पोटात असते ते कधी ना कधी ओठावर आल्याशिवाय राहात नाही. पाकिस्तानने अनेक वर्षे पोटात लपवून ठेवलेले वास्तव पाकिस्तानचे तंत्रज्ञान मंत्री चौधरींच्या ओठातून अखेर बाहेर पडलेच. पाकिस्तान आणि दहशतवाद हे समानार्थी शब्द आहेत असे भारत जगाला कळकळीने सांगत होता. पण त्याला जगातून प्रतिसाद मिळत नव्हता. दहशतवादाचा चटका बसला तरी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची तयारी अमेरिकेसह अनेक राष्ट्रे दाखवित नाहीत. राष्ट्रीय स्वार्थ व हितसंबंधाची जपणूक यामुळे पाकला दहशतवादी म्हणणे अडचणीचे ठरत होते. या राष्ट्रांची अडचण आता पाकिस्तानने स्वत:च दूर केली. पंतप्रधान इम्रान खान यांचे विश्वासू असलेले चौधरी यांनी असेंब्लीमध्ये जाहीर केले की, काश्मीरमधील पुलवामा येथे भारताच्या राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आम्हीच हल्ला केला. भारताला घरात घुसून मारले, अशी वल्गनाही त्यांनी केली. पाकिस्तानच्या सर्वोच्च सभागृहात हे वक्तव्य केले गेल्याने पाकिस्तानच्या दुष्ट हेतूंबद्दल आतातरी जगाला शंका वाटायला नको. भारताला ती शंका नव्हतीच. पाक किती नापाक आहे हे चौधरींनी जगाला सांगितले आहे. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानला दोषी ठरविण्याचे ओझे भारताच्या डोक्यावरून उतरले.चौधरी यांचे हे वक्तव्य पाक सभागृहातील विरोधी पक्षाचे नेते अय्याज सादिक यांना प्रत्युत्तर म्हणून दिलेले होते. भारताकडून मोठा हल्ला होण्याच्या भीतीपोटी भारतीय वायूदलाचे वैमानिक अभिनंदन याची सुटका केली गेली असा गौप्यस्फोट सादिक यांनी केला व भारतीय हल्ल्याची माहिती देताना पाकचे लष्करप्रमुख बाज्वा यांचे पाय थरथरत होते, असे सादिक म्हणाले. भारताने तशी तयारी केली होती अशी माहिती एअर चीफ मार्शल धनोआ यांनीही दिली आहे. आवेशात येऊन भारताच्या विरोधात आततायी कारवाई केल्यानंतर पाकिस्तानचे हातपाय थंड पडतात, असा इतिहास आहे. कारगिलमधील घुसखोरी अंगाशी येणार हे लक्षात आल्यावर क्लिंटन यांच्यासमोर नवाझ शरीफ यांच्या उडालेल्या घाबरगुंडीचा दस्तावेज सीआयएच्या खात्यात उपलब्ध आहे. भारताला डिवचायचे आणि भारताने प्रतिहल्ला केला की जगासमोर रडायचे हे पाकिस्तानचे धोरण आहे. भौगोलिक स्थान, जगातील सत्तास्पर्धा यामुळे पाकिस्तानला युरोप-अमेरिका पाठीशी घालते आणि भारताला परस्पर छळणारा हाताशी असावा म्हणून चीनने पाकिस्तानला मांडलीक करून घेतले आहे.
अग्रलेख - पुलवामाबाबत नापाक पाकिस्तानची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:21 IST