भंगलेल्या देवांचे अरण्यरुदन!
By Admin | Updated: November 11, 2015 20:56 IST2015-11-11T20:56:28+5:302015-11-11T20:56:28+5:30
लालकृष्ण अडवाणी यांना आज पश्चात्ताप होत असेल. आणि जर तो होत नसेल तर झाला पाहिजे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी गुजरात राज्यात जो नृशंस नरसंहार झाला आणि ज्यात मुस्लिमांचे नियोजनबद्ध शिरकाण घडवून आणल्याचा

भंगलेल्या देवांचे अरण्यरुदन!
लालकृष्ण अडवाणी यांना आज पश्चात्ताप होत असेल. आणि जर तो होत नसेल तर झाला पाहिजे. सुमारे तेरा वर्षांपूर्वी गुजरात राज्यात जो नृशंस नरसंहार झाला आणि ज्यात मुस्लिमांचे नियोजनबद्ध शिरकाण घडवून आणल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला, त्याची नैतिक जबाबदारी त्या राज्याचे तेव्हांचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी यांच्यावरच जाऊन पडते, असे मत इतर कोणाचे नव्हे तर तत्कालीन पंतप्रधान साक्षात अटलबिहारी वाजपेयी यांचेच होते. वाजपेयींनी मोदींना राजधर्माची जी आठवण करुन दिली, तीदेखील त्याचवेळी आणि याच संदर्भात. परंतु तेव्हां भाजपातील ज्या एकमात्र नेत्याने मोदींची जोरकस पाठराखण केली, ते नेते म्हणजे तत्कालीन उप-पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी. ‘माय कन्ट्री माय लाईफ’ या आत्मचरित्रात खुद्द अडवाणी यांनीच याचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘मोदींचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खुद्द रालोआच्या घटक पक्षांकडूनही केली जात होती. पंतप्रधान वाजपेयी यांच्यावरही मोदींच्या राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव येत होता. पण मी (या मागणीचा आणि दबावाचा) निकराने विरोध केला. गुजरातेत जे झाले, त्यावरील खरा तोडगा शोधावा लागेल. मोदींचा राजीनामा हा काही त्यावरील तोडगा नव्हे’. याच आत्मकथनात अन्यत्र अडवाणींनी असाही उल्लेख केला आहे की नरेन्द्र मोदी, प्रमोद महाजन, व्यंकय्या नायडू आणि सुषमा स्वराज या तरुण नेत्यांना आपणच राष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त करुन दिले. याचा अर्थ किमान हे चौघे तरी आपल्या व्यक्तिगत अभ्युदयाच्या मार्गातील अडसर बनणार नाहीत अशी अडवाणींची अटकळ असावी. परंतु तिथेच अडवाणींचा होरा किमान मोदींच्या बाबतीत तरी चुकीचा ठरला. प्रकृतीच्या कारणास्तव वाजपेयी यांनी राजकारणाच्या राष्ट्रीय रंगमंचावरुन बहिर्गमन केल्यानंतर आता भाजपात आपणच काय ते एकमात्र आणि आव्हानमुक्त नेते आहोत असा समजही अडवाणींनी करुन घेतला. पण गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षाच्या गोव्यातील राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचा भावी पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे निश्चित झाले, तेव्हांच खरे तर अडवाणींच्या शरीरावरील शेंदूर खरडला जाण्यास प्रारंभ झाला. त्यांनी गोवा टाळले पण मोदींची घोषणा ते टाळू शकले नाही. यातील एक विचित्र योगायोग असा की, मोदींचे नाव जाहीर होताच बिहारचे तेव्हांचेही मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरकार स्थापनेत भाजपाशी केलेली युती तत्काळ तोडून टाकली. याचा अर्थ आज भाजपाच्या ज्या चार प्रमुख नेत्यांनी आणि राष्ट्रीय पूर्वाध्यक्षांनी पक्षाच्या बिहारातील लाजीरवाण्या पाडावानंतर मोदींच्या विरोधात जी हाळी दिली आहे, त्या साऱ्यांपेक्षा नितीशकुमार यांना खुद्द मोदी यांच्या राजकारणाचा आणि त्यांच्या भविष्यकालीन नीतींचा अचूक अंदाज होता. आजच्या घडीला मोदींची पाठराखण करणारे आणि कोणताही जनाधार नसलेले अरुण जेटली जरी म्हणत असले की बिहारातील पराभवाला कोणी एक व्यक्ती जबाबदार नसून पराभवाची जबाबदारी सामूहिकरीत्या साऱ्यांनी स्वीकारली पाहिजे तरी त्यांच्या या विधानाशी अडवाणींसकट अन्य कोणीही सहमती व्यक्त करायला तयार नाही. गुजरातेतील नरसंहाराची जबाबदारी कोणा एकट्याची नाही असा मोदी अनुकूल अभिप्राय व्यक्त करणारे तेव्हांचे अडवाणी आज मात्र बिहार पराभवाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे असे म्हणत आहेत. याला काव्यगत न्याय म्हणायचे की काळाने उगवलेला सूड? जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे असा आग्रह धरताना भाजपातील या वयोवृद्ध बंडखोरांनी वरतून असेही म्हटले आहे की, फिर्यादी तोच, आरोपी तोच, वकील तोच आणि न्यायाधीशदेखील तोच असा प्रकार चालणार नाही. चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे. ती कोण करणार? चौघांनी जरी स्पष्ट नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा रोष पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर असल्याचे उघड आहे. आज मोदींची सरकार आणि पक्षावर व शाह यांची पक्षावर जबर पकड आहे. स्वत:हून वधस्तंभाकडे जाण्यास उत्सुक असण्याइतपत ते निरलस नसल्याने निष्पक्ष चौकशीसाठी ते अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार वा यशवंत सिन्हा यांच्या दारी जाणार नाहीत. वस्तुत: मोदींच्या कारभारावर शंका उपस्थित करण्याचे काम सर्वात आधी अरुण शौरी यांनी सुरु केले. त्यांनी त्याचा पुनरुच्चारही केला. त्याआधी अडवाणी यांनीदेखील आणीबाणीच्या दिवसांची आठवण करुन देऊन त्यांच्या मनातील रोष व्यक्त केला होता. पण त्या पलीकडे काहीही केले नाही. बिहारच्या पराभवामागे जी अनंत कारणे आहेत त्यात भाजपाच्या काही मंत्री आणि नेत्यांची शिवराळ वक्तव्ये यांचाही समावेश आहे. त्यांची वक्तव्ये केवळ सरकारलाच नव्हे तर देशाच्या सर्वधर्मसमभावी पोतालाही विसकटू शकणारी ठरतात हे ओळखून या चौघांनी त्यांच्या ज्येष्ठत्वाच्या आधारे वाचाळांना मूक करण्याचा साधा प्रयत्नदेखील कधी केला नाही. शेवटी सत्ता ही सर्वपरी असते. आज मोदींपाशी ती आहे. परिणामी ज्या चौघांनी लाल निशाण हाती घेतले आहे ते अंतत: भंगलेल्या देवांचे अरण्यरुदन ठरेल अशीच शक्यता अधिक आहे.