राष्ट्रपती कोविंद कदापि ‘रबर स्टॅम्प’ होणार नाहीत!

By विजय दर्डा | Published: July 24, 2017 12:21 AM2017-07-24T00:21:17+5:302017-07-25T14:00:27+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे, यात काहीच संशय नाही. यामुळे जे संघाच्या

President's cabinet will not be a 'rubber stamp' | राष्ट्रपती कोविंद कदापि ‘रबर स्टॅम्प’ होणार नाहीत!

राष्ट्रपती कोविंद कदापि ‘रबर स्टॅम्प’ होणार नाहीत!

Next

विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)  

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्ती देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे, यात काहीच संशय नाही. यामुळे जे संघाच्या विचारसरणीशी सहमत नाहीत अशा लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणे स्वाभाविक आहे. पण माझ्या मते नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केवळ याच कसोटीवर तोलणे योग्य होणार नाही. कोविंद यांच्या आत्तापर्यंतच्या सार्वजनिक जीवनातील कार्यव्यवहारांवर नजर टाकली तर त्यांच्यावर कट्टर संघविचारांचा पगडा असल्याचे दिसत नाही.
मला तर कोविंद यांची कार्यशैली सर्वसमावेशक असल्याचे जाणवते. जरा आॅगस्ट २०१५ मधील घटनाक्रम आठवून पाहा. कोविंद यांना बिहारचे राज्यपाल नेमले गेले तेव्हा त्यांच्यावर संघाचा शिक्का असल्यावरून तेथील मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधाचा सूर लावला होता. आपले सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्र सरकार राज्यपाल कोविंद यांंचा वापर करेल, अशी नितीशबाबूंना भीती होती. पण प्रत्यक्षात नितीशकुमार यांनी त्यांच्या आघाडीमधील काँग्रेस व राजदला न जुमानता कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला. याचे कारण असे की, कोविंदजी राज्यपाल म्हणून केंद्राच्या हातचे खेळणे न होता त्यांनी बिहारला विकासाच्या मार्गावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती!
खरं तर कोविंदजी यांची हीच खासियत आहे. ते अजिबात कट्टर विचारांचे नाहीत. संवैधानिक पदावर बसणारी व्यक्ती एखाद्या पक्षाची किंवा एका ठरावीक विचारसरणीची राहात नाही तर ती संपूर्ण देशाची होते, त्या व्यक्तीचे आचरण पक्षपाती असता कामा नये, याची त्यांना पूर्ण समज आहे. अटलबिहारी वाजपेयी हेही संघाच्याच मुशीतील होते पण त्यांनी सार्वजनिक जीवनात देश सर्वोपरी मानून आचरण केले म्हणून ते सर्वांनाच स्वीकार्य झाले. प्रसंगी तत्कालीन सरसंघचालक अटलजींवर नाराजही होत असत पण त्यांनी त्याची कधी पर्वा केली नाही. भैरोसिंह शेखावत यांची उपराष्ट्रपतिपदाची कारकीर्द गौरवाने उल्लेखली जाते तीही त्यांनी पक्षापेक्षा संवैधानिक पद मोठे मानले म्हणून. ही गोष्ट वेगळी की, आपल्या देशात सुमित्रा महाजन यांच्यासारख्या नेत्याही आहेत ज्या लोकसभा अध्यक्ष या महत्त्वाच्या संवैधानिक पदावर विराजमान असूनही त्यांचे आचरण त्या पदाकडून अपेक्षित असलेल्या निष्पक्षता व प्रतिष्ठेस साजेसे नाही. लोकसभेच्या बैठकांचे संचालन करताना त्यांचे पक्षपाती वागणे स्पष्टपणे दिसून येते. सुमित्रातार्इंना देशाहून पक्षप्रेम अधिक असल्याचे जाणवते. सुमित्रा महाजन या एक ‘रबर स्टँप’ आहेत, असे म्हणणे वावगे होणार नाही. लोकसभेत आपला पक्ष कसा वरचढ राहील, एवढेच जणू त्या पाहात असतात. पण महाजन यांच्याप्रमाणे रामनाथ कोविंद कदापि ‘रबर स्टँप’ म्हणून काम करणार नाही, याची मला खात्री वाटते. ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती झाले तेव्हाही लोकांनी ते ‘रबर स्टँप’सारखे वागतील, अशी अटकळ केली होती. परंतु ग्यानीजींनी हे खोटे ठरविले.
मी कोविंदजींना दीड दशकाहून अधिक काळ अगदी जवळून पाहात आलो आहे, ओळखत आहे. राज्यसभेत मी त्यांच्यासोबत कित्येक वर्षे काम केले. राज्यसभेच्या हाऊसिंग कमिटीचे अध्यक्ष या नात्याने दिल्लीतील लोधी रोडवरील बंगला त्यांनीच मला ‘अलॉट’ केला होता. हाऊसिंग कमिटीच्या अध्यक्षांचा मोठा रुबाब असतो , कारण सदस्यांना बंगल्यांचे वाटप करण्यापासून ते त्याची देखभाल व अन्य सर्व आवश्यक कामे या अध्यक्षांच्या मार्फतच होत असतात. हे पद मिळाल्यानंतर अनेकांच्या डोक्यात हवा जाण्याची शक्यता असते. पण कोविंदजी यांच्या वागण्यात मला कधी गर्वाचा लवलेशही दिसला नाही. ते माझ्या घरीही आले आणि आमच्या दोघांमध्ये एक मैत्रीभाव निर्माण झाला. बिहारचे राज्यपाल झाल्यावर कोविंदजींनी बिहार भ्रमणासाठी मला निमंत्रण दिले. मलाच जाणे जमले नाही. पण शक्य होईल तेव्हा आमची भेट मात्र जरूर व्हायची. कोविंदजींचे व्यक्तिमत्त्व व कार्यपद्धतीचे अगदी जवळून आकलन करण्याची संधी मला मिळाली.
मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की, स्वत: दलित वर्गा तील असूनही मायावती किंवा अन्य नेते करतात तसे दलितांचे राजकारण कोविंदजींनी कधीच केले नाही. उलट मला तर नेहमी असे जाणवले की, ते नेहमी सर्वसामान्य माणसासाठी झगडत राहिले, मग तो कोणत्याही समाजाचा अथवा वर्गाचा असो. कोविंदजी एक सामाजिक व पुरोगामी विचारसरणीचे व्यक्ती आहेत हे त्यांच्या कार्यशैलीतून नेहमीच स्पष्ट होत आले आहे. म्हणून तर काँग्रेस सत्तेवर असतानाही त्यांना सर्वोच्च न्यायालयात सरकारचे वकील म्हणून नेमले गेले. सन १९७७ ते १९७८ या काळात ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे स्वीय सहाय्यक होते यावरूनही त्यांच्या सामाजिक विचारसरणीची कल्पना येऊ शकते.
अनेकांसाठी रामनाथ कोविंद हे नाव नवखे आहे. म्हणूनच राष्ट्रपतिपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. राजकारणात वावरणाऱ्यांना कोविंदजींचे नाव कधीच अनोळखी नव्हते. एवढेच की, प्रसिद्धीपासून दूर राहून ते शांतपणे आपले काम करत राहिले त्याचे फलित आज देशासमोर आहे. त्यांच्या या सचोटी आणि प्रतिबद्धतेमुळेच नरेंद्र मोदींना ते राष्ट्रपतिपदासाठी अत्यंत योग्य वाटले.
मला वाटते की मावळते राष्ट्रपती प्रणवदा मुखर्जी यांनी जसा राष्ट्रपतिपदाचा गौरव आणि मान वाढविला आहे त्याचप्रमाणे कोविंदजी हेही त्यांच्या कारकिर्दीवर आपल्या अनोख्या गुणवैशिष्ट्यांचा ठसा नक्की उमटवतील. राष्ट्रपती म्हणून प्रणवदांचे पंतप्रधान मोदींशी अनेकवेळा मतभेद झाले, पण त्याची कधी जाहीर वाच्यता झाली नाही. प्रणवदांनी मोदींच्या कार्यशैलीचे नेहमीच कौतुक केले कारण हा माणूस कायम काही तरी करण्याची मनापासून धडपड करतोय, हे त्यांना दिसले. आता प्रणवदांच्या खुर्चीवर रामनाथ कोविंद असतील व त्यांच्यापुढे असतील राष्ट्रपतिपदाची आव्हाने. राष्ट्रपतीभवनातही खूप राजकारण असते. मनमानीने अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. कुशल प्रशासक असलेल्या प्रणवदांनी राष्ट्रपती भवनातील या राजकारणाला अंकुश लावला. आता तेच आव्हान कोविंदजी यांच्यापुढे असेल. त्यात ते नक्की यशस्वी होतील, अशी मला खात्री आहे. आता एवढ्या मोठ्या देशाची जनता मोठ्या आशेने व आकांक्षेने त्यांच्याकडे पाहात असेल. आपली संवैधानिक कर्तव्ये विवेकाने पार पाडण्यात ते यशस्वी होतील. राष्ट्रपती म्हणून ते आपल्या तिन्ही सैन्यदलांचे सरसेनापती-कमांडर-इन-चीफसुद्धा असतील. न्यायपालिकेचेही ते प्रमुख असतील. मला नक्की वाटते की, त्यांचा मृदु स्वभाव जगाशी भारताचे संबंध अधिक मजबूत करेल. गळक्या छताच्या झोपडीत जन्मलेल्या एका व्यक्तीसाठी या पदापर्यंतचा प्रवास नक्कीच अविस्मरणीय आहे व आपणा सर्वांसाठी तो प्रेरणादायीही आहे!
कोविंदजी मनापासून खूप, खूप अभिनंदन!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिने कमाल केली! ११५ चेंडूंवर १७१ धावा!! व्वा, काय तडाखेबंद फलंदाजी आहे! पण मला वाटते की, हरमनप्रीतचा खेळ हा केवळ या एका खेळीपुरता मर्यादित नाही. आमच्या मुली कशातही कमी नाहीत, असा संदेश त्यातून मिळतो. अभ्यास आणि शिक्षणात तर त्या अव्वल ठरतच होत्या,आता खेळाच्या मैदानातही त्या पुरुषी वर्चस्व संपुष्टात आणत आहेत. मुष्टियुद्धात मेरी कोम, कुस्तीमध्ये गीता व बबिता फोगाट या बहिणी, कुस्तीमध्ये साक्षी मलिक, बँडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि जिम्नॅस्टिक्समध्ये दीपा कर्माकर यांच्यासारख्या खेळाडूंच्या कर्तृत्वाने क्रीडाक्षेत्रात भारताचे एक तेजोवलय निर्माण झाले आहे !

Web Title: President's cabinet will not be a 'rubber stamp'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.