सरस्वतीपुत्राचा सन्मान

By Admin | Updated: July 20, 2015 22:44 IST2015-07-20T22:44:18+5:302015-07-20T22:44:18+5:30

‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ या आपल्या खळबळजनक ग्रंथाने लोकचर्चेत आलेले आमचे नांदेडचे मित्र शेषराव मोरे यांची चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या

Respect for Saraswatiputra | सरस्वतीपुत्राचा सन्मान

सरस्वतीपुत्राचा सन्मान

‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला’ या आपल्या खळबळजनक ग्रंथाने लोकचर्चेत आलेले आमचे नांदेडचे मित्र शेषराव मोरे यांची चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे ही जेवढी अभिनंदनीय तेवढीच एका चांगल्या व निर्भीड अभ्यासकाला अभिवादन करणारी घटना आहे. स्पष्टच सांगायचे तर अनंतराव भालेराव आणि नरहर कुरुंदकर यांच्या पश्चात शेषरावांच्याएवढा मुस्लीम इतिहासाचा दुसरा मोठा अभ्यासक मराठवाड्यात (व कदाचित महाराष्ट्रातही) दुसरा झाला नाही. सारा देश अखंड भारत म्हणत असताना भविष्यातले वास्तव वेगळे होते आणि ते ्रद्रष्ट्या नेत्यांना व अभ्यासकांना दिसत होते. ‘ज्यांना भारतात राहणे नको त्यांच्यावर मी भारत लादणार नाही’ असे गांधीजी १९४२ च्या सुमारास का म्हणाले ? ‘फाळणी झाली नसती तर सारा भारतच पाकिस्तानच्या मार्गाने गेला असता’ असे सरदार पटेल तेव्हा का म्हणत? ‘भारत अखंड राहिला असता तर येथील हिंदूंना मुसलमानांच्या दयेवर जगावे लागले असते’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९५५ मध्ये का म्हणाले? कारण उघड आहे. अखंड भारतात मुसलमानांची संख्या ३६ टक्क्यांच्या पुढे राहिली असती आणि त्याखेरीज कोणतीही एक जमात वा राज्य हाताशी धरून मुस्लीम लीग येथे सत्तारूढ बनू शकली असती. (आताचे मोदी सरकार अवघ्या ३१ टक्के मतांच्या बळावर सत्तेत आहे हे वास्तव अशावेळी लक्षात घ्यायचे असते.) हे वास्तव आजही ऐकायला वा वाचायला जळजळीत वाटणारे असले तरी खरे आहे. भालेराव, कुरुंदकर किंवा शेषराव मोरे या मराठवाड्यातील विचारवंतांना हे कटु सत्य त्याच्या खऱ्या स्वरूपात सांगणे जमणारे आहे. मोरे यांचा अधिकार मोठा आहे. ‘सावरकरांचा बुद्धीवाद’, ‘सावरकरांचे राजकारण’, ‘काश्मीर-एक शापित नंदनवन’, ‘डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण’, ‘ विचारकलह’, ‘अप्रिय, पण’, ‘शासनपुरस्कृत मनुवादी-पांडुरंग आठवले’, ‘मुस्लीम मनाचा शोध’, ‘इस्लाम : मेकर आॅफ इंडियन मार्इंड’, ‘प्रेषिताचे चार आदर्श खलिफा’ , ‘१८५७ चा जिहाद’ ही व यासारखी विचारगर्भ पुस्तके व रूढ समजुतींना मुळातून धक्के देणारी अतिशय अभ्यासपूर्ण व पुरावेशुद्ध पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. पुण्यामुंबईच्या तुलनेत नांदेड-मराठवाड्यात झालेल्या विचारवंतांना फारशी प्रसिद्धी न मिळाल्याने मोरे यांचे नाव दीर्घकाळ लोकचर्चेत नव्हते. ते आले तेव्हा मात्र त्याने साऱ्यांचे डोळे पार दिपवून टाकले. आपला अप्रिय मुद्दाही अतिशय नेमकेपणाने शर्करावगुंठित करून श्रोत्यांच्या व वाचकांच्या गळी उतरविण्यात तरबेज असलेले शेषराव याही वयात अस्वस्थ आहेत आणि सारे ठाऊक असूनही ते बोलले का जात नाही या व्यथेने व्याकुळ आहेत. त्यांच्याशी साधी चर्चा केली तरी ते आपल्याला ठाऊक असूनही आपण बुद्ध््याच अज्ञात ठेवलेली अनेक रहस्ये उलगडून दाखवितात. अखंड भारतात मुसलमानच सत्ताधारी राहिले असते या शेषरावांच्या प्रतिपादनाशी सहमत होणाऱ्या तरुण विचारवंतांचा मोठा वर्ग आता महाराष्ट्रात तयार होत आहे. ‘दलित व आदिवासींना घटनेने राजकीय आरक्षण दिले असले तरी प्रशासकीय नोकऱ्यांत ते नाही’ हे त्यांचे विधान असेच अस्वस्थ करणारे पण विचारगर्भ आहे. लोक त्यांना टाळतात. कारण त्यांना खोडून काढता येत नाही आणि जवळ केले तर स्वीकारल्यावाचून राहवत नाही. असा अभ्यासू माणूस गंगाधर पानतावणे, मंगेश पाडगावकर आणि महेश एलकुंचवार इ.च्या पश्चात मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी येणे ही दुहेरी उपलब्धी आहे. रूढ अर्थाने शेषराव ललित लेखक नाहीत. त्यामुळे त्यांच्यामुळे हा मान प्रथमच एका वैचारिक ग्रंथकर्त्याला मिळत आहे आणि ती या संमेलनाची उंची वाढविणारी बाब आहे. मराठी साहित्यात वैचारिक साहित्याचे क्षेत्र व स्थान मोठे असले तरी राजकीय चिकित्सा करणारे वैचारिक साहित्य त्यात दुर्मिळ आहे. अशा साहित्याची व साहित्यिकाची निवड विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केली जाणे ही त्याचमुळे अभिमानास्पद वाटावी अशी बाब आहे. वैचारिक चिकित्सक व निर्भीड अशा विशेषणांनी कोणी बिचकून जाण्याचे कारण नाही. शेषराव मोरे हे कमालीचे साधे व सहज उपलब्ध होणारे गृहस्थ आहेत. आपले अंग चोरून वावरणाऱ्या ज्ञानी माणसाचे विनम्रपण त्यांच्यात आहे. नांदेडचे त्यांचे घर कुठल्याशा आडगल्लीत व वाहत्या नालीच्या काठावर आहे. मात्र ते घर अतिशय दुर्मिळ व मौल्यवान ग्रंथांनी भरलेले आहे. इतरांना सहजपणे न सापडणारी पुस्तके शेषरावांना खुणावतात. मग ती ते दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद अशी मिळवीत वाचतात, पचवितात आणि त्यावर स्वत:चे स्वतंत्र भाष्य करतात. ते करताना कोण काय म्हणेल वा कोण रागावेल याची ते पर्वा करीत नाहीत. विचार निर्भीडच असतो व निर्भीड माणसांनाच करता येतो. शेषराव त्या कुळातले आहेत. विचारवंत आणि सुपारीबाज प्रचारवंत यांच्यात सध्या झालेली सरमिसळ एवढी मोठी आणि बेमालूम की खरा विचार लक्षात घेणे दुरापास्त व्हावे. शेषरावांचा खणखणीत बुद्धीवाद असा लखलखीत व प्रेक्षणीय आहे.

Web Title: Respect for Saraswatiputra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.