शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
4
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
5
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
6
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
7
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
8
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
9
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
12
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
13
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
14
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
15
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
16
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
17
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
18
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
19
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
20
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 

प्रादेशिकतेकडून राष्ट्रीयतेकडे

By admin | Updated: October 7, 2014 02:55 IST

महाराष्ट्र आणि हरियानात होत असलेली विधानसभेची निवडणूक प्रादेशिक पक्षांच्या पुढाऱ्यांच्या हाती न राहता एकीकडे जनतेच्या व दुसरीकडे राष्ट्रीय नेत्यांच्या हाती गेली

महाराष्ट्र आणि हरियानात होत असलेली विधानसभेची निवडणूक प्रादेशिक पक्षांच्या पुढाऱ्यांच्या हाती न राहता एकीकडे जनतेच्या व दुसरीकडे राष्ट्रीय नेत्यांच्या हाती गेली आहे. प्रादेशिक पातळीवरील आघाड्या दोन्ही राज्यांत फुटल्यामुळे काँग्रेस आणि भाजपा हे राष्ट्रीय पक्ष तेथे स्वबळावर मैदानात उतरले आहेत आणि त्यांचे नेतृत्व थेट सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी करीत आहेत. हरियानामध्ये सोनिया गांधींनी अनेक सभा घेतल्या असून, त्या अलोट गर्दीच्या झाल्या आहेत; तर मोदींनी महाराष्ट्रात वीस सभा घेण्याचे जाहीर केले असून, त्यांच्याही सभांना विराट स्वरूप आलेले दिसले आहे. राष्ट्रीय नेतृत्वाच्या या भव्य पायरवामुळे राज्यस्तरावरील नेते व पक्ष मागे सरकल्यागत झाले असून, त्यांच्या सर्वोच्च पुढाऱ्यांच्या सभाही त्यांच्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही प्रादेशिक पक्षांची स्थिती अशी काहीशी दयनीय म्हणावी तशी झाली आहे. मनसेच्या राज ठाकऱ्यांना श्रोतृवर्ग लाभतो; पण त्याचे त्यांच्या उमेदवाराकडे वा पक्ष चिन्हाकडे फारसे लक्ष असल्याचे दिसत नाही. हा प्रकार प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची उमेद खचविणाराही ठरत आहे. सोनिया गांधींच्या सभा महाराष्ट्रात अद्याप सुरू झाल्या नसल्या, तरी त्या लवकरच सुरूहोतील आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद या निवडणुकीचे खरे चित्रही उभे करील. भाजपा आणि शिवसेना यांची महाराष्ट्रातील युती होता होता राहिली आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी म्हणता म्हणता तुटली. २५ आणि १५ वर्षांची मैत्री ज्यांना विश्वासाने जोपासता आली नाही आणि जे आपसांतच कुरघोडीचे राजकारण करताना दिसले, त्यांचा भरवसा आपण कसा धरायचा, हा मतदारांसमोरचा प्रश्न आहे. हा विश्वास जागविण्याचा प्रयत्न या पुढाऱ्यांना करता आला नाही. परिणामी, राष्ट्रीय नेतृत्व आणि मतदार यांच्यात गेलेली ही निवडणूक प्रादेशिक पुढाऱ्यांच्या हातून सुटली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ऐन मुहूर्तापर्यंत नुसती बोलणीच चालली व ती मैत्रीसाठी नसून मैत्री तोडण्यासाठी आहे, हे साऱ्यांना दिसत राहिले. ती तुटली तेव्हा मिळेल तो उमेदवार हाती धरण्याची पाळी या पक्षांवर आली. ऐन वेळेवर दुसरे पक्ष सोडून आलेले इच्छुक मग पक्षाचे अधिकृत उमेदवार बनविले गेले. या घाईगर्दीत या पक्षांचे जाहीरनामेही कमालीचे उथळ म्हणावे असे लिहिले गेले. पुढारी, पक्ष व जनता यांचे नाते एवढे तुटल्याचे चित्र महाराष्ट्रात तरी आजवर कधी दिसले नाही. त्यामुळे जाणकारांच्या मते, या निवडणुकीतील मतदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सव्वाशे दिवसांची कारकीर्द डोळ्यांसमोर ठेवून केले जाईल व त्या अर्थाने ते केंद्र सरकारविषयीचे जनमत ठरेल. मोदींना या गोष्टीची कल्पना बहुधा असावी. त्याचमुळे त्यांनी या दोन्ही राज्यांत जास्तीच्या सभा आयोजित केल्या व त्यात होणारी त्यांची भाषणेही थेट लोकसभेच्या निवडणूक काळातील भाषणांच्या धर्तीवरची झाली. निवडणुकीला तोंड लागण्याआधी जे स्थानिक पक्ष चर्चेत होते, ते आता चर्चेच्या परिघाबाहेर गेले आहेत. रामदास आठवले कुठे आहेत आणि विनायक मेट्यांची शिवसंग्राम परिषद कोणाच्या बाजूने आहे, याची साधी दखलही आता कोणी घेत नाही. शेट्टी आणि जानकरांसारखी जी माणसे काँग्रेसच्या कडव्या विरोधात आहेत, त्यांनी आपली ओळख शाबूत ठेवली असली, तरी आताच्या धबडग्यात त्यांना निकालानंतरच एखादेवेळी महत्त्व येईल. कोणतीही निवडणूक जेव्हा जनतेत जाते, तेव्हा मतदारांत रुजलेले व दीर्घ काळापासून परिचित असलेले पक्षच परिणामकारक व प्रभावी ठरतात. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस व भाजपासोबत शिवसेनेला असे स्थान आहे. मात्र, तिच्या प्रभावाला राष्ट्रवादी काँग्रेससारखीच प. महाराष्ट्राची मर्यादा आहे. आजच्या घटकेला प्रचारात भाजपाने आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्ष लोकसभेतील पराभवाच्या धक्क्यातून अजून पुरता सावरला नाही आणि सोनिया गांधी राज्यात येईपर्यंत तो पुरेसे बळही उभे करू शकणार नाही, असे आताचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांच्या अतिरेकी उत्साहाच्या बळावर घोडदौडीचे अवसान आणत आहे. मात्र, मतदारांमधील त्यांचा प्रभाव प्रत्यक्षात कोठे अनुभवाला येताना दिसत नाही. शिवसेनेने आपली झळाळी बाळासाहेबांच्या निधनानंतर घालविली आहे. एवढी की, आपण टीकेतसुद्धा सेनेची दखल घेणार नाही, ही गोष्ट जरा सभ्य शब्दांत नरेंद्र मोदींनीच ऐकविली आहे. तात्पर्य, प्रादेशिक पुढारी झळाळी गमावून बसलेले, राष्ट्रीय नेते मोठाल्या सभा घेत असलेले आणि मतदार प्रादेशिक पुढाऱ्यांहून राष्ट्रीय नेत्यांकडे अधिक पाहत असलेले, अशी ही निवडणूक आहे. तिचा निकाल प्रादेशिकांचे भवितव्य निश्चित करणाराही आहे.