विद्रोहाचा शिल्पकार

By Admin | Updated: July 9, 2016 03:07 IST2016-07-09T03:07:29+5:302016-07-09T03:07:29+5:30

दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या

Rebellion sculptor | विद्रोहाचा शिल्पकार

विद्रोहाचा शिल्पकार

दु:खितांच्या जगण्याचा जाहीरनामा लिहिणारे साठोत्तरी कवी तुळसी परब यांच्या जाण्याने विद्रोही साहित्य चळवळीला महत्त्वाचे योगदान देणारा शिल्पकार हरपला आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून कायमच दारिद्र्य, शोषण, स्वातंत्र्य, पाणी, आदिवासींचे जीवन, अशा असंख्य विषयांना कवेत पकडण्याचे सामर्थ्य अभिव्यक्त केले. मराठी आणि भाषा शास्त्रात एम.ए केल्यानंतर त्यांनी त्यावेळच्या सचिवालयात नोकरी केली. मात्र पहिल्यापासून साहित्य- सामाजिक चळवळीत सक्रीय असणाऱ्या परब यांचे मन नोकरीत रमले नाही. काही वर्षांनंतर ही नोकरी सोडून त्यांनी समाजातील तळागाळातील घटकांच्या प्रगतीसाठी आवाज उठविला. त्यांचे अनियतकालिकांच्या लेखन चळवळीत महत्त्वाचे योगदान आहे. अरुण कोलटकर, वसंत गुर्जर, राजा ढाले यांच्या सोबत लिटल मॅगेझीन चळवळीतील त्यांचा सहभागही विशेष उल्लेखनीय ठरला. त्या काळात ‘सत्यकथा’ या वाङ्मयीन मासिकाची प्रतिकात्मक होळी करून करून प्रस्थापित व्यवस्थेवरचा राग व्यक्त करण्याचा प्रयत्न अनियतकालिकांशी संबंधित या साहित्यिकांनी केला होता. परब यांचे तीन कवितासंग्रह विशेष गाजले. त्यात ‘हिल्लोळ’, ‘धादांत आणि सुप्रमेय मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘पाब्लो नेरुदांच्या कविता’, ‘मनोहर ओक यांच्या ऐंशी कविता’ ही त्यांनी संपादित केलेली पुस्तके आहेत. शहाद्यात ‘श्रमिक संघटने’मध्ये आदिवासींसाठी काम करताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, मात्र त्याला न जुमानता त्यांनी ते कार्य सुरुच ठेवले. ‘मागोवा’ गटाच्या चळवळीत सहभागी असताना त्यांनी कारावासही भोगला. २००५ साली झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. परब यांच्या स्वभावात कमालीचा विरोधाभास होता. एका बाजूला साहित्य व दृष्य कलांची जाण प्रगल्भतेची, सूक्ष्मतेची होती. ते नवीन कलाकृतींना स्वीकारण्यास नेहमी तयार असत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या भाषेत आणि वागणुकीत रांगडेपणा होता. समकालीन मराठी कवितेतील राजकीय जाणिवेची व्याप्ती वरचेवर वाढतच आहे. म्हणून अशा कवितेचे विश्लेषण आणि मूल्यमापन करताना परब यांची कविता एक संदर्भ चौकट म्हणून मोलाची ठरेल अशी आहे.

Web Title: Rebellion sculptor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.