पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा
By Admin | Updated: November 16, 2016 07:40 IST2016-11-16T07:40:04+5:302016-11-16T07:40:04+5:30
कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाचा पहिला बळी शेतकरीच़ नोटबंदीने देश ठप्प झाला़ हळूहळू तो पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही़

पाऊस आला मोठा पैसा झाला खोटा
कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाचा पहिला बळी शेतकरीच़ नोटबंदीने देश ठप्प झाला़ हळूहळू तो पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही़ व्यापाऱ्यांचे व्यवहार आजचे उद्या होतील, बांधकामासह सर्व तात्पुरती थांबलेली कामे काही महिन्यांनी पुन्हा सुरु होतील़ सामान्यजनही काटकसर करुन आजचे खर्च उद्यावर नेतील़ मात्र शेतकऱ्यांनी काय अन् कसे करायचे? रबीच्या पेरण्यांना अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी प्रारंभही झालेला नाही़ आता बाजारातून बियाणे कसे घ्यायचे, हा प्रश्न बिकट आहे़ मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना धनादेश स्वीकारण्याचे निर्देश दिले, शिवाय एखादा धनादेश वटला नाही तर १० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचा लोकाभिमुख निर्णय घेतला़ त्याच धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करायची म्हटले तरी धनादेश किती जणांकडे असतील हा प्रश्नच आहे़
मराठवाड्यात लाखो हेक्टर्समध्ये रबीचा पेरा होतो़ एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये १ लाख ३३ हजार ४०० हेक्टरमध्ये होणाऱ्या पेरणीपैकी केवळ ५५ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ सुमारे ६० टक्के पेरण्या व्हायच्या आहेत़ बाजारपेठेत उधार द्यायला कोणी तयार नाही़ जे मोठे शेतकरी आहेत त्यांना काही अंशी उधार मिळत असले तरी अल्पभूधारक शेतकरी मात्र वाऱ्यावर आहेत़ त्यामुळे पेरण्यांसाठी लागणारी बियाणे, खते, औषधे खरेदीसाठी मोबाईल बँकिंगची सुविधा कृषी केंद्रावर उपलब्ध करुन द्यावी हा एक मार्ग सुचविला जात आहे़
गेली तीन-चार वर्षे पावसाने ताण दिला़ दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये शेतकरी अधिक कर्जबाजारी झाला़ यंदा पाऊस चांगला झाला, परंतु परतीचा पाऊस इतका चांगला झाला की हातातोंडाशी आलेले सोयाबीन गेले़ शेवटी आशावादी असलेल्या शेतकऱ्यांनी रबी चांगली येणार यासाठी जोरदार तयारी केली़ इकडून-तिकडून कर्ज काढून बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रावर जाणार त्याच काळात नोटबंदीचे आदेश जारी झाले़ पंतप्रधान आणखी ५० दिवस कळ सोसा असे जाहीरपणे सांगत आहेत़ शेतकऱ्यांनी जर इतकी कळ सोसली तर येणारे रबीचे पीकही हातचे जाईल़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या कृषी व्यवहाराकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे़ विनाविलंब मोबाईल बँकिंगची तात्पुरती सुविधा कृषीमाल खरेदी केंद्रावर उपलब्ध करुन दिली पाहिजे़
येरे येरे पावसा तुला देतो पैसा़ पाऊस आला मोठा़ पैसा झाला खोटा़ हे तंतोतंत खरे ठरत असताना शेतकऱ्यांना तातडीने पैसा उपलब्ध करुन देण्याची वेगळी व्यवस्था केली पाहिजे़ राष्ट्रीकृत बँकांसह जिल्हा बँकेच्या शाखांमधूनही जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत मात्र पेरणीला आवश्यक पैसाही तातडीने उपलब्ध होत नाही़ पेरणीची तयारी करायची का दिवसभर रांगेत उभे राहायचे ही अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोरची मोठी समस्या आहे़ सरकार मात्र शेतकऱ्यांना कर लागत नाही त्यामुळे त्यांनी स्वत:चा पैसा बिनधास्त बँकेत भरावा असे आवाहन करीत आहे़ इथे पेरणीला पैसे नाहीत, कर्ज काढून आणलेली रक्कम खरेदी केंद्रावर चालत नाही, अशात पेरणीची वेळ निघून जात आहे़
मोढ्यांमध्ये दररोज कोट्यवधींच्या उलाढाली होत असताना शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच लिलावाद्वारे शेतमालाची होणारी विक्री, असे सर्वकाही ठप्प आहे़ शेतकरी व अडत्यांनी साठवून ठेवलेली हळद विक्रीसाठी काढली आहे़ त्याला कोणीही खरेदीदार नाही़ परिणामी मोढ्यांतील हमाल-मापारीही कामाअभावी बसून आहेत़ एकूणच कच्च्या हिशेबावर उभारलेली शेतमाल खरेदी-विक्रीची व्यवस्था कोलमडल्याने शेतकरीच बेजार झाला आहे़
- धर्मराज हल्लाळे