आदरणीय मंगेश पाडगावकर, आमच्या पिढीकडून तुम्हाला आदरांजली -
By Admin | Updated: January 4, 2016 14:49 IST2016-01-03T22:41:48+5:302016-01-04T14:49:22+5:30
‘सलाम’ तुमच्या लेखणीला! लिखाणातल्या विविधतेला! ‘सांग सांग भोलानात’मधल्या निरागसतेला, ‘आजोबाच्या खोलीत धुकं धुकं’मधल्या अलिप्ततेला!

आदरणीय मंगेश पाडगावकर, आमच्या पिढीकडून तुम्हाला आदरांजली -
- अश्विनी भावे,
सॅन फ्रान्सिस्को, बाय, ऐरिया
जानेवारी २०१६ -
‘सलाम’ तुमच्या लेखणीला! लिखाणातल्या विविधतेला!
‘सांग सांग भोलानात’मधल्या निरागसतेला,
‘आजोबाच्या खोलीत धुकं धुकं’मधल्या अलिप्ततेला!
‘सलाम’मध्ये चितारलेल्या मध्यमवर्गीय घुसमटीला नि,
लाचार जगण्यावर मारलेल्या चपराकीला!
‘सलाम’ खळे-पाडगावकर घट्ट मैत्रीला,
अन् त्या शब्द-सुरांच्या जादूला!
‘सलाम’ तुमच्या प्रेमाला, प्रेमाच्या विविध छाटांना!
‘जागून ज्याची वाट पहावी’ असे प्रेम,
‘मुजोर वाऱ्यानं उडणाऱ्या बटीत’ हरवलेलं प्रेम,
‘तुमचं आमचं सेम’ असलेलं प्रेम,
‘झोपाळ्यावाचून झुलणारे’ प्रेम,
प्रेम घननिळा होऊन बरसणारे,
‘परत फिरा रे’ म्हणता डोळ्यातून झिरपणारे!
पाडगावकर, तुमच्या बोलक्या शब्दात, खास वाचन शैलीत, इतकी वर्षं, तुम्ही आमच्या पिढीला गुंतवून ठेवलेत. कधी बोलगाणी, कधी बालगाणी, कधी वात्रटिका, कधी भावगीते... एखाद्या जिप्सीसारखे आम्ही एका कवितेकडून दुसऱ्या कवितेकडे फिरत राहिलो आणि नकळत, तुमच्या इतकं जमणार नाही तरी, आयुष्यावर प्रेम करायला शिकलो! तुमच्या लेखणीविना सारं जग आता मुकं मुकं मुकं!!
मनातलं सांगू, तुमच्या लेखणीइतकंच मला आहे अप्रूप तुमच्या जाड भिंगाच्या चष्म्याचं! तो मला हवाय. कारण मला तुमच्या डोळ्यांतून हे जग पाहायचंय. मलादेखील झोपाळ्यावाचून झुलायचंय, या जगण्यावर शतदा प्रेम करायचंय!