भाकड विद्वत्ता
By Admin | Updated: June 11, 2015 00:27 IST2015-06-11T00:27:54+5:302015-06-11T00:27:54+5:30
ज्ञान ही एक मोठी शक्ती आहे; पण हे ज्ञान इतरांना वाटण्यातच त्या शक्तीचे सार्थक आहे, याची जाणीव किती जणांना आहे? ज्ञान किंवा माहिती वाटण्याचे सोडाच पण त्याच्यावर

भाकड विद्वत्ता
प्रल्हाद जाधव
ज्ञान ही एक मोठी शक्ती आहे; पण हे ज्ञान इतरांना वाटण्यातच त्या शक्तीचे सार्थक आहे, याची जाणीव किती जणांना आहे? ज्ञान किंवा माहिती वाटण्याचे सोडाच पण त्याच्यावर आपली मालकी आहे असे मानून, त्याचा एकाधिकार निर्माण करून दुसऱ्यांवर वरचष्मा निर्माण करण्यातच बहुसंख्य लोक आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानू लागले आहेत.
एका संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे सज्जन माणूस विद्येचा वापर ज्ञानासाठी, संपत्तीचा दानासाठी आणि शक्तीचा इतरांच्या संरक्षणासाठी करत असतो. तर दुष्ट माणूस विद्येचा वापर विवादासाठी, संपत्तीचा मस्तवालपणा दाखविण्यासाठी आणि ताकदीचा वापर समोरच्याला कस्पटासमान मानून त्याला लोळवण्यासाठी करतो. यातील सुष्ट आणि दुष्ट माणसातील फरकाची सीमारेषा धूसर झाली असून नव्या जगाच्या व्यावहारिक क्षेत्रात दोघेही समान पातळीवर आल्याचे जाणवते.
ज्ञान ही खाजगी मालमत्ता आहे असे अनेकाना वाटते. त्यासाठी आपण खर्च केलेला आहे आणि तो वसूल व्हायला हवा अशी त्यांची धारणा असते. पण या ज्ञानाचा वापर जोवर लोककल्याणासाठी होत नाही तोवर ते केवळ अहंकाराचे गाठोडे ठरते. आपण जर काही चांगले वाचले तर ते दुसऱ्या गरजू माणसापर्यंत पोहोचवण्यात त्या वाचनाचे सार्थक आहे. इंग्रजीतून काही चांगले वाचले तर ते इंग्रजी न कळणाऱ्यांसाठी मराठीत अनुवादित करायची ओढ साने गुरूजींना सदैव असायची.
चाळीस वर्षे नोकरी करून निवृत्त झालेल्या प्राध्यापकाने वर्गाबाहेर एखाद्या व्यक्तीलाही कधी आपल्या ज्ञानाचा लाभ करू दिला नसेल तर त्याच्या त्या ज्ञानाला काय अर्थ आहे? घरात झाडलोट करणाऱ्या कामवाल्या मावशीकडे मोबाईल असतो. तिला तो फक्त रिसिव्ह करता येतो. मोबाईल कसा लावायचा हे तिला शिकवणारी एखादी घरमालकीण दाखवून देता येईल काय? जे जे आपणासी ठावे किंवा ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा यासारखी सुभाषिते आपण केवळ दागिन्यांसारखी मिरवतो. माणसाला कार्यप्रवण करत नाही ते ज्ञान कसले? अतिहुषारी हा सुध्दा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे असे म.गांधीनी का म्हटले आहे तेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे.
ज्ञानासाठी, माहितीसाठी आसुसलेली आणि त्यांचे शोषण करण्यात धन्यता मानणारी अशा दोन्ही प्रकारची माणसे जेथे गल्लोगल्ली आढळतात ते ते माहिती-तंत्रज्ञानाच्चा प्रगतीच्या गप्पा मारणे हे खऱ्या अर्थाने त्या समाजाच्या भाकडपणाचेच लक्षण आहे.