- शेखर गायकवाड(संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण, नाशिक)
झाडं जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे, हे खरंच. त्यासाठी काही उपायही सुचवले जातात. त्यातलाच एक उपाय म्हणजे जेव्हा एखादं किंवा काही झाडं तोडली जातात, ती तोडण्याशिवाय गत्यंतर नसतं, त्यावेळी त्यांचं पुनर्रोपण केलं जावं.
कल्पना अतिशय चांगली आहे, त्यामागची भूमिकाही उत्तम, आदर्श आहे. शक्य असेल तर तोडल्या जाणाऱ्या झाडांचं पुनर्रोपणही करावं; पण, त्यामागची यथार्थताही समजून घेतली पाहिजे. त्यासाठी आधी काही गोष्टी समजूनही घेतल्या पाहिजेत. कोणत्याही झाडाचं पुनर्रोपण करण्यापूर्वी ज्या ठिकाणी ते झाड आहे तिथल्या आणि ज्या ठिकाणी त्याचं पुनर्रोपण केलं जाणार आहे, तिथल्या स्थानिक वातावरणाचा आणि पुनर्रोपण करीत असलेल्या वृक्ष प्रजातीचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. पुनर्रोपण करताना नेमकं कुठल्या ऋतूत केलं गेलं पाहिजे हादेखील एक महत्त्वाचा भाग आहे.
पुनर्रोपण करीत असलेल्या वृक्षाचं एकही पान न तोडता, आहे त्या परिस्थितीत आहे त्या जागेवरून योग्य रीतीने काढून दुसऱ्या जागेवर त्याचं रोपण करणं म्हणजे पुनर्रोपणाची योग्य प्रक्रिया. पण, बऱ्याचदा ज्या झाडाचं पुनर्रोपण करायचं आहे, त्या झाडाचा पूर्ण विस्तार छाटून, फक्त दहा ते पंधरा फूट खोड ठेवून त्याला बोडकं व खुजं केलं जातं. पुनर्रोपण करताना झाडाची मुळं वृक्षाबरोबर काळजीपूर्वक काढण्याची गरज असते. पण, बऱ्याचदा जेसीबी व क्रेनच्या साहाय्यानं अशास्त्रीय पद्धतीनं झाडाची मुळं जमिनीतून ओरबाडून काढली जातात. त्यामुळे वृक्षाला पोषकत्त्व पुरवणारी मुळं ताणली जातात व त्यांची कार्यक्षमता संपुष्टात येते.
आपल्याकडे अजून आहे त्या स्थितीत अलगदपणे झाड उचलण्याची व नेण्याची यंत्रणा उपलब्ध नाही. याशिवाय जिथून झाड काढलं जातं तेथील मातीचा प्रकार व स्थलांतरित करून ज्या ठिकाणी पुनर्रोपण करायचं आहे तेथील मातीचा प्रकार वेगळा असू शकतो. काही ठिकाणची माती भुसभुशीत, काही ठिकाणी मुरमाड, काही ठिकाणी दगड-गोट्यांची असे अनेक प्रकार असतात. पुनर्रोपण करण्यात येणाऱ्या झाडाची आहे त्या ठिकाणची परिस्थिती, काही ठिकाणी तीन-चार फुटांवर दगडांच्या भेगांमध्ये झाडांची मुळं गेलेली असतात. तिथे यंत्रांनापण मर्यादा येते. त्यामुळे आपण ज्या ठिकाणावरून तो वृक्ष पुनर्रोपणासाठी काढणार आहोत, त्या ठिकाणी अगोदर सात ते आठ फूट खोल, वृक्षाच्या खोडापासून ठरावीक अंतरावर, चारही बाजूने ड्रिल करून जमिनीखालची परिस्थिती जाणून घेणं आवश्यक आहे. जर तीन-चार फुटांवरच दगड असल्याचं जाणवल्यास ते झाड पुनर्रोपण न केलेलंच बरं. बऱ्याच वेळा पुनर्रोपण करताना झाडाला साखळदंडानं किंवा वायर रोपनं जखडून उचललं जातं. त्यामुळे त्या झाडाला, सालीला इजा होतात. वाहतूक करताना, आदळआपटीमुळे साल अजूनच काचली जाते, मुळांनापण हादरे बसतात. पुनर्रोपण करताना ज्या खड्ड्यात रोपण करायचे आहे तिथे रुजवताना विशिष्ट, योग्य ती काळजी घेतली जात नाही. पुनर्रोपण केलेल्या खोडाला काही दिवसांनी विविध ठिकाणी पालवी फुटते. त्यामुळे हे झाड जगेल असं वाटतं; पण, ही पालवी त्या खोडाच्या सालीत जीवनसत्त्व असल्यामुळे फुटलेली असते. कालांतरानं झाडातलं जीवनसत्त्व संपल्यानंतर पालवी गळून पडते.
पुनर्रोपण केलेल्या झाडाची ३६५ दिवस काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. पुनर्रोपणासाठी जेवढा अट्टाहास केला जातो, तेवढं त्याच्या संवर्धनासाठी लक्ष दिलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. या प्रक्रियेसाठी व त्यानंतर संगोपनासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ व खर्च तुलनेनं खूपच जास्त आहे. अपवाद वगळल्यास पुनर्रोपण केलेले वृक्ष जगल्याची उदाहरणं फार थोडी आहेत. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय झाल्याची उदाहारणं कमी नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे वृक्ष वाळल्यावर पुनर्रोपण केलेली जागा वाया जाते. त्याचे खोड तिथून काढायचे ठरल्यास परत खर्च येतो म्हणून ते काढले जात नाही. त्याऐवजी आठ-दहा फूट वाढलेल्या रोपांची लागवड केल्यास निसर्गसंवर्धनाला अधिक हातभार लागेल. कारण, अशा रोपांना पुनर्रोपण केलेल्या झाडांपेक्षा कमी काळजी घ्यावी लागते. ते जगण्याची शक्यताही बरीच जास्त असते. (shekargaikwadtnc@gmail.com)
Web Summary : Tree transplantation, while ideal, often fails due to improper techniques and environmental mismatches. It wastes resources; planting saplings is more effective for conservation.
Web Summary : वृक्ष प्रत्यारोपण, आदर्श होते हुए भी, अनुचित तकनीकों और पर्यावरणीय बेमेल के कारण अक्सर विफल रहता है। इससे संसाधनों की बर्बादी होती है; पौधरोपण संरक्षण के लिए अधिक प्रभावी है।