या तुरुंगाधिकाऱ्यांना शिक्षा करा...

By Admin | Updated: April 8, 2015 00:07 IST2015-04-08T00:07:08+5:302015-04-08T00:07:08+5:30

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच कुख्यात कैद्यांनी केलेले पलायन ही घटना साधी नाही. तिच्या तपासातून ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या पाहता या कारागृहाचे

Punish these prisoners ... | या तुरुंगाधिकाऱ्यांना शिक्षा करा...

या तुरुंगाधिकाऱ्यांना शिक्षा करा...

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच कुख्यात कैद्यांनी केलेले पलायन ही घटना साधी नाही. तिच्या तपासातून ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या पाहता या कारागृहाचे सारे प्रशासन भ्रष्टाचार, चोरटे व्यवहार आणि अधिकारी व गुन्हेगार यांच्यातील संगनमत यासारख्या गैरप्रकारांनी पूर्णपणे लिप्त आहे हेच साऱ्यांच्या लक्षात आले. कारागृहाच्या भिंतीआड असलेल्या कैद्यांजवळ ३५ मोबाइल फोन्स आणि अनेक सीमकार्ड्स सापडणे आणि त्यांना त्यांचा वापर बिनबोभाटपणे करता येणे ही बाबही साधी नाही. तुरुंगाधिकाऱ्यांच्या माहितीवाचून ती होऊ शकणारी नाही आणि तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी ती एवढे दिवस चालू दिली असेल तर तेच या प्रकरणातील खरे गुन्हेगार ठरतात हेही निश्चित होणार आहे. तुरुंगात दारू मिळणे, सिगारेटी आणि बिड्या यांची आयात होणे, त्याहून महत्त्वाची व गंभीर बाब ही की त्यात ड्रग्जचा वापर व व्यापार होणे या गोष्टी आता लोकांच्या चांगल्या परिचयाच्या झाल्या आहेत. भेटीला येणारी माणसे कैद्यांना या वस्तू देतात असे म्हटले तरी या भेटी तुरुंगाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होतात हे वास्तवही अशावेळी लक्षात घ्यावे लागते. तुरुंगाधिकाऱ्यांचा हा वर्गही या चोरट्या देवाणघेवाणीत सामील असतो असेच मग म्हणावे लागते. नागपूरचे कैदी आगाऊ आखलेल्या मोठ्या नियोजनानिशी फरार झाले आहेत. फरार होण्यासाठी तुरुंगाची भिंत ओलांडायला लागणाऱ्या दोराची व्यवस्था त्यांनी बाहेरून घोंगड्या व चादरी मागवून केली आहे. नियोजित दिवशी आपल्या तुरुंगाबाहेरच्या मित्रांना त्यांनी तुरुंगाच्या भिंतीनजक आपल्या वाहनांनिशी बोलविले आहे. हे सारे होत असताना बाकीचे कैदी व त्यांच्या सोबत वावरणारे तुरुंगाचे इतर अधिकारी अनभिज्ञ होते असे आपण समजायचे काय? आणि ते सारे अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटून झाले असे मानायचे काय? गुन्हेगारांना शासन करायचे ते त्यांना अद्दल घडावी म्हणून आणि त्यातून शहाणपण शिकून ते दुरुस्त व्हावे म्हणून. या अर्थाने तुरुंगांना आता सुधारगृहे असे म्हटले जाऊ लागले आहे. नागपूरच्या कारागृहातल्या सुरस कहाण्या ऐकल्या की त्याने सुधारगृह या नावाची पार बेईज्जत केली आहे असेच कोणीही म्हणेल. पलायनाच्या घटनेनंतर स्वाभाविकच राज्यातील वरिष्ठ तुरुंगाधिकारी चौकशीला आले व ही चौकशी अजून सुरूही आहे. दरदिवशी तिच्यातून बाहेर येणारे प्रकार सामान्य माणसांची मती गुंग करणारे आहेत. लोकमतच्या प्रतिनिधींनी तुरुंगातील कैद्यांशी व त्यातील दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी मोबाइलवर संपर्क साधून ज्या बातम्या व छायाचित्रे यासंदर्भात मिळविली ती अतिशय धक्कादायक आहेत. अधिकाऱ्यांचा वर्ग कोणकोणत्या व्यवहारात पैसे घेतो, त्यांची दिवसभराची कमाई किती, त्या कमाईचे होणारे वाटप कसे आणि तिच्यातून कोणकोणत्या अधिकाऱ्याने त्यांच्या बँकेत किती रकमा जमा केल्या, किती जमिनी खरेदी केल्या इ.. इ..ची माहिती तिच्या साऱ्या तपशिलासकट त्यांनी दिली आहे. त्यांच्या जोडीला त्यांनी पाठविलेल्या छायाचित्रांच्या प्रतीही कमालीच्या बोलक्या आहेत. लोकमतने ते वाचकांच्या नजरेला आणून देऊन आपली कारागृहे केवढी भ्रष्ट व लाचखाऊ आहेत ते आपल्या वाचकांना दाखवून दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारच्या तपासयंत्रणांनी लोकमतची ही माहिती महत्त्वाची मानून त्याविषयीची विचारणा या वृत्तपत्राकडेही केली आहे. तुरुंगातून फरार झालेले कैदी जास्तीची निर्ढावलेले असतात. त्यांच्या हातून आणखी मोठे व गंभीर गुन्हे होण्याची शक्यता असते. मुळातून तुरुंगातून फरार होणे हाच एक मोठा गुन्हा असतो. तो करू देणे व त्यांच्या हातून पुढे होणाऱ्या गुन्ह्यांना जबाबदार राहणे हे त्यांच्या सुटकेला कारणीभूत व सहाय्यभूत झालेल्या अधिकाऱ्यांचेही उत्तरदायित्व ठरते. त्याचमुळे ज्यांच्या गलथान व भ्रष्ट व्यवहारामुळे हे कैदी कारागृहातून सुटले त्या अधिकाऱ्यांची जराही गय केली जाता कामा नये. त्यांच्या रीतसर चौकशीला सुरुवात झाली आहे. ती त्यांच्या निलंबन वा बडतर्फीपाशी थांबू नये. त्यांनाही न्यायासनासमोर उभे करून त्यांच्या जबाबदारीबाबत बेफिकीर राहण्याच्या गुन्ह्यासाठी रीतसर शिक्षा झाली पाहिजे. यातून निर्माण होणारा महत्त्वाचा प्रश्न, राज्यातील तुरुंग कितपत मजबूत व सुरक्षित आहेत हा आहे. नागपूरच्या याच कारागृहातून यापूर्वी काही जहाल नक्षलवादी सुटून फरार झाल्याची गोष्ट फार जुनी नाही. राज्यातील इतर कारागृहांचा इतिहासही फारसा चांगला नाही. तुरुंगात दाखल झालेल्या कैद्यांजवळ अधिकाऱ्यांना द्यायला पैसा कुठून येतो, त्यांची व्यसने तुरुंगात असताना कशी पूर्ण करता येतात, हे कैदी तुरुंगाधिकाऱ्यांना आपल्या व्यवहारात सामील कसे करून घेतात याविषयीही आताचा तपास सखोलरीत्या पूर्ण होणे गरजेचे आहे. तुरुंग ही भयकारी व्यवस्था आहे. सामान्य नागरिकांपासून गुन्हेगारांपर्यंतच्या साऱ्यांनाच तिची भीती वाटली पाहिजे. पोलीस यंत्रणा व तुरुंग यांच्याविषयीचा जनमानसातील धाक संपणार असेल आणि नागपूरच्या तुरुंगाधिकाऱ्यांसारखे दिवटे लोक या यंत्रणांना हास्यास्पद बनविणार असतील तर तो सरकारच्याच मजबूतविषयी व डोळसपणाविषयी अविश्वास निर्माण करणारा भाग ठरेल आणि ही स्थिती सामान्य नागरिकांचा त्यांच्या सुरक्षेविषयीचा विश्वास घालविणारीही ठरेल.

Web Title: Punish these prisoners ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.