- भारतकुमार राऊत(ज्येष्ठ पत्रकार)एका बाजूला सारा देश कोविड-१९च्या संकटाशी लढत असतानाच राजस्थानात सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला आहे. कुस्तीच्या व्यूहरचनेत आधी खडाखडी झाल्यानंतर शेवटी मल्ल एकमेकांना थेट भिडतात व हातघाईची लढाई सुरू होते. राजस्थानात काहीशी तशीच परिस्थिती येत्या दोन-चार दिवसांत सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.सध्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला व त्यायोगे त्यांच्या खुर्चीलाच आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी थेट आव्हान दिल्यानंतर साऱ्या देशाचे लक्ष जयपूरकडे लागले. गेले दहा दिवस चाललेल्या या युद्धात सध्या तरी गेहलोत यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसते. त्यामुळेच त्यांनी पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून तर हटवलेच, शिवाय त्यांची राजस्थान प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरूनही उचलबांगडी केली. याचाच अर्थ आता काँग्रेस पायलट यांच्याशी तह करण्याच्या मन:स्थितीत नाही.जर परिस्थिती अशीच राहिली, तर पायलट यांच्या पाठीशी उघडपणे उभ्या राहिलेल्या दोन मंत्र्यांनाही शिस्तभंगाचा बडगा सोसावा लागेल. काँग्रेसमध्ये राजीव गांधी व त्यांच्यापाठोपाठ राहुल गांधी यांच्या वर्चस्वाचे युग सुरू झाल्यानंतर ज्या नेतृत्वाचा उदय होऊन वेगाने विकास झाला, त्यात मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानातील सचिन पायलट, मुंबईतील मिलिंद देवरा यांचा समावेश होता. या तिघांचेही वडील इंदिरा व राजीव गांधी यांच्या जमान्यात मोठे झाले. तिघांचेही अकाली निधन झाल्याने त्यांची पुढली पिढी सत्तेच्या रिंगणात आली व प्रस्थापितही झाली. या तिन्ही नेत्यांना आपण ‘यंग टर्क’ व ‘युवक नेते’ म्हणत असलो, तरी ते तिघे चाळीशी ओलांडलेले नेते आहेत. अर्थात सत्तरीच्या घरातील गेहलोत यांच्या मानाने पायलट युवकच!पायलट यांनी बंडाचा झेंडा का उभारला, याचा विचार करायचा, तर त्यांचा २००८-०९ पासूनचा इतिहास पाहायला लागेल. जिथे भाजपने आपला जम बसवला होता, अशा राजस्थानातून लोकसभेवर निवडून गेलेल्या पायलट यांनी दिल्लीत जम बसवतानाच राजस्थानवरही लक्ष ठेवले, पण त्या काळात सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची एकहाती सत्ता आल्याने पक्षात जुने-जाणते विरुद्ध तरुण तुर्क असे छुपे युद्ध सुरू झाले. त्यात अनेक तरुणांचा राजकीय बळी गेला. त्याचाच एक परिणाम म्हणून ज्योतिरादित्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला.एका बाजूला जुनी मंडळी हातातले बॅटन सोडायला तयार नाहीत व दुसºया बाजूला राहुल गांधी स्वत:च्या नेतृत्वाला भविष्यात शह देऊ शकेल, अशांचा विचारही करायला तयार नाहीत; त्यामुळे मध्य प्रदेशात जेमतेम बहुमत मिळाल्यावरही सोनिया व राहुलजींनी तरुण नेत्याचा विचार न करता कमलनाथ या गांधी घराण्याला निष्ठा वाहिलेल्या जुन्या नेत्याकडेच जबाबदारी दिली. मध्य प्रदेशात काँग्रेसकडे १५ वर्षांनंतर सत्ता आली होती. अशावेळी जुनी पाटी पुसून नव्याने सुरुवात करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जुन्यांनीच पुन्हा सत्ता बळकावल्या. त्यामुळे ज्योतिरादित्य बाहेर पडले.
राजस्थान : पहिली फेरी, विजेता : अशोक गेहलोत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 05:54 IST