रेल्वे, एसटीचा ‘पाणीमंत्र’!
By Admin | Updated: May 1, 2016 03:27 IST2016-05-01T03:27:25+5:302016-05-01T03:27:25+5:30
मराठवाड्यातील बहुतांश भागात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये यंदा दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. मुंबई आणि परिसरात दुष्काळी स्थिती नसली तरी या दुष्काळाचा दाह समजून

रेल्वे, एसटीचा ‘पाणीमंत्र’!
- सुशांत मोरे
मराठवाड्यातील बहुतांश भागात तसेच विदर्भातील काही भागांमध्ये यंदा दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. मुंबई आणि परिसरात दुष्काळी स्थिती नसली तरी या दुष्काळाचा दाह समजून घेण्याचा प्रयत्न मुंबईतील संवेदनशील व्यक्ती तसेच संस्थांकडूनही होत आहे. पाण्याचे मोल अनमोल आहे, त्यामुळे पाणी वाचवण्याची मोहीम सध्या मुंबई महानगरांत तीव्र झाली आहे. पाण्याचा वापर जपून करा, असे संदेश सर्वत्र दिले जात आहेत. आपापल्या पातळ्यांवर पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न जाणून घेण्याचा प्रयत्न ‘टीम लोकमत’ने केला. त्यातील काही कौतुकास्पद असे प्रातिनिधिक प्रयोग खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी....
दुष्काळाची झळ रेल्वे व एसटीसारख्या सार्वजनिक वाहतुकीलाही बसत आहे. पाण्याची कमतरता पाहता रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळाने पुढाकार घेत दैनंदिन कामात लागणाऱ्या पाण्याच्या वापरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल, स्थानके येथे पाण्याचा जपून वापर केला जात आहे. तर एसटीकडूनही बसगाड्या, आगार, स्थानके येथे पाण्याचा अपव्यय टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. एसटी जेथे जेथे कॅन्टीन चालवते तेथेही पाणी वापरावर बरीच बंधने घालण्यात आली आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून तर भविष्यात रेल्वेला पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे प्रकल्प उभारले जात आहेत.
मध्य रेल्वेला एक लोकल धुण्यासाठी साधारणपणे दर दिवशी १० हजार लीटर पाणी लागते. दर दिवशी आठ लोकल धुतल्या जातात. मेल-एक्स्प्रेसचा प्रत्येक डबा धुण्यासाठी तर २,५०० ते ३००० लीटर पाणी मध्य रेल्वेला लागते. मात्र आता पाणीटंचाईमुळे रेल्वेने यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डबे न धुता ते ओल्या फडक्याने पुसण्याचा निर्णय घेतला आहे. तर जेथे गरज असेल तेथेच पाण्याचा वापर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्यामुळे दर दिवशी चार ते पाच हजार लीटर पाण्याची बचत होत असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेतही डबे धुण्याऐवजी डबे पुसले जात आहेत. पश्चिम रेल्वेला एक लोकल धुण्यासाठी ७ ते ८ हजार लीटर पाणी प्रत्येक दिवशी लागते. अशा तऱ्हेने दहा लोकल दर दिवशी या मार्गावर धुण्यात येत होत्या. मात्र आता डबे पुसण्यात येत असल्याने जवळपास चार हजार लीटर पाण्याची बचत होत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. पश्चिम रेल्वे मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे प्रत्येक डबा धुण्यासाठी ३,५०० लीटर पाणी लागते. आता यात कपात केल्याने फक्त एक हजार ते १५०० लीटर एवढेच पाणी लागत असल्याचे ते म्हणाले.
एसटी महामंडळाने उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आदेश सर्व आगार, बस स्थानके व सर्व प्रशासकीय कार्यालयांना दिले आहेत. पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणविरहित ठेवण्यात यावेत, आगार कक्षेतील बस स्थानके, उपाहारगृहे, प्रसाधनगृहे येथील पाण्याचे नळ सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची दक्षता घेतली जावी, चालक-वाहक विश्रांतीगृहे व एसटी बसगाड्या धुलाई यंत्रे येथील पाणी साठविण्याच्या टाक्या दररोज तपासून पाण्याची गळती होत नसल्याची खात्री करून देण्याच्या आदेशाचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पाण्याची कमतरता असेल, अशा ठिकाणी एसटी बसगाड्या स्वच्छ झाडून काढाव्यात आणि बस स्थानकांवर स्वच्छतेसाठी कमीत कमी पाण्याचा वापर करतानाच फिनेलसारख्या द्रावणाचा पुरेशा प्रमाणामध्ये वापर करण्याचे आदेशही एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत.
पश्चिम रेल्वेचा प्रकल्प विरारमध्ये
पश्चिम रेल्वेकडूनही पाण्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प विरारमध्ये उभारण्यात आला आहे. त्याची क्षमता दिवसाला जवळपास २ लाख लीटर आहे. याचबरोबर वांद्रे येथे पाणी पुनर्वापर प्रकल्प उभारला जाणार आहे. जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू होईल. १० लाख लीटर पाण्याची क्षमता येथे असेल. हा प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी साधारपणे ५ कोटी ७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मरेवर येथेही होणार प्रकल्प
सीएसटी स्थानक - साडेचार लाख लीटर पाणी
(हा प्रकल्प दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल)
सोलापूर : ५ लाख लीटर पाणी
नागपूर : ५ लाख लीटर पाणी
पुणे : ५ लाख लीटर पाणी
भुसावळ : ५ लाख लीटर पाणी