प्रभूजी, महाराष्ट्राला काय देणार?
By Admin | Updated: February 21, 2015 02:17 IST2015-02-21T02:17:43+5:302015-02-21T02:17:43+5:30
दहा वर्षांत एकूण ९९ रेल्वेमार्ग जाहीर करण्यात आले. पैकी केवळ एकच पूर्ण झाला. अनेक मार्ग ३०-४० वर्षे जुने आहेत. रेल्वेच्या अनेक योजना पाच वर्षेही पूर्ण होणार नाहीत अशा आहेत.

प्रभूजी, महाराष्ट्राला काय देणार?
रेल्वेची आर्थिक परिस्थिती बिघडण्याला यूपीए सरकार कसे कारणीभूत होते, हे सांगून वेळ मारून नेण्यात आली होती खरी, पण पहिल्या शंभर दिवसांतच सदानंद गौडा नापास झाले आणि त्यांच्या जागी सुरेश प्रभू यांना आणावे लागले. प्रभूंनी हाती छडी घेऊन कामाला धडाकेबाज सुरुवात केली, पण पैशाचे सोंग कसे आणणार? पेशाने सीए असलेले प्रभू आल्या दिवसापासून रेल्वेची बॅलन्सशिट घेऊन बसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेली वर्ल्डक्लास रेल्वे त्यांना प्रत्यक्षात उतरवायची आहे. काम सोपे नाही.
दहा वर्षांत एकूण ९९ रेल्वेमार्ग जाहीर करण्यात आले. पैकी केवळ एकच पूर्ण झाला. अनेक मार्ग ३०-४० वर्षे जुने आहेत. रेल्वेच्या अनेक योजना पाच वर्षेही पूर्ण होणार नाहीत अशा आहेत. ‘मॅन आॅफ इनोव्हेशन’ अशी ख्याती असलेले प्रभू यावेळी ‘आउट आॅफ बॉक्स’ योजना नक्कीच घेऊन येणार आहेत. त्यामुळे नवी भर पडून अर्थसंकल्प रंजक असेल. ६० हजार कोटींची आवश्यकता असलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेन व मेट्रो शहरांना जोडणाऱ्या हायस्पीड ट्रेन्सचा सध्या विचारही करायला नको. मराठी प्रभूंकडून महाराष्ट्राला काय मिळणार, असे विचारले जात आहे. त्याचे कारण, ज्या भागाचा रेल्वेमंत्री असतो, त्या क्षेत्राचे भले करण्याचा चंग तो बांधतो. अवघे साडेचार महिन्यांचे रेल्वेमंत्री असलेल्या सदानंद गौडा यांनीही पाच मोठ्या योजना कर्नाटकात नेल्या होत्या. याउलट मराठी माणूस महाराष्ट्राशी नाते सांगतो, पण देशाचा विचार करतो. त्यामुळे यापूर्वी हे खाते महाराष्ट्राकडे येऊनही महाराष्ट्राला फारसा फायदा झालेलाच नव्हता. प्रभूंकडून अपेक्षा आहेत.
महाराष्ट्राची रेल्वे कनेक्टिव्हिटी एकसंध नाही. कोकण रेल्वेचे कौतुक होते, मुंबईला थोडेफार मिळते आणि महाराष्ट्र उघड्यावरच
राहतो. रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, विद्युतीकरण राहतो. रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण, विद्युतीकरण व मोठ्या पुलांच्या बळकटीकरणासोबतच अनेक ठिकाणी मानवरहित फाटकांच्या समस्येचे निराकरण करण्याची नितांत गरज आहे. मुंबईतून मोठा महसूल रेल्वेला मिळतो, पण मुंबईकरांच्या सुरक्षित जीवनाशी रेल्वेला घेणे-देणे नाही. रेल्वेमुळे जीव गेलेल्यांची संख्या नजरेखालून घालण्याचा दुर्दैवी छंद मुंबईकरांना आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद या मार्गाचे सुसूत्रीकरण कधी होईल? नांदेडला मध्य रेल्वेचे प्रादेशिक मुख्यालय कधी मिळेल? वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गाला पूर्ण आर्थिक ताकद कधी मिळेल? पुणे-कोल्हापूर- चिपळूण मार्ग कोकण रेल्वेला जोडण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचे घोंगडे अजून भिजतच आहे, असे अनेक विषय प्रभूंच्या दिशेने जातात.
शेती उत्पादनासह नाशवंत पदार्थांच्या निर्मिती ते बाजारपेठ या सुलभ वाहतुकीसाठी स्पेशल किसान एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विदर्भ भूमीतून तिचा प्रारंभ झाल्यास प्रभूंचा ठसा उमटेल. पुढच्या आठवड्यात सादर होणारा रेल्वे अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी ‘अच्छे दिन’ घेऊन येतो का, त्याचीच उत्सुकता आहे.
आबा व दिल्ली
दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या तासगावच्या विधानसभा निवडणुकीतील यंदाच्या विजयाची आठवण कायम ताजी राहील. आबांना पराभूत करायचेच हा चंग भाजपाने बांधला होता. भाजपाची फौज तासगावात फिरत होती. प्रचारयुद्ध शिगेला होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तासगावात सभा घेतली. विशेष म्हणजे, मोदींच्या सभेमुळे वातावरण बदलल्याची जाणीव होत असल्याने शरद पवार यांनी तासगावची सभा रद्द केली. आबांच्या मतदारसंघात पवार फिरकलेच नाहीत. (असं सांगतात की आबांनीच त्यांना येऊ नका म्हटले होते.) आबांनी एकहाती किल्ला लढवला.. आणि पूर्वी कधीच नव्हे एवढ्या मोठ्या फरकाने आबांनी विजय मिळवला. राज्यात मोदींच्या २४ सभा झाल्या होत्या. त्यात तासगावची एक ! पण मोदींची सभा होऊनही आबा मोठ्या फरकाने विजयी झाल्याने भाजपाने त्या मतदारसंघाचा अभ्यास सुरू केला. दुर्दैवाने आबा गेले..
- रघुनाथ पांडे