एकाच कामाचे पैसे पुन्हा हडपण्याचा डाव
By Admin | Updated: June 16, 2016 00:57 IST2016-06-15T23:16:30+5:302016-06-16T00:57:40+5:30
जिल्हा परिषद : सहा कामे परत दुरुस्तीसाठी; वाटपाला अखेर स्थगिती

एकाच कामाचे पैसे पुन्हा हडपण्याचा डाव
सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध इमारतींची दुरुस्ती झाली असताना पुन्हा त्यांचा काम वाटपाच्या यादीत समावेश करून पैसे हडपण्याचा डाव बुधवारी उधळून लावण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव योगेंद्र थोरात यांनी कामवाटप थांबविण्याची मागणी केली. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर सोसायट्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कामांना स्थगिती देऊन चौकशीचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेतील मुख्य प्रशासकीय इमारतीतील पहिल्या मजल्यावरील अध्यक्षांच्या दालनाजवळील स्वच्छतागृहांची दुरुस्ती, उपाध्यक्ष, सभापती निवासस्थाने अशा सहा कामांची दुरुस्ती यापूर्वीच झाली आहे.
स्वीय निधीतील चार कोटी ४९ लाख रूपयांची २१८ कामे सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर सोसायट्यांना वाटपासाठी बुधवारी जिल्हा परिषदेत बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये नवी यादी पुढे आली. मात्र यादीतील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील आठ कामांपैकी सहा कामे महिन्याभरापूर्वीच झाली असल्याचे योगेंद्र थोरात यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि मुख्य कार्यकारी अधिकारीऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करून, काम वाटप समितीची बैठक रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली.
याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांच्यांकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, दिलीप पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती घेतली असता, झालेल्या कामांचा पुन्हा काम वाटपात समावेश झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सर्वच कामांच्या वाटपाला स्थगिती दिली. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करा
झालेली कामे पुन्हा काम वाटपात दाखवून बारा लाख हडपण्याचा अधिकाऱ्यांचा डाव होता. जिल्ह्यातील अन्य कामांबाबतही असे झाले असण्याची शक्यता आहे. माधवनगर, बुधगाव येथीलही कामे पूर्वी झाली असून तेथील कामांचा पुन्हा यादीत समावेश केला आहे. उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता कामावर भेट देऊन कामाचे अंदाजपत्रक तयार करीत नाहीत. सर्व कामांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी योगेंद्र थोरात यांनी केली.