राष्ट्रपतींनी सांगितले इतिहासाचे सार
By Admin | Updated: May 4, 2016 04:13 IST2016-05-04T04:13:16+5:302016-05-04T04:13:16+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय नागरिकांच्या सभेत केलेले भाषण जागतिक पातळीवर महत्त्वाचे मानले जावे आणि भारतासह जगातील सर्व विचारवृत्तीच्या लोकांनी व

राष्ट्रपतींनी सांगितले इतिहासाचे सार
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय नागरिकांच्या सभेत केलेले भाषण जागतिक पातळीवर महत्त्वाचे मानले जावे आणि भारतासह जगातील सर्व विचारवृत्तीच्या लोकांनी व संघटनांनी त्याचा गांभीर्याने विचार करावा असे आहे. युद्धखोर पुढारी आणि अतिरेकी विचारांच्या संघटना यांच्या नोंदी इतिहास फार काळ जपत नाही, असे सांगताना राष्ट्रपतींनी इटलीचा बेनिटो मुसोलिनी, जर्मनीचा अॅडॉल्फ हिटलर आणि रशियाचा स्टॅलीन यांची नावे त्यांच्या संघटनांसह घेतली. काळ्या रंगाचे शर्ट घातलेले मुसोलिनीचे ब्लॅक शर्ट्स हे नाव घेतलेले गुंड त्याच्या सरकारच्या व त्याच्या फॅसिस्ट पक्षाच्या नावाने साऱ्या देशात हैदोस घालायचे. निरपराधांना मारहाण करण्यापासून खंडणीखोरीपर्यंतच्या त्यांच्या कारवाया मुसोलिनीचे सरकार नुसते खपवूनच घ्यायचे नाही तर त्यांना प्रोत्साहनही द्यायचे. मुसोलिनी व त्याचा नॅशनल फॅसिस्ट पक्ष यांच्या युद्धखोरीने इटलीला दुसऱ्या महायुद्धापर्यंत नेऊन उभे केले. तिकडे जर्मनीत तपकिरी रंगाचा शर्ट व त्याला साजेसा गणवेश घालणाऱ्या हिटलरच्या स्टॉर्म ट्रूपर्सनी साऱ्या देशाला तसेच वेठीस धरले. ज्यूंच्या कत्तली करणे, हिटलरच्या नॅशनल सोशलिस्ट पक्षाला (नाझी) विरोध करणाऱ्यांचे मुडदे पाडणे, हिटलरची दहशत कायम करण्यासाठी देशात व युरोपात एक भीषण राजकीय भयगंड उभा करणे यासारख्या त्यांच्या कारवायांना हिटलरचे समर्थन आणि प्रोत्साहन होते. ते तो उघडपणे व कडव्या राष्ट्रवादाच्या नावाने करीत होता. आपल्या तशा अनुयायांना देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचे प्रशस्तीपत्र तो जाहीररीत्या देतही होता. दुसऱ्या महायुद्धाचा आरंभही हिटलरच्या याच प्रवृत्तीने प्रथम आॅस्ट्रिया व नंतर पोलंडवर लष्करी हल्ला करून केला. लाल रंगाचा शर्ट असलेला गणवेश घालणाऱ्या स्टॅलीनने त्याच्या ‘लाल सैनिकांच्या’ मदतीने सोविएत युनियनमधील पाच कोटी लोकांची एकतर हत्त्या केली वा त्यांना मरण पत्करायला भाग पाडले. (इटली, जर्मनी व रशिया या तिन्ही देशात राजदूत म्हणून काम केलेल्या मार्क पामर यांनी त्यांच्या ‘द आॅक्सिस आॅफ इव्हिल’ या ग्रंथात विसाव्या शतकातील गणवेशधारी हुकूमशहांनी १६ कोटी ९० लक्ष लोकांची हत्त्या केल्याची माहिती सप्रमाण लिहिली आहे. त्यात हिटलरने मारलेल्या दोन कोटी, स्टॅलीनने मारलेल्या पाच, तर माओने मारलेल्या सात कोटी लोकांची नोंद आहे. त्याखेरीज जगातल्या इतर लहानसहान हुकूमशहांनी मारलेल्या स्वकीय नागरिकांची देशवार यादी त्याने प्रकाशित केली आहे. या मारल्या गेलेल्या लोकांत महायुद्धात ठार झालेल्यांचा समावेश नाही ही बाबही पामरने ठळकपणे नोंदविली आहे.) या मारेकऱ्यांना त्यांच्या काळातही जगाने चांगले म्हटले नाही. त्यांचे अनुयायी आणि त्यांच्यामुळे भारावलेले भ्रमिष्ट यांच्या समर्थनाला कोणी कधी पुढेही आले नाही. जर्मनीच्या पंतप्रधानपदावर (चॅन्सेलर) आलेले नंतरचे नेते व नोबेल पारितोषिकाचे मानकरी विली ब्रँड हिटलरच्या हिंसाचाराविषयी बोलताना म्हणाले, ‘ते जर्मनीच्या व युरोपच्या आयुष्यातले तमोयुग होते.’ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या गणवेशधारी हुकूमशहांची नावे घेऊन त्यांनी त्यांच्या देशाचे व जनतेचे कसे वाटोळे केले ते सांगतानाच, नंतरच्या काळाने त्यांची नावे आपल्या स्मरणातून पुसून टाकल्याचेही स्पष्ट केले. माणूस, समाज, देश आणि जग हे अशा दुष्ट मारेकऱ्यांना व प्रवृत्तींना विस्मरणात टाकतात आणि आपल्या कल्याणकर्त्यांची नावेच तेवढी लक्षात ठेवतात आणि त्यांच्या स्मरणाने धन्यतेचा अनुभव घेतात. राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणात गांधीजींचा उल्लेख अशा संदर्भात केला. गांधीजींनी कोणता गणवेश धारण केला नाही. त्यांच्या अंगात साधा सदराही नव्हता. त्यांची संघटना शस्त्रधारी नव्हती आणि त्यांचा उपदेश स्वातंत्र्याचा असला तरी युद्धखोरीचा नव्हता. हिंसाचाराने मिळणारे स्वातंत्र्यही मला नको, असे ते जाहीरपणे सांगत. अंत्योदयाच्या संकल्पनेची मांडणी करणारा तो महात्मा सामान्य माणसांच्या सर्वांगीण कल्याणासाठी आपले आयुष्य वेचत राहिला आणि तसे करतानाच तो देशातल्या शस्त्रांधांच्या गोळ्यांना बळी पडला. मात्र जगाने त्याला मारणाऱ्यांची नावे कधी गौरवाने घेतली नाहीत. स्वातंत्र्य व सामान्य जनतेचे कल्याण यासाठी प्राणार्पण करणाऱ्यांनाच त्याने वंदनीय मानून आपल्या दैवतांचे स्थान दिले. हे स्थान एकेकाळी अब्राहम लिंकनच्या वाट्याला आले, कृष्णवर्णीयांच्या उत्थानासाठी प्राण वेचणाऱ्या मार्टिन ल्यूथर
किंगच्या वाट्याला ते आले. देशासाठी जीव पणाला लावणाऱ्या शहिदांची नावे जगाच्या इतिहासात
आणि स्मरणात राहिली. जगाला त्यांच्यासारखे
होऊन राहणारे मित्र हवे असतात. रंगीबेरंगी गणवेशातले शस्त्रधारी त्याला भयकारी वाटले तरी मित्र वाटत
नाहीत हेच इतिहासाचे खरे सार आहे आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी तेच अधोरेखित केले आहे. राष्ट्रपतींचे हे प्रतिपादन केवळ न्यूझीलंडमधील भारतीयांसाठीच नाही, ते भारतातल्या नागरिकांसाठीही आहे. संयुक्त
राष्ट्र संघटनेने ज्या महात्म्यांना विश्वाचे नागरिक
म्हटले व त्यांना जगाच्या वतीने मानवंदना दिली
ती माणसे शस्त्राचारी नव्हती. ती मनुष्यधर्माचा
अंगीकार करणारी नि:शस्त्र माणसे होती हा या भाषणाचा धडा आहे.