सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:40 AM2020-07-28T05:40:22+5:302020-07-28T05:43:42+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाºयानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं.

'Prati Vitthal' in the court of government rulers | सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

सरकारी बडव्यांच्या दरबारातील ‘प्रति विठ्ठल’

googlenewsNext

- सचिन जवळकोटे । निवासी संपादक, लोकमत, सोलापूर
पंढरपूरचा विठ्ठल तसा खूप शांत. विटेवरी पाय अन् कमरेवरी हात ठेवून युगानुयुगे स्थितप्रज्ञ. मात्र, त्याच्या अवतीभवतीच्या लोकांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिलेला. आता परवाचंच बघा ना. बाहेरचा एकही वारकरी शहरात येऊ न देता पंढरीनं आषाढी एकादशी साजरी केली. सुनसान रस्त्यावरील सन्नाटा आषाढी यात्रेनं इतिहासात पहिल्यांदाच अनुभवला. ही नीरव शांतता सहन झाली नसावी की काय, म्हणूनच बहुधा वारीनंतरच्या प्रक्षाळपूजेनं अवघ्या वारकरी संप्रदायात हलकल्लोळ माजविला. एकादशीच्या पहाटे झालेल्या शासकीय महापूजेचा व्हिडिओही जेवढा पाहिला गेला नसेल, तेवढी एका अधिकाऱ्याच्या पूजास्नानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथं गाभाऱ्यात जाऊन पाद्यपूजा केली नाही, पदस्पर्शही टाळला, तिथं श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाºयानं विठ्ठलासमवेत थेट गाभाऱ्यातच स्नान केलं. हे अधिकारी विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून दर्शन घेताहेत अन् त्यांच्या पाठीवर सरकारी पुजारी देवाच्या तांब्यानं स्नानाचं पाणी ओतताहेत, हे दृश्य बहुतांश वारकऱ्यांना खटकलं. आयुष्यात प्रथमच वारी चुकवून घरी थांबलेल्या वयोवृद्धांनाही ही घटना आवडली नाही. तशातच अनेकांनी या विधीवर जोरदार आक्षेप घेतला. विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेनंतर गाभाºयात साचलेलं पाणी भांड्यात घेऊन बाहेर मंडपात इतरांनी अंघोळ करायची असते, असं स्पष्ट करताना काहीजणांनी गाभाºयातील मूर्तीसोबत स्नान करण्याच्या या नव्या परंपरेबद्दल खंतही व्यक्त केली. मग काय, मंदिर समितीच्या सदस्यांनाही चेव आला. त्यांनी तत्काळ ‘आॅनलाईन मीटिंग’ घेतली अन् संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर थेट ‘गाभाराबंदी’ घातली. याउपरही हे प्रकरण इथंच थांबलं नाही. आता समितीच्या निर्णयाविरुद्ध मंदिरातील तमाम कर्मचाºयांनी एक आॅगस्टपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय.


वरकरणी हे प्रकरण सरळसोट दिसत असलं तरी याला अनेक किचकट कंगोरे आहेत. मार्चपासून ‘देऊळ बंद’ असल्यानं बाहेरील भक्तांसाठी दर्शन ठप्प. सारे पूजाविधी कर्मचारीच करतात. पूजेवेळी अंगावर पाणी ओतल्यानंतर कार्यकारी अधिकारी मोठ्या कौतुकानं म्हणतात, ‘तुम्ही तर आमचीच प्रक्षाळपूजा केली.’ त्यावेळी पाणी ओतणारा कर्मचारीही ‘हे असंच असतंय देवाऽऽ’ असं उत्तरतो. त्याच्या या वाक्यातच मंदिराचा खूप मोठा इतिहास दडलाय, लपलाय. कित्येक दशकं पंढरीतल्या बडवे मंडळींच्या ताब्यात मंदिर होतं. या बडव्यांच्या एकेक कारनाम्यानं इथला कारभार नेहमीच वादग्रस्त ठरला होता. विठ्ठल मूर्तीला चक्क मिठी मारून त्याच तांब्यात स्वत:ही स्नान करणारे महाभाग एकेकाळी पंढरीनं पाहिले होते. अखेर युती सरकारच्या काळात मंदिर समिती प्रत्यक्षात कार्यरत झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुडबुक’मधील मंडळींची समितीवर वर्णी लागली. आता महाआघाडी सरकार आलं. सध्याच्या काळात हे मंदिर कसं नेहमीच वादग्रस्त राहील, यासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्यांना इथल्या अधिकाºयांनी आयतीच संधी उपलब्ध करून दिली.

प्रक्षाळपूजेतील कार्यकारी अधिकारी म्हणजे विठ्ठल जोशी. यांचं मूळ नाव सुनील हा भाग वेगळा. विठ्ठलाच्या सेवेसाठी या विठ्ठलाची निवड झाल्यानंतर त्यांनी अनेक उपक्रम राबविले. लॉकडाऊन काळात मंदिराला प्राचीन वास्तूचा रंग देण्यापासून ते दर्शनरांगेतील चुकीचे मजले बदलण्यापर्यंत अनेक कामं त्यांनी राबविली. मात्र, ‘पूजेवेळी पुजाºयांकडून चुकून पाणी टाकलं गेलं असावं’ हे त्यांचं स्पष्टीकरण क्षणात त्यांना खोटारडेपणाचं लेबल लावून गेलं. कारण, व्हिडिओतील ‘आमचीच प्रक्षाळपूजा केली कीऽऽ’ हे त्यांचं वाक्य लाखो वारकºयांनी ऐकलेलं. एक चूक लपविण्यासाठी केलेली त्यांची दुसरी चूक समिती सदस्यांच्या पथ्यावरच पडली. त्यांनी ‘गाभाराबंदी’चा निर्णय घेतला. मात्र, यानंतर ‘अधिकाºयांना टार्गेट करून शासन कसं बदनाम होईल, याची वाट पाहणाºया विरोधी पक्षांचे पदाधिकारी या साध्या घटनेचा बागुलबुवा करताहेत,’ असा प्रत्यारोप झाला. तसंच मंदिरातील कर्मचारी संघटनेनं कामबंद आंदोलन जाहीर केलं. आता मंदिरात कामबंद म्हणजे विठ्ठल-रुक्मिणीची पूजाही होणार नाही की काय, या अनाकलनीय भीतीनं सर्वसामान्य भक्तांच्या पोटात गोळा उठला.

खरं तर मंदिर समितीच्या सदस्यांनी केवळ ठराव करून शासनाकडे पाठवायचे असतात. त्यावर प्रत्यक्षात निर्णय प्रशासनाने घ्यायचे असतात, असाही दावा केला गेला. त्यामुळं मंदिर समितीच्या ‘गाभाराबंदी’ आदेशाला काहीच अर्थ नाही, असंही सांगितलं गेलं. काहीही असो. जुने बडवे गेले. मात्र, नव्या सरकारी बडव्यांच्या दरबारातील या प्रति विठ्ठलामुळं पक्षीय राजकारणाला उगाच चेव आला आहे, हेच खरं. अशातच सुरुवातीला या स्नान विधीवर जोरदार आक्षेप घेणाºया मंडळींनी संबंधित अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखविली आहे. आता राहता राहिला विषय, हा धार्मिक कम राजकीय वाद मिटणार कसा? कारण, ‘आम्हाला मंदिरापेक्षा कोरोना महत्त्वाचा आहे,’ असं सांगणाºया बारामतीकरांच्या ताब्यातच या सरकारचा रिमोट आहे ना!

Web Title: 'Prati Vitthal' in the court of government rulers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.