लोकशिक्षिका

By Admin | Updated: February 9, 2016 03:39 IST2016-02-09T03:39:15+5:302016-02-09T03:39:15+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोडबिलाचे समर्थन केले म्हणून नलिनीतार्इंना निलंबित करण्यात आले आणि त्यांच्या जातीची व आंतरजातीय विवाहाची सनातन्यांनी निंदानालस्तीही केली.

Public school | लोकशिक्षिका

लोकशिक्षिका

- गजानन जानभोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोडबिलाचे समर्थन केले म्हणून नलिनीतार्इंना निलंबित करण्यात आले आणि त्यांच्या जातीची व आंतरजातीय विवाहाची सनातन्यांनी निंदानालस्तीही केली.

सत्यशोधक चळवळीतील अमरावतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नलिनीताई लढके परवा गेल्या. ज्या काळात महिलाना शिक्षणाची परवानगी नव्हती, त्या शिकल्या तर आपली कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असे ‘लोकमान्य’ पुढारी सांगायचे, अशा बुरसट समाजधारणेच्या काळात नलिनीताई शिकल्या आणि इतरानाही त्या प्रकाशवाटेने घेऊन गेल्या. बहुजन महिलांच्या प्रेरणा दैवी शक्ती आणि कर्मकांडात दडलेल्या असतात. कुठल्यातरी देवीच्या उपवासात किंवा व्रतवैकल्यात त्या आपले व मुला-बाळांचे कल्याण शोधत असतात. नलिनीतार्इंनी मात्र आयुष्यभर या कर्मकांडांना विरोध केला कारण सावित्री त्यांची प्रेरणा होती. पती आनंदराव लढके हे सत्यशोधक चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते होते. दोघांच्याही जीवननिष्ठा वंचितांच्या कल्याणाशी एकरूप झाल्या होत्या. पूर्वायुष्यात विवेकनिष्ठ असलेली माणसे उत्तरायुष्यात दैववादी बनतात. नलिनीताई त्यातल्या नव्हत्या. आयुष्यभर दलित, बहुजनांच्या कल्याणासाठी त्या धडपडत राहिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोडबिलाचे समर्थन केले म्हणून शिक्षिका असलेल्या नलिनीतार्इंना निलंबितही करण्यात आले होते. या बिलाच्या समर्थनार्थ गावागावात सभा घेताना जन्माने त्यांच्या वाट्याला आलेल्या जातीची, आंतरजातीय विवाहाची निंदानालस्तीही त्यावेळी सनातन्यांनी केली होती. रुढी परंपरेविरुद्ध लढणाऱ्यांच्या वाट्याला पराकोटीचा असा अपमान नेहमी येत असतो. अस्पृश्योद्धाराचे कार्य करताना त्यांना हीन वागणूकही देण्यात आली. गावातील श्रीमंताच्या ओसरीतील कोनाड्यात असलेल्या फुटक्या दांडीच्या कपात त्यांना चहाही प्यावा लागला. ‘आपण काही क्षणांसाठी अस्पृश्य ठरलो म्हणून एवढा संताप! मग माणूस असूनही शेकडो वर्षांपासून विटाळलेले जीणे जगत असलेल्या आपल्या बांधवांच्या वेदनांचे काय’, असा प्रश्न त्या स्वत:लाच विचारायच्या आणि निराश न होता नव्या जिद्दीने कामाला लागायच्या. आनंदरावांनी समाजसेवेला पूर्ण वाहून घेतले होते. त्यांचे घराकडे दुर्लक्ष व्हायचे. या गोष्टी अनेकदा संसारात कलह निर्माण करीत असतात. पण, नलिनीतार्इंनी त्यांना समजून घेतले होते. त्या आनंदरावांना सांगायच्या, ‘गृहस्थाश्रम स्वीकारणाऱ्या माणसाने समाजसेवा करताना घराकडेही लक्ष द्यावे. आपली जबाबदारी आणि सामाजिक कर्तव्य अशा दोन्ही बाजू संतुलित ठेवाव्यात. गृहस्थी जीवन यशस्वी होण्यासाठी ते आवश्यक असते.’ आनंदराव हे ऐकून घ्यायचे. नंतर ही चर्चा आणि मतभेद इथेच संपायचे. हळूहळू नलिनीतार्इंना त्याची सवय होऊन गेली. बाळंतपणासाठी त्या दवाखान्यात भरती झाल्या, तेव्हा आनंदराव सामाजिक परिषदेसाठी तेल्हाऱ्याला निघून गेले. नलिनीतार्इंजवळ कुणीच नव्हते. तीन दिवस काही खायलाही मिळाले नाही. ‘पण पतीमुळेच प्रबोधनाचा वारसा मला मिळाला व समाजसेवेची दिशाही गवसली. संसारातील ओढग्रस्ततेपेक्षा हा ठेवा कितीतरी अमूल्य आहे.’ असे त्या अभिमानाने सांगायच्या. या दोघांनी समाज-सहजीवनाचे हे व्रत आनंदाने स्वीकारले होते. उपरण्याच्या गाठीने बांधलेल्या पती-पत्नीच्या नात्यापलीकडचे ते होते.
आईवडील बाहेर राहिले की मुले बिघडतात. पण, त्यांची मुले सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान निघाली. आई-वडीलांची तडफड ती बघायची. नोकरी किंवा हौसेसाठी ते बाहेर नसतात, याची मुलाना जाणीव होती. आईवडिलांनी आयुष्यभर जपलेल्या मूल्यांशी ती आजही प्रामाणिक आहेत. आनंदराव वारले तेव्हा त्यांचे कुठलेही विधी करायचे नाहीत, असे मुलांनीच ठरवले. अंत्यसंस्काराच्या वेळी प्रेत उचलण्यापूर्वी प्रेताच्या तोंडात पानाचा विडा, त्यात सोन्याचा मणी घालून ठेवतात. या प्रकाराला नलिनीताई व मुलानी विरोध केला. आयुष्यभर ज्या माणसाने साधी सुपारीही तोंडात घातली नाही. त्याच्या कलेवरावर हा अंध सोपस्कार कशासाठी, हा त्यांचा सवाल होता. विदर्भातील सामाजिक चळवळीला नलिनीतार्इंचा मोठा आधार होता. दलित बहुजनांच्या जीवनात त्यांनी आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले. सत्यशोधक चळवळीतील ‘सत्य’ हरवले असताना त्यांचे नसणे म्हणूनच सतत जाणवणारे आहे.

 

Web Title: Public school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.