शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

विरोधकांच्या एकजुटीचे मनोबल उंचावणारे निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:59 IST

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ६ मार्च रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘त्रिपुरातला लाल झेंडा आम्ही खोल पाण्यात बुडवला आता उत्तर प्रदेशात लाल टोपीचीही तीच अवस्था करू.’ राज्यातल्या पोटनिवडणुकांबाबत विधानसभेत याच अहंकारातून योगींनी उन्मादाचे अतिउत्साही दर्शन घडवले.

- सुरेश भटेवराउत्तर प्रदेशच्या विधानसभेत ६ मार्च रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘त्रिपुरातला लाल झेंडा आम्ही खोल पाण्यात बुडवला आता उत्तर प्रदेशात लाल टोपीचीही तीच अवस्था करू.’ राज्यातल्या पोटनिवडणुकांबाबत विधानसभेत याच अहंकारातून योगींनी उन्मादाचे अतिउत्साही दर्शन घडवले. त्यानंतर फक्त एका आठवड्यात उत्तर प्रदेशच्या जनतेने मुख्यमंत्र्यांचीच नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांचीही घमेंड गोरखपूर आणि फूलपूरच्या पोटनिवडणुकीत उतरवली. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री योगी पक्षातले लोकप्रिय स्टार प्रचारक. देशात कुठेही निवडणूक असली की भाजपमधे योगींच्या प्रचारसभांना सर्वाधिक मागणी असते. ब्रँड योगींच्या तथाकथित लोकप्रियतेवर गोरखपूरच्या होमपीचवरच ग्रहण लागले.गोरखपूरच्या निकालाचे महत्त्व यासाठीही आहे की, या मतदारसंघात तब्बल २९ वर्षानंतर गोरक्षपीठाचे वर्चस्व भंगले. १९८९ पासून ही जागा महंत अवैद्यनाथ व त्यानंतर योगी आदित्यनाथ अशा मठाधीशांकडेच होती. १९९९ साली गोरखपुरात योगी अवघ्या ७ हजार ३०० मतांनी विजयी झाले. हा अपवाद वगळला तर गेली २६ वर्षे गोरखपूर हा भाजपचा अभेद्य किल्ला राहिला आहे. गोरखपूर शहराची आणखीही एक ओळख आहे. इथली जनता अधूनमधून चमत्कार घडवते. ४७ वर्षांपूर्वी गोरखपूरच्या एका विधानसभा मतदारसंघात जनतेने थेट मुख्यमंत्र्यांचाच पराभव घडवला. सत्तेतून त्यांना पायउतार व्हावे लागले. २००१ साली गोरखपूरने शहराच्या महापौरपदी एका किन्नराची निवड केली. आता प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पोटनिवडणुकीत योगींसह भाजपला जनतेने अस्मान दाखवले.लोकसभेच्या तीन पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी लागले. गेल्या काही महिन्यातल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला लागोपाठ लाजिरवाण्या पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. १ फेब्रुवारीला राजस्थानच्या अलवर व अजमेर लोकसभा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात व मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये त्यापूर्वीच काँग्रेसने विजयाचा तिरंगा फडकवला. आता गोरखपूर, फूलपूर व बिहारच्या अररियात प्रादेशिक पक्षांनी भाजपचा दणदणीत धुव्वा उडवला. २०१४ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. लोकसभेच्या सात पोटनिवडणुकांमध्ये बुधवारच्या निकालानंतर (बिहारमधील अररिया वगळता) यापैकी सहा जागा भाजपने गमावल्या आहेत. ज्या जागा गमावल्या त्या सर्व राज्यात योगायोगाने भाजप सत्तेत आहे. ताजा पराभव उत्तर प्रदेश आणि बिहारचा आहे. या दोन राज्यात एकूण १२० लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी १०६ जागांवर भाजप अथवा एनडीएचे उमेदवार गेल्यावेळी निवडून आले होते. २०१९ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल की नाही, याचे भाग्य या दोन राज्यातले निकाल ठरवणार आहेत. बुधवारच्या निकालांमधे जो राजकीय ट्रेंड जाणवतो आहे, तो तूर्त तरी भाजपसाठी चिंतेचा विषय आहे.लोकसभेत भाजपचे सध्याचे संख्याबळ २७२ वर आले आहे. उत्तर प्रदेशातले हुकूमसिंग व पालघरचे चिंतामण वनगा या दोन भाजप सदस्यांच्या निधनामुळे या जागा तूर्त रिक्त आहेत. गोंदियाचे भाजप खासदार नाना पटोलेंनी भाजपचा राजीनामा दिला अन् काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बिहारच्या कीर्ती आझादांना भाजपने पक्षातून निलंबित केले आहे. या तीन जागांच्या पोटनिवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. भाजपचा त्यात पराभव झाला तर संख्याबळ २७२ च्या मॅजिक फिगरपेक्षाही खाली जाणार आहे. विशेष म्हणजे हे सारे सार्वत्रिक निवडणूक वर्षभरावर असताना घडते आहे.वर्षअखेर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुका आहेत. या तीनही राज्यात गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. पक्षांतर्गत कलहामुळे इथे भाजप सरकारांची स्थिती फारशी चांगली नाही. या तीन राज्यांमध्ये सत्ता कायम राखणे हे पंतप्रधान मोदींपुढे मोठे आव्हान आहे. दरम्यान कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे. सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचे कर्नाटकच्या सत्तेतून उच्चाटन करणे भाजपसाठी सोपे नक्कीच नाही. कर्नाटक निवडणुकीतले यशापयश मोदी सरकार आणि देशातल्या बदलत्या राजकारणाचा म्हणूनच टर्निंग पॉर्इंट ठरणार आहे.पोटनिवडणुकांचे निकाल भाजपच्या विरोधात लागले म्हणून लगेच हुरळून जाण्याचे कारण नाही. हे निकाल प्राय: सार्वत्रिक निवडणुकीच्या जनमताचा संकेत देणारे नसतात. सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना देशाची सत्ता कोणाच्या हाती असावी, असा विचार मतदारांच्या मनात असतो. पोटनिवडणुकीचे मुद्दे वेगळे तसेच स्थानिक कारणांचा प्रभावही मतदारांवर असतो. तरीही या निकालांचे महत्त्व कमी लेखता येत नाही कारण जिंकणाऱ्या पक्षांचा हुरूप वाढवायला आणि पराभूत पक्षाची चिंता वाढवायला हे निकाल निश्चितच कारणीभूत ठरतात. गोरखपूर आणि फूलपूरमधे नेमके तेच घडले. भाजपतर्फे असा युक्तिवाद केला जातोय की मोदींवर निरातिशय प्रेम करणारे लोक मतदानाला बाहेरच पडले नाहीत. कमी टक्केवारीमुळेच भाजपचा पराभव झाला. या युक्तिवादात दम नाही कारण केंद्र आणि राज्याची बलाढ्य सत्ता हाती असताना, मतदारांना बाहेर काढण्यात भाजपला आणि संघाला यश आले नसेल तर मतदारांना दोष देण्यात अर्थ नाही.२०१४ पासून निराशेच्या गर्तेत सापडलेल्या लहान मोठ्या विरोधी पक्षांना दिलासा देणारी एक महत्त्वाची गोष्ट मात्र या निकालांमुळे घडली. सर्वांच्या प्रकर्षाने लक्षात आले की देशातले वातावरण बदलते आहे. मोदी अथवा भाजप काही अजिंक्य राहिलेले नाहीत. विरोधकांची एकजूट आणि सुयोग्य रणनीतीचे नियोजन केले तर मोदी मॅजिकचाही सहज पराभव होऊ शकतो. सोनिया गांधींनी निकालाच्या एक दिवस अगोदर देशातल्या लहान मोठ्या २० विरोधी पक्षांची बैठक घेतली आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीचे रणशिंग फुंकले. दुसºया दिवशी पोटनिवडणुकांचे निकाल लागले. त्यात भाजपच्या पराभवामुळे समस्त विरोधकांचे मनोबल उंचावले. उत्तर प्रदेशात परस्परांचे राजकीय शत्रू समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष या निवडणुकीपुरते का होईना एकत्र आले. आगामी निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा जरी या दोन्ही पक्षांनी केली नसली तरी विरोधकांना परिस्थितीचे भान आहे, असा संदेश त्यातून ध्वनित झाला. देशातले वातावरण झपाट्याने बदलत असल्याचाच हा साक्षात्कार होता. तेलगू देशमचे मंत्री मोदी सरकारमधून बाहेर पडले आहेत. सरकारवर टीका करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. एनडीएच्या घटक पक्षांनी वेगळे सूर आळवायला प्रारंभ केला आहे. सरकारच्या तटबंदीच्या विटा ढासळत आहेत. तरीही तमाम विरोधकांना सावध रहावे लागेल.(राजकीय संपादक, लोकमत)