खरोखरीच का ‘दाटला चोहीकडे अंधार’?

By Admin | Updated: October 25, 2015 22:22 IST2015-10-25T22:22:18+5:302015-10-25T22:22:18+5:30

‘दश दिशात कसे मळभ भरून राहिले आहे. काळोख दाटत चालला आहे. सारीकडे औदासीन्याची छाया आहे. विवेकावर अविवेकाची होत असलेली मात उघड्या नेत्रांनी बघण्याचे करंटेपण नशिबी आले आहे.

Really, 'Datla Chohi to darkness'? | खरोखरीच का ‘दाटला चोहीकडे अंधार’?

खरोखरीच का ‘दाटला चोहीकडे अंधार’?

‘दश दिशात कसे मळभ भरून राहिले आहे. काळोख दाटत चालला आहे. सारीकडे औदासीन्याची छाया आहे. विवेकावर अविवेकाची होत असलेली मात उघड्या नेत्रांनी बघण्याचे करंटेपण नशिबी आले आहे. आपले अस्तित्वच यात विरघळून जाईल वा ते गिळंकृत केले जाईल अशी आशंका डाचू लागली आहे’, असे किंवा यासम खंतावलेपण अलीकडे वारंवार व्यक्त होताना दिसते आहे. सामान्यत: कोणताही सजीव तसा अत्यंत आशावादी असतो. सजीवातील माणूस तर अधिकच आशावादी समजला जातो आणि याच माणसातील लेखक, साहित्यिक कलावंत म्हणजे तर दुर्दम्य आशावादाचा तारकापुंज असेही मानले जाते. मग असे असताना इतका पराकोटीचा निराशावाद, इतकी कमालीची विषण्णता आणि इतके घनघोर न्यूनत्व येण्याचे कारण काय असावे? समाज म्हटला की त्यात सारे पुण्यशील कसे असू शकतील? ते तर कृष्ण, राम, ख्रिस्त, बौद्ध, महावीर वा प्रेषिताच्या काळातदेखील नव्हते. सूर आणि असूर, सुष्ट आणि दुष्ट, भद्र आणि अभद्र यांच्यातील संघर्ष तर सनातन आहे. हा संघर्ष प्रत्येक सहस्त्रकात, शतकात, दशकात आणि अगदी दिसामाजीदेखील सुरूच असतो. दुष्ट असतात म्हणूनच तर सुष्टांचे समाजाला मोल असते. प्रसंगी संख्याबळाचा विचार करता दुष्टांच्या पुढ्यात सुष्ट कोमेजल्यागत भासतही असतील, पण म्हणून सारे सुष्ट अस्तंगताकडे निघाले असे कधीच होत नसते. आधी दाभोलकर. मग पानसरे. मग कलबुर्गी. मग इखलाख. मग फरीदाबाद. कधी लव्ह जिहाद. कधी रामजादे-हरामजादे. चिंता वाटणारच. पण हे आज आणि केवळ आजच घडले वा घडू लागले असे काही आहे? मकबूल फीदा हुसेन यांना कोणी आणि केव्हा देशनिकाला होण्यास बाध्य केले? भांडारकर प्र्राच्य विद्या संशोधन संस्थेवर कोण आणि केव्हा चाल करून गेले? साहित्यिकांना चतुष्पादाची उपमा देऊन हिणकस लेखण्याची उक्ती कोणत्या काळात प्रसृत झाली? त्याच्याही अगोदर महात्मा गांधींची हत्त्या कोणत्या काळात झाली? अप्रिय, असंवेदनशील आणि घृणास्पद घटना घडण्यासाठी काळ हे कधीच परिमाण नसते. असे प्रकार होणार, होत राहणार, कधी कमी तर कधी अधिक. पण म्हणून नैराश्याला वरचढ होऊ द्यायचे नसते हे कोण समाजाला सतत बजावत असतो? ‘हेही दिवस जातील’ असे आश्वस्त कोण करीत असतो? साहित्यिकच ना? मग आज त्याच्यातील हे शहाणपण कुठे लोपले? भूत आणि वर्तमानातील घटनांची कधीही ढोबळ तुलना करायची नसते. पण तरीही आज ती केली जाते आहे. आजच्या काळापेक्षा अंतर्गत आणीबाणी अधिक चांगली होती असे म्हटले जाऊ लागले आहे. ज्यांनी पृथ्वीतलावर त्या काळात आपले पाऊलदेखील टाकले नव्हते असे लोकदेखील त्या काळाची भलामण करताना दिसू लागले आहेत. खरे तर तो काळ पुनरुज्जीवित होत असल्याचा पहिला हुंकार लालकृष्ण अडवाणी यांनी दिला. ज्या व्यक्तीने तो काळ भोगला आणि सोसला त्याच व्यक्तीने अशी भीती व्यक्त करावी हे म्हटले तर आश्चर्य होते, म्हटले तर नव्हते. त्यांच्या पक्षाने त्यांचे निर्माल्य केल्यानंतरच त्यांच्या मनातील शंकेची वाट मोकळी झाली. पण जर त्यांना देशाच्या प्रथम नागरिकाचा किंवा तत्सम मान बहाल केला गेला असता तर कदाचित याच अडवाणींना आजच्या काळात रामराज्याचा साक्षात्कार झाला असता. म्हणजे त्यांचे ते उद्गार हे त्यांच्या काळजातील ठसठसणे होते, वास्तवाचे वास्तव परिशीलन नव्हे ! तरीही जे काही घडते आहे ते काळजी आणि प्रसंगी भय निर्माण करणारे आहे यात शंका नाही. समाजातील सर्वाधिक संवेदनशील घटक या नात्याने साहित्यिकांनी त्यावर व्यक्त होणे हेदेखील योग्यच. त्याचबरोबर घटनेने बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचा विचार करता त्यांना जसा पुरस्कार स्वीकारण्याचा अधिकार आहे तसाच तो परत करण्याचाही आहे. तसे करताना काहींची भूमिका सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधाची आहे, तर काहींची भूमिका साहित्यिक संस्थांच्या निष्क्रियतेची आहे. त्यांचा हा निषेध जसा कृतीमधून आला आहे आणि येतो आहे तसाच तो उक्तीद्वारेही येतो आहे. तसा तो आलाही पाहिजे. सध्या तो येऊ शकतो कारण घटनेनेच त्यांना अभिव्यक्त होण्याचेही स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यांचे हे मोलाचे स्वातंत्र्य अजूनही अबाधितच आहे. आणीबाणीच्या काळात त्याचेही हनन झाले होते. पण तरीही तो काळ चांगला? पुरोगामित्व, विवेकवाद आणि तत्सम संज्ञा त्या काळातील अंधकारात पूर्णपणे लुप्त झाल्या होत्या. आणि खरे तर विवेक आणि पुरोगामित्व हा काही केवळ शोभेचा आणि मिरवायचा दागिना नव्हे. तो रक्तात भिनलेला असतो, असावा लागतो. आणि जेव्हा तो तसा असतो तेव्हा माध्यम कोणतेही असो, ज्या माध्यमाद्वारे व्यापक समाजाने कोणे एकेकाळी आपल्याला बहुमानीत केले, त्या बहुमानाचा दीर्घ काळानंतर अव्हेर करायची अनुमती देत नसतो. निषेध हा शब्द आणि त्यापाठोपाठ येणारी कृती मोठी कठोर असते. मग ती सरकारबाबत असो वा अन्य कोणाबाबत. कदाचित साहित्यिकांना आज तसे करण्याची गरज भासत असेल तर त्यांनी जरूर ही गरज पूर्ण करावी. पण एकदा खरोखरी अंतर्मनालाच विचारून पाहावे, ‘खरोखरीच का दाटला आहे चोहीकडे अंधार’?

Web Title: Really, 'Datla Chohi to darkness'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.