन्याच्या अखेरीस भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जो शल्यकर्मागत हल्ला (सर्जिकल स्ट्राईक) केला त्याचे श्रेय देशाचे संरक्षण मंत्री म्हणून पर्रिकरांना द्यायला तशीही कोणाचीच हरकत नाही आणि नव्हती. तसेही ‘लढे सिपाही, नाम सरदारका’ अशी म्हणच आहे. पण श्रेयाच्या बाबतीत एक महत्वाची बाब म्हणजे ते स्वत:च स्वत: घ्यायचे नसते तर समोरच्याने ते द्यायचे असते. त्यामुळेच १९७१च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भारतीय शांतीसेनेने बांगलादेशची जी निर्मिती केली, त्याचे संपूर्ण श्रेय नि:संशय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचेच असले तरी त्यांना त्यांचे श्रेय देण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. मागील महिन्याच्या अखेरीस भारतीय सेनेने जे शौर्य गाजविले आणि उरी येथील लष्करी तळावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन १९ जवानांच्या केलेल्या हत्त्येचा जो बदला घेतला, त्याचेही श्रेय देशाने आणि काही अपवाद वगळता देशातील राजकीय व्यवस्थेने पर्रिकर ज्या सरकारचे घटक आहेत, त्या मोदी सरकारला दिले होते. मुकाट्याने हे श्रेय पदरात पाडून घेण्याऐवजी पर्रिकरांनी एक मोठे चमत्कारिक आणि विनोदी वाटावे असे विधान केले. सीतेच्या शोधात तामिळनाडूपर्यंत गेलेल्या रामापुढे आता लंकेत कसे पोहोचायचे कसे आणि तत्पूर्वी आपला दूत तिथे पाठवायचा कसा, असा प्रश्न भेडसावू लागला. दूत म्हणून हनुमानाची निवडही केली गेली. पण तो तरी समुद्र उल्लंघून लंकेत दाखल होणार कसा, हा पुढील प्रश्न. त्यावर जांबुवंत पुढे सरसावला. त्याने हनुमानाला त्याच्या अंगी असलेल्या अचाट शक्तीचा साक्षात्कार घडविला, त्याच्यातील पुरुषार्थ जागा केला आणि मगच हनुमान उड्डाण करता झाला. या कथेचा आधार घेऊन पर्रिकर म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल होण्यापूर्वी भारतीय सेनेची अवस्था रामायणातील हनुमानासारखी होती. म्हणजे काय तर तिला तिच्या शक्तीची जाणीव नव्हती. पाकिस्तानबरोबरची सारी युद्धे जिंकूनदेखील भारतीय सेनेला तिच्या पराक्रमाची जाणीव नव्हती असा पर्रिकरांच्या विधानाचा मथितार्थ. मग ती जाणीव करुन देणारा या कलियुगातील जांबुवंत कोण, स्वत: पर्रिकर की पंतप्रधान नरेन्द्र मोदी? पण याचा निकाल त्यांनी जनतेवरच सोपवून टाकला आहे. पण ते विधान कमी झाले म्हणूनच की काय आता पर्रिकरांनी दुसरे विधान करताना, भारतीय सैन्याने जी कारवाई करुन आपल्या शौर्याचे दर्शन घडविले त्यामागील प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीत असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी काय किंवा स्वत: पर्रिकर काय, दोघेही संघ स्वयंसेवक आहेत. संघम् शरणम् गच्छामि हे त्या दोहोंचे जीवनध्येय असणे स्वाभाविक आणि अपेक्षितही आहे. लोकशाहीतील सैन्यदळे कितीही पराक्रमी असली तरी त्यांच्यावर नियंत्रण राजकीय व्यवस्थेतून निवडल्या गेलेल्या लोकनियुक्त सरकारचे असते. त्यामुळेच मोदी-पर्रिकर यांनी निर्णय घेतला आणि भारतीय लष्कराला स्वातंत्र्य दिले व त्यातूनच पराक्रम घडवून आणला गेला, हे सारे रीतीनेच घडले असले तरी लष्कराने जो पराक्रम केला त्याचा संघ विचारांशी आणि संघाच्या शिकवणुकीशी संबंध जोडणे म्हणजे एकप्रकारे लष्करालाही अकारण एखाद्या विचारसरणीशी जोडून टाकण्याचा प्रयत्न करणे. तसे करण्यातील धोके पर्रिकर जाणत नसतील असे नक्कीच नव्हे. मुळात पाकिस्तानने आजवर अनेकदा भारताची खोड काढली व भारताने एकदाच सणसणीत उत्तर दिले. त्यानंतर खुद्द पंतप्रधानांनीच म्हणे आपल्या साऱ्या मंत्र्यांना आणि खासदारांना ताकीद देऊन हिन्दीतून छाती पिटू नका (मराठीत याला वेगळा अर्थ आहे) असे सांगितले. पण तरीही ते चालूच आहे. ते चालू करणारे वा चालू ठेवणारे आमचे लोक नव्हेत आणि असलेच तर अतिउत्साही आहेत असे खुलासेही भाजपातर्फे करण्यात आले. पण आता खुद्द संरक्षण मंत्रीच छाती पिटत नसून दंड थोपटत आहेत आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम गाजविला त्याला भलतेच अन्वयार्थ चिकटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुळात भारतीय सैन्याने जो पराक्रम गाजविला ते काही निर्णायक आणि अंतिम युद्ध नव्हते. ते होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे पाकिस्तान आपली चाल सुरुच ठेवणार हे उघड आहे. परिणामी केवळ एका पराक्रमाचे पोवाडे गाण्याचा कार्यक्रम किती काळ सुरु ठेवायचा याचा आता साऱ्यांनीच विचार केलेला बरा.

Web Title: (RV) Sangam Saranam Gachhami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.