शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

डेटाला लाल विळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 2:19 AM

चीन आपले जाळे कसे विणीत आहे याचा हा नवा पुरावा आहे. महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा चीनने लपविलेली नाही.

मोबाइलवरून झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांसंबंधी बंगलोरहून प्रसिद्ध झालेली बातमी सायबर सुरक्षेची आवश्यकता पुन्हा एकदा स्पष्ट करणारी आहे. ॲपमार्फत कर्ज पुरविणाऱ्या चार कंपन्यांची नागरिकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता या कंपन्यांकडे जमा होणारी नागरिकांची माहिती चीनच्या ताब्यात असलेल्या सर्व्हरमध्ये जाऊन माहितीचा दुरूपयोग होत असल्याचे उघड झाले. या कंपन्या केवळ चीनमधील सर्व्हर वापरीत नसून त्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर चीनचे अधिकारी आहेत.

चीन आपले जाळे कसे विणीत आहे याचा हा नवा पुरावा आहे. महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा चीनने लपविलेली नाही. महासत्ता जोरजबरदस्तीने मिळविता येते तसेच व्यापार, विचारधारा यांचे उघड वा छुपे आक्रमण करून मिळविता येते. अमेरिका व्यापार, तंत्रज्ञान व लष्करी बळ याचा वापर करून अनेक देशांना अंकीत करून घेते. पूर्वी ब्रिटन हे करीत असे. रशिया, चीन यांचा भर हा छुप्या मार्गांवर अधिक असतो. प्रस्थापित व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करून आपल्या विचारधारेबद्दल जनतेच्या मनात आस्था निर्माण करणाऱ्या बुद्धिजीवींची फळी उभी करायची आणि त्यातून समाजात संभ्रमाचे वातावरण उभे करायचे ही पूर्वी सोविएट युनियनची रीत होती. नरसिंह रावांच्या काळात आर्थिक सुधारणांच्या विरोधात अशीच फळी त्वेषाने लढत होती.

पुतीन यांचा रशिया आता हेरगिरीचा मार्ग अवलंबितो आणि सायबर विश्वात आपले जाळे फेकतो. या सर्व मार्गांचा अभ्यास केलेला चीन प्रत्येक मार्ग परिस्थितीनुसार वापरतो. सायबर विश्वात प्रभाव टाकायचा असेल तर सर्व्हर आपल्या हाती पाहिजे हे चीनने ओळखले आणि स्वतःचे सर्व्हर निर्माण केले. भारताने याकडे दुर्लक्ष केले. आपण आजही परदेशी सर्व्हरवर अवलंबून आहोत. आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतःचा सर्व्हर असणे आवश्यक असते. सायबर विश्वातील कामकाज सर्व्हरमार्फत चालते. प्रत्येक व्यवहाराची माहिती तेथे जमा होते. ज्याच्या हाती सर्व्हरची चावी तो त्यातील माहिती हवी तशी वापरू शकतो. झटपट कर्ज देणाऱ्या ॲपमार्फत चीनने हीच क्लृप्ती वापरली आहे. यामध्ये आर्थिक व्यवहाराबरोबर व्यक्तिगत माहितीही गोळा होते व त्याचा स्वार्थी वापर होऊ शकतो. सायबर विश्वात होत्याचे नव्हते करता येते. पेशवाईत राघोबाच्या पत्नीने धचा मा केला आणि नारायणरावांची हत्या झाली.

आजच्या तंत्रज्ञानात धचा मा करणे अतिसुलभ झाले आहे. राजकीय घटनांबाबत वा व्यक्तींबाबत धचा मा झाल्यास त्याची बातमी होते. परंतु, एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरविली गेली आणि बदनामीची भीती दाखवून लुबाडणूक केली गेली तर अशा सर्व प्रकरणांची बातमी होत नाही आणि पोलिसांपर्यंतही ती जात नाही. या डेटाचा वापर करून स्पर्धक राष्ट्रांतील नागरिकांचे व्यक्तिगत संबंध, संस्थांचे संबंध, आर्थिक संबंध खिळखिळे करीत अराजकाच्या दिशेने शत्रूराष्ट्राला घेऊन जाण्याचा उद्देश परकीय शक्तींचा असतो. हा धोका लक्षात घेतला तर सायबर सुरक्षेचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. डेटा, मग तो व्यक्तीचा असो, संस्थेचा असो वा राष्ट्राचा असो, त्याची गोपनीयता राखणे आणि योग्य व्यवहारांसाठीच त्याचा नियमांच्या आधाराने वापर होणे हे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने याविषयी भारतात जागरूकता नाही. इथे काटेकोर नियम बनविता येत नाहीत ही अडचणही सर्व राष्ट्रांना भेडसावते.

डेटाचे खासगीपण जपले जावे हा आग्रह बरोबर असला तरी या ढालीचा वापर करून राष्ट्रविघातक कारवाया केल्या जातात हेही सत्य आहे. खासगीपणा किती असावा याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे युरोपला वाटते. याउलट सरकारच्या हाती अमर्याद अधिकार गेले तर त्याचाही दुरूपयोग होऊ शकतो हे चीन व रशियामध्ये दिसते आहे. यातील मधला मार्ग म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांनीच डेटाची सुरक्षा जपणे. ॲपल कंपनी याबाबत दक्ष आहे. आपल्या माहितीची अन्य कोणाकडे देवाणघेवाण होत आहे का, हे तपासण्याची यंत्रणा ॲपल फोन वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कंपनीने दिली आहे. ॲपल वापरणारा दक्ष असेल तर तो आपली माहिती सुरक्षित ठेवू शकतो, मग सर्व्हर कोणताही असो. ॲपलच्या या कृतीमुळे फेसबुक, यू-ट्यूब धास्तावले आहेत. कारण डेटाची उचलेगिरी करूनच त्यांचा धंदा फोफावतो. ॲपलसारखी सुरक्षा सर्व फोनमध्ये आली तर डेटाची चोरी सुलभतेने करणे कठीण होईल. मात्र तसे केले तर अन्य फोनही ॲपलप्रमाणे महाग होतील आणि सर्व समाजाला झटपट डिजिटल करण्याचे स्वप्न मागे पडेल. या गुंत्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अद्याप गवसलेला नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत