भागवतांकडून कानउघाडणी
By Admin | Updated: February 23, 2015 00:04 IST2015-02-23T00:04:14+5:302015-02-23T00:04:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही उपरती झाली आहे

भागवतांकडून कानउघाडणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही उपरती झाली आहे. गेले नऊ महिने विश्व हिंदू परिषदेच्या पुढा-यांनी चालविलेल्या धार्मिक उच्छादाची परिणती दिल्लीतील भाजपाच्या पराभवात झाल्याने ‘दिल्लीत विकासाची आणि वाराणशीत लव्ह जिहादाची’ भाषा बोलण्याच्या दुटप्पी व्यवहाराला आळा घालावा असे त्यांनाही वाटू लागले आहे. ‘हिंदू स्त्रिया या पोरांचे कारखाने नव्हेत’ हे त्यांचे ताजे व स्वागतार्ह उद्गार ही एका मोठ्या अविचार पर्वाची समाप्ती आहे. हिंदूंची संख्या वाढवायला हिंदू स्त्रियांनी किमान चार पोरे जन्माला घातली पाहिजेत असा पहिला आदेश यापूर्वीचे सरसंघचालक के. सुदर्शन यांचा. संघाच्या मकरसंक्रमणोत्सवाच्या सोहळ्यातच त्यांनी तो आपल्या स्वयंसेवकांना व देशभरातील हिंदूंना ऐकविला. विहिंपवाल्यांनी त्यातून प्रेरणा घेऊन मग आपल्या प्रत्येकच कार्यक्रमात त्याची द्वाही फिरविण्याचा उद्योग केला. साक्षी महाराज, प्रज्ञाज्योती, निरंजनाबाई, प्रवीण तोगडिया, अशोक सिंघल आणि उत्तर प्रदेशचे प्रचारप्रमुख हेही सारे या चार पोरे जन्माला घालण्याच्या मोहिमेचे प्रचारक बनले. बंगालचे भाजपा नेते श्यामलाल गोस्वामी यांना चारचा हा आकडा पुरेसा न वाटल्याने त्यांनी हिंदू स्त्रियांनी पाच पोरे जन्माला घालावीत असा नवा आदेश काढला. चारवाल्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही आणि संघानेही त्याला अडविण्याचा प्रयत्न केला नाही. आपले असले आदेश खपतात हे समजल्यानंतर एका शंकराचार्याने त्या साऱ्यांवर कडी करीत ‘मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर प्रत्येक हिंदू स्त्रीने दहा पोरे जन्माला घातली पाहिजे’ अशी धर्माज्ञाच जारी केली. हा सारा प्रकार नुसता ओंगळच नव्हे, तर स्त्रियांना पोरांचे कारखाने बनविण्याच्या दुष्टाव्याचाही भाग होता. आश्चर्य याचे की देशातील एकाही शहाण्या हिंदुत्ववाद्याला ‘अरे, हे जरा थांबवा’ असे त्या संबंध काळात म्हणावेसे वाटले नाही. हिंदुत्वाचे नाव घेतले की सारेच खपते असा समज करून घेतलेल्या या धर्ममार्तंडांना त्यांच्या मूर्खपणाची जाणीव दिल्लीच्या मतदारांनी करून दिली. आप पार्टीच्या अरविंद केजरीवालांनी भाजपाच्या आमदारांची संख्या तेथे ३२ वरून अवघ्या तीनवर आणली तेव्हा जास्तीची पोरे जन्माला घालण्याचा आपला फतवा दिल्लीच्या स्त्रियांनाच मान्य नसल्याचे या प्रचारकांच्या लक्षात आले. आपल्या पराभवाची मीमांसा करताना त्याची जी अनेक कारण या माणसांना गवसली त्यात हा जास्तीची पोरे जन्माला घालण्याचा आदेशही एक असल्याचे त्यांना समजले. धर्माच्या नावाने उच्छाद घालणे, अल्पसंख्यकांच्या मनात भीती उभी करणे आणि ‘हिंदू राष्ट्रा’च्या नावाने गर्जना करीत मते मागणे फारसे फलदायी ठरत नाही हेही त्यांना कळले. मोदींच्या लक्षात हे प्रथम आले तेव्हा त्यांना धर्म स्वातंत्र्याचा घटनादत्त अधिकार आठवला व प्रत्येकच धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचा अदेय अधिकार असल्याचे जाणवले. तसे बोलून दाखवून त्यांनी पक्षाची गेलेली प्रतिष्ठा काहीशी सावरण्याचाही प्रयत्न केला. संघाला त्याबाबतची जाण जरा उशिरा आली. ‘हिंदू स्त्रिया म्हणजे पोरे जन्माला घालण्याचे कारखाने नव्हेत’ हे नेमके ‘लोकमत’चेच वाक्य त्यांनी विश्व हिंदू परिषदेपासून हिंदुत्वाचा उच्छाद मांडायला निघालेल्या आपल्या सगळ्या सहयोगी संस्थांना ऐकविले. भागवतांच्या या वक्तव्यात धाडस आहे आणि मोदींच्या तुलनेत ते अधिक मोठे आहे. मोदींचे विधान सर्व धर्मातील अतिरेकी भूमिका घेणाऱ्यांना उद्देशून होते व ते साऱ्यांना लागू होणारे होते. भागवतांचे विधान सरळ हिंदुत्वाचा अतिरेक करणाऱ्या व त्यासाठी स्त्रियांना वेठीला धरू पाहणाऱ्यांना उद्देशून आहे. मोदींच्या पाठीशी भाजपाचे व संघ परिवारातील त्यांचे चाहते उभे असतील, तर भागवतांच्या मागे फक्त संघ व त्याने निर्माण केलेल्या संघटनातील लोकच तेवढे उभे आहेत. मात्र भागवतांचा त्या परिवारातील अधिकार सर्वोच्च म्हणावा असा आहे. त्यामुळे ‘मोदींचे विधान आम्हाला उद्देशून नव्हतेच’ असे म्हणण्याचा जो आगाऊपणा विश्व हिंदू परिषदेच्या सुरेंद्र जैनाने केला तसा त्याला तो भागवतांबाबत करता येणार नाही. मुळात स्त्रियांशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट पुरेशा जबाबदारीने व गांभीर्याने बोलली गेली पाहिजे. स्वत:ला समाजाचे व त्यातही धर्माचे पुढारी समजणाऱ्यांनी तर ती फारच जपून बोलली पाहिजे. पूजास्थाने आणि स्त्रिया ही समाजाची सर्वाधिक संवेदनशील अशी केंद्रे आहेत. त्यांना वेठीस धरणे वा त्यांची विटंबना होईल असे बोलणे ही खरेतर आपल्या समाजात अपराधच
ठरावी अशी बाब आहे. विश्व हिंदू परिषदेच्या अनेक नेत्यांवर एवढ्या समंजसपणाचा संस्कार नसावा. त्याचमुळे चार पोरे ते दहा पोरे अशी असभ्य भाषा जाहीरपणे बोलायला ते समोर झाले. भागवतांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यात समंजसपण आले नाही तरी अशी ओंगळ भाषा न बोलण्याची समज येणे पुरेसे आहे. आपण धर्माचे संघटन करीत आहोत असा समज करून घेतलेल्या संघासारख्या संस्थेने व त्याने निर्माण केलेल्या संघटनांनी हिंदू समाजात ५० टक्क्यांएवढ्या असलेल्या स्त्री वर्गाविषयी किमान सभ्यतेने व समंजसपणे बोलणे आवश्यक आहे. भागवतांचा नेमका संदेशही हाच आहे. त्याचा त्यांच्या अनुयायांवर होणारा परिणाम पाहणे महत्त्वाचे आहे.