दहशतीच्या तणावाखालील प्रजासत्ताक दिन सोहळा

By Admin | Updated: January 26, 2016 02:38 IST2016-01-26T02:38:51+5:302016-01-26T02:38:51+5:30

आजच्या प्रजासत्ताकदिनाचे संचलन अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होत आहे. पाकिस्तानच्या धोरणात काही प्रमाणात दहशतवादाच्या स्वीकार केला गेल्याने डोळ्यात तेल घालून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवावेच लागते.

Republic Day celebrations under stress | दहशतीच्या तणावाखालील प्रजासत्ताक दिन सोहळा

दहशतीच्या तणावाखालील प्रजासत्ताक दिन सोहळा

हरिष गुप्ता, (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
आजच्या प्रजासत्ताकदिनाचे संचलन अत्यंत तणावपूर्ण वातावरणात होत आहे. पाकिस्तानच्या धोरणात काही प्रमाणात दहशतवादाच्या स्वीकार केला गेल्याने डोळ्यात तेल घालून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवावेच लागते. पण या वर्षी असलेली भीती जरा वेगळी आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकाई ओलांद यंदाचे प्रमुख पाहुणे आहेत व युरोपात फ्रान्सलाच इसिसच्या हल्ल्यांना सर्वाधिक सामोरे जावे लागल्याने भारतीय भूमीवरील दहशतवादी कारवाईच्या भीतीमध्ये वाढ झाली आहे.
फ्रान्स-अमेरिकेची मैत्री असल्याने अमेरिकेने या दहशतवादी कृत्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणेच्या मदतीसाठी आपल्या ‘सीआयए’चे बळ लावले आहे. त्याचा परिणामही लगेच दिसून आला. शुक्रवार रात्रीपासूनच्या १२ तासात सहा राज्यातून डझनभरहून अधिक संशयीत व्यक्तींना अटक करण्यात आली व त्यातले बरेचसे मुंबई, बंगळूरू, एनसीआर आणि हैदराबाद शहरातील आहेत. त्यातला एक तर केमिकल अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तो मुख्य सूत्रधार असून सर्व सूत्रे तो मुंब्र्यातून हलवत होता. मुंब्रा हे इसिसचे भारतातील मुख्यालय मानले जाते. यातून हेही स्पष्ट झाले की हे लोक इराक आणि सिरियातील इसिसच्या संपर्कात होते. विदेशी गुप्तचर यंत्रणेने अशीही माहिती पुरवली आहे की इसिसचे भारतातील सूत्रधार इथल्या तरुण मुला-मुलींना भडकावून पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी हालचाली करीत आहेत.
दीर्घ काळापासून भारत पाकिस्तानातील विविध दहशतवादी संघटनांच्या कारवायांचा बळी ठरतो आहे. खरे तर या सर्व संघटनांचे संचालन पाकिस्तानातील लष्कराची ‘आयएसआय’ ही गुप्तहेर संघटनाच करते आहे. भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट तळावर पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-महम्मदने केलेल्या हल्ल्यास आयएसआयची मदत असण्याची शक्यता असल्याचा माझ्या मागच्या लेखाचा विषय होता. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांनी असे म्हटले होते की, जैश-ए-महम्मद किंवा लष्करे तोयबा या संघटना म्हणजे पाकिस्तानने तयार केलेले भस्मासूर आहेत कारण त्यातले काही पाकिस्तानच्या भूमीतच दहशतवादी कारवाया करीत आहेत. पेशावरमधील बाचा खान विद्यापीठावर झालेला भीषण हल्ला ताजाच आहे. त्यात २० जणांचा बळी गेला. इसिसकडून आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारतात हाय अलर्ट घोषित केला असला तरी अजून पठाणकोट हल्ल्याची उकल होताना दिसत नाही. तीन अज्ञात लोकानी पठाणकोटमध्ये भाड्याने टॅक्सी घेतली होती पण त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या टॅक्सी चालकाचा मृतदेह हिमाचल प्रदेशातील दुर्गम कांगरा खोऱ्यात आढळून आला. इंडो-तिबेटीयन पोलीसच्या महानिरीक्षकांच्या मालकीची डोक्यावर निळा दिवा असलेली मोटारदेखील चोरीला गेली आहे. रविवारी सुरक्षा सेवेत असणारी लष्कराचीच एक मोटारदेखील दिल्लीतील लोधी गार्डन भागातून नाहीशी झाली.
कोण असेल या मागे? म्हटले तर ते ज्ञात वा अज्ञात असतील वा आयएसआयचे हस्तकही असतील. कदाचित यामागे इसिसही असेल? भारत अजूनही युद्धखोर शेजाऱ्यात अडकला आहे का? किंवा यातून असे दिसते आहे का की सुरक्षेविषयी उच्चस्तरीय चिंता हा भारतीय जीवनाचा जणू दैनंदिन भागच झाला आहे? जागतिक धार्मिक-राजकीय शक्ती भारताला प्रादेशिक स्तरावरून बाहेर काढत धार्मिक युद्धात ओढत आहेत का?
असे नेहमीच म्हटले जाते की इसिसच्या ३० हजारी लष्करात युद्धाचा अनुभव नसलेल्या भारतातील फक्त २० जणांचा सहभाग आहे. त्या शिवाय आणखी ३० भारतीयांना जाळ्यात ओढले गेले आहे पण त्यांना देश सोडण्यापासून रोखले गेले असून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली आहे. पण विदेशी गुप्तहेर संस्थांनी मात्र २०० भारतीय इसिसच्या संपर्कात असल्याचा अंदाज वर्तवला आहे. काश्मीरमध्ये अजूनही पाकिस्तानचा ध्वज फडकावून निषेध करणे ग्राह्य मानले जाते. गेल्या काही महिन्यात पाकिस्तानच्या ध्वजाची जागा इसिसच्या ध्वजाने घेतली आहे. दूरसंचार क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार भारतातील मुस्लीम समाजातल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावर इसिसशी संबंधित संकेतस्थळे आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड केली आहेत.
भाजपाचे प्रवक्ते एम.जे.अकबर यांनी ‘आर.एन.काव व्याख्यानमाले’त बोलताना असे म्हटले, की इसिसने खलिफाचे राज्य आणण्याचे जे आवाहन केले आहे ते इथल्या अल्पसंख्याकांना आधुनिकतेकडून मागे घेऊन जात आहे आणि जगभर एकच इस्लाम धर्म असणे ही त्यांच्यासाठी अद्भुतरम्य कल्पना आहे. ज्या प्रमाणे कार्ल मार्क्सने जग बदलण्याचे आवाहन केले होते त्याच प्रमाणे इसिसचा खलिफा अबू बक्र अल-बगदादी याचे आवाहन अखिल इस्लामीकरणाचे आहे. पण त्याचे आवाहन संशयास्पद वाटते, कारण त्यांच्या चित्रफितीत कैद्यांचे शीर एका रांगेत कापले जात असताना दिसते. भूतकाळात म्हणजे सातव्या शतकात जेव्हापासून खलिफा राजवट सुरु झाली तेव्हा किती रक्तपात घडत होता याचा अंदाज लावणे कठीण नाही.
पाकिस्तानी लष्कराला एका आधुनिक राष्ट्रावर पकड असतानाही भस्मासूर पोसताना कदाचित असे वाटत असेल की जागतिक दहशतवाद पसरवण्यात त्यांचा हातखंडा आहे. पण हा त्यांचा हा भ्रम आहे, कारण दहशतवादाची नवी पिढी फक्त काश्मीरचा छोटासा भाग किंवा भारत नाही तर जग ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. इसिसनेदेखील हे जाणून घ्यावे की भारताप्रमाणे पाकिस्तानसुद्धा त्यांचा शत्रू आहे. कारण त्यांचा उद्देश उत्तर आफ्रिकेपासून इंडोनेशियापर्यंत साऱ्यांना एका धार्मिक झेंड्याखाली आणण्याचा आहे. पाकिस्तानातील लष्करी नेते भारताविरुद्ध आंधळा द्वेष बाळगूनही एका गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत की जागतिक स्तरावरील जिहादी लोकांचा प्रवाह सिरियाकडे चालला आहे. याचा परिणाम पाकिस्तानला भोगावाच लागेल. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांना तशी शक्यता वाटत होती म्हणूनच त्यांनी पाकिस्तानला त्याच्या भूमीतील दहशतवादाशी संबंधित सर्व गोष्टी नष्ट करायचा सल्ला दिला होता.
या संदर्भात मोदींचे विदेश धोरण सकारात्मक आहे. त्यामुळे पाश्चिमात्य जग आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव कमी होण्यास मदत झाली आहे. दोन्ही बाजूंनी नव्या इस्लामिक दहशतवादाशी सामना करण्यासाठी जागतिक स्तरावरील सोशल मीडियाची मदत घेण्यात आली आहे. परिणामी इसिसच्या जाळ्यात सापडणारे लोक ओळखता येतील व त्यांना रोखता येईल. आपण केवळ अपेक्षा करू या की प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल आणि भारताला जागतिक पाठिंबा मिळेल व पाकिस्तान सुद्धा त्यावर विचार करेल.

 

Web Title: Republic Day celebrations under stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.