बरोबर बोलले राज ठाकरे !

By Admin | Updated: April 9, 2015 22:45 IST2015-04-09T22:45:27+5:302015-04-09T22:45:27+5:30

राज ठाकरे जे बोलले, ते त्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर बरोबरच बोलले म्हणायचे. कुंभमेळ्याचा नाशिक महापालिकेशी काय संबंध हा राज ठाकरे यांचा

Raj Thackeray said right | बरोबर बोलले राज ठाकरे !

बरोबर बोलले राज ठाकरे !

 किरण अग्रवाल - 
राज ठाकरे जे बोलले, ते त्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर बरोबरच बोलले म्हणायचे. कुंभमेळ्याचा नाशिक महापालिकेशी काय संबंध हा राज ठाकरे यांचा प्रश्न चुकीचा कसा म्हणता यावा? कारण त्यांचा मुळात नाशिकशी व नाशिक महापालिकेशीच संबंध उरला नसल्याची स्थिती असल्याने कुंभमेळ्याच्या संबंधाशीही त्यांना काय देणे-घेणे असावे?
कुंभमेळा हा काही एकट्या नाशिक शहराचा विषय नाही आणि त्यासंबंधीची जबाबदारीही महापालिकेची नाही, असे सांगत कर्ज काढून किती गोष्टी करायच्या, असा सवाल राज ठाकरे यांनी गेल्या नाशिकभेटीत केल्याने भाजपाचे सर्वच स्थानिक आमदार त्यांच्यावर बरसले. पण ठाकरेंच्या म्हणण्यात तथ्य आहे असेच म्हणायला हवे. कारण मुळात नाशिकच्या नवनिर्माणाचा वादा करीत महापालिकेच्या सत्तेत आलेल्या राज ठाकरेंच्या ‘मनसे’ला येथे अपेक्षेप्रमाणे काही करून दाखवता आलेले नाही. आपण स्वत: लक्ष घालून नाशकातील स्थिती बदलू आणि विकास घडवू असे त्यांनी वेळोवेळी सांगितले असले तरी, यासंबंधी आलेल्या अपयशातून हल्ली त्यांचा नाशिक व नाशिकच्या महापालिकेशीच संबंध उरला नसल्याचे चित्र आहे. कधीतरी हवापालटाला आल्यासारखे यायचे आणि गोदा पार्कवर फेरफटका मारून निघून जायचे याव्यतिरिक्त त्यांचा हा संबंध कधी वास्तवात उतरला नाही किंवा उतरला तर दृढ झाला नाही. त्यामुळे नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जबाबदारीबद्दल महापालिकेतील सत्तेच्या अनुषंगाने त्यांना संबंध वाटेनासा झाला असेल तर, काय चुकले त्यांचे?
खरे तर, सिंहस्थानिमित्त करावयाची जी काही विकासकामे आहेत ती केवळ साधू-महंतांसाठी किंवा गंगास्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठीच करावयाची नसून, या सर्वांच्या येण्याने नाशिककरांवर येणारा ताण हलका व्हावा म्हणून करावयाची आहेत, हे मूळ सूत्रच राज ठाकरे यांनी लक्षात घेतलेले नसावे. सिंहस्थ स्नानाच्या निमित्ताने येणाऱ्या कोट्यवधी भाविकांमुळे नाशिकच्या वाहतुकीवर, सार्वजनिक स्वच्छतेसह आरोग्यावर व इतरही यंत्रणांवर परिणाम होऊन त्यांची जी दमछाक होणार आहे ती होऊ नये म्हणून विविध कामे करावयाची आहेत. त्याची प्राय: जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचीच असल्याने तेथील सत्ताधारी म्हणून राज ठाकरे यांना ती झटकता येऊ नये; परंतु कोणतेही काम करता येत नसेल तर त्याचे अपयश झाकण्यासाठी त्याची जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जात असतो. म्हणूनच राज ठाकरे यांनीदेखील तेच केले असेल तर त्यात आश्चर्य वाटून घेता येऊ नये. राहता राहिला प्रश्न विकासकामांसाठीच्या निधीचा, तर राज्य व केंद्र शासनाने सुमारे तीनेकशे कोटींचा निधी दिला आहेच, अजूनही कोट्यवधी येणे बाकी आहे. या निधीतून कामे साकारून आपले अपयश झाकण्याऐवजी जबाबदारी झटकणे राज ठाकरे यांना श्रेयस्कर वाटावे हेच पुरेसे बोलके आहे.
चतुरस्र नेत्याची एक्झिट
कॉँग्रेस ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्हाया शिवसेना, असा भाजपावगळता सर्वपक्षीय प्रवास करून झालेल्या अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या अकस्मात ‘एक्झिट’ने जिल्ह्यातले अभ्यासू नेतृत्व निमाले आहे. वकील असल्याने पुराव्याशिवाय कधीही न बोलणाऱ्या उत्तमरावांनी प्रकृतीवरील उपचारासाठी संधीही न दिल्याने त्यांचे जाणे चटका लावून गेले आहे. सरपंच, मार्केट कमिटी व जिल्हा बॅँकेसह नाशिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार अशा अनेकविध जबाबदाऱ्या निभावलेल्या ढिकलेंची खासियत म्हणजे त्यांना असलेली लोकमानसाची जाण. लोकांची नाडी ओळखून त्यांनी निर्णय घेतले, पक्ष बदलले व यश मिळवले. अधिकतर राजकारण्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही, पण ढिकलेंचे निदान त्याही बाबतीत अचूक ठरले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते स्वत:हून थांबले. लोकांच्या प्रश्नांसाठी तळमळीने धडपडणारा व अभ्यासू नेता अशी ओळख त्यांनी अखेरपर्यंत जपली.

Web Title: Raj Thackeray said right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.