शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

पद कामाचे मंत्री मिरवायचे

By वसंत भोसले | Updated: January 5, 2020 00:35 IST

महाराष्ट्राने देशाला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यात रोजगार हमी, स्वच्छता अभिमान, सहकारी साखर कारखानदारी, आदींचा समावेश आहे. त्यात भर घालण्यासाठी मंत्र्यांनी काम करावे. आता साठीकडे झुकणारे मंत्रिगण फारसे काही करतील असे वाटत नाही. अपेक्षा आहे ती आदित्य ठाकरे ते ऋतुराज पाटील यांच्याकडून! मंत्रिपदे येतील-जातील, तुम्ही पुढील पिढीसाठी काय देऊन जाणार आहात, यावरच तुमची ओळख राहावी!

ठळक मुद्दे-- रविवार विशेष जागरअपेक्षा आहे ती आदित्य ठाकरे ते ऋतुराज पाटील यांच्याकडून! मंत्रिपदे येतील-जातील, तुम्ही पुढील पिढीसाठी काय देऊन जाणार आहात, यावरच तुमची ओळख राहावी!

- वसंत भोसलेलोकांना तुमची धडपड दिसली की, ते साथ देतात. लोक बेईमान नसतात. आपण त्यांना बेईमान करतो. कारण आपण कामाऐवजी मिरविण्यात हौस मौज करून घेतो. तेव्हा मतदारही तुमची जिरवितो. लोकांना विश्वासात घेतले की, सर्व काही सुरळीत पार पडते. महाराष्ट्राला फार मोठी झेप घ्यायची असेल तर बदलायला हवे. विकासाचा क्रम ठरविण्यासाठी फेरमांडणी करायला हवी आहे.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा दणक्यात विस्तार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही जागा शिल्लक ठेवलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनविले गेले आहे. त्यातील अनेकांना कामाचा मोठा अनुभव आहे, तसेच मिरविण्याचाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यात आघाडीवर असतात. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्या पलीकडे जाऊन नवे काहीतरी घडविण्याचे काम यांनी करायला हवे. सामान्य माणूस जरी गावात राहत असला, तरी राज्याचे सरकार कसे काम करते, ते कोठे बसते, काय खाते, कोणाचे खिसे भरते, आदी आता समजू लागले आहे. गावाकडच्या माणसांची नवी पिढी जगभर फिरू लागली आहे. तुम्हा मंत्र्यांचीच मुले लंडन किंवा अमेरिकेत शिकायला जात असतात, तसा सामान्य माणूसदेखील तिथे आता जाऊ लागला आहे. त्यालाही सिंगापूर कळते. मलेशिया दिसते आणि अमेरिकेची प्रगती कशी होते, हे समजते आहे.

हस्तिदंताच्या मनोऱ्यात बसून किंवा वातानुकूलित खोलीत बसून राज्य कारभार करायचे सोडा, असे पूर्वी म्हटले जायचे. या दोन प्रकारच्या जागा म्हणजे ऐषाराम वातावरणाच्या मानल्या जात होत्या. वातानुकूलित खोली आता साधा माणूसही अनुभवतो आहे. हस्तिदंताचा वापर करण्यावर बंदी असली तरी त्याचा मथितार्थ तो जाणतो आहे. यासाठी बाहेरचे जग पाहण्याची गरज आता उरली नाही. कोल्हापूर किंवा बेळगावलादेखील वर्षाला विमानाच्या शेकडो फेºया होऊ लागल्या आहेत. त्या केवळ मंत्र्यांच्या नाहीत. त्या श्रीमंत वर्गाच्यासुद्धा नाहीत, तर त्या मध्यमवर्गियांच्या आहेत. राज्य सरकारलाच आता विमानाचा प्रवास परवडत नाही. मंत्रिगण प्रतिष्ठेसाठी खासगी विमानाने किंवा हेलिकॉफ्टरने येतात. निव्वळ धावत असतात. कामाचे काय होते, समजत नाही. जिल्हा नियोजन समितीची सहा-सात तास बैठका झाल्या. त्यात प्राधान्याने करायची कामे निश्चित झाली. जिल्ह्याची सध्याची आर्थिक, औद्योगिक, कृषी, पशुधन, शिक्षण आणि आरोग्याची प्रगती कुठंवर आली आहे, याचा आढावा मांडला, सूचना स्वीकारल्या. त्यावर कृती आराखडा तयार केला. आपल्या पालकमंत्रिपदाच्या कालखंडात जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणे राहू द्या, किमान काहीतरी प्रयत्न करताहेत, असे तरी जाणवू द्या, अशी अपेक्षा करणे चूक ठरेल का? अमेरिका, इंग्लंड किंवा युरोप खंडातील कोणत्याही शहराचा महापौर इतका पॉवरफुल असतो की, शहराचे पोलीससुद्धा त्यांच्या अखत्यारित येतात. त्या शहराची पाणीपट्टी, घरपट्टी वसूल करणे, दिवाबत्ती पाहणे आणि सांडपाणी जवळच्या नदीत सोडणे एवढेच काम नसते. संपूर्ण शहराची आर्थिक प्रगती कशी होईल. रोजगार कसा वाढीस लागेल. कायदा-सुव्यवस्था कशी राखली जाईल, याची जबाबदारी महापौरांवर असते. आपले महापौर पद म्हणजे यात्रेतील शोभेचे बाहुले झाले आहे. त्याला ना अधिकार, ना दिशा देण्याचे धोरण आखण्याचे अधिकार? काहीच अर्थ नसलेले पद कोणते तर महापौर ! तसेच पालकमंत्रिपदाचे झाले आहे.

विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचा मी काही चाहता नाही. मात्र, गेल्या एक महिन्यापासून ते मुख्यमंत्री झाल्यापासून वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पाहतो आहे की, हे मुख्यमंत्री काहीतरी करू इच्छितात. विधिमंडळातील त्यांचा वावरही फारच महत्त्वपूर्ण होता. त्यांची देहबोलीही चांगली होती. त्यांनी उत्तम टीम तयार करायला हवी आहे. त्यावर सर्व भिस्त असणार आहे. १०५ हुतात्मे होऊन महाराष्ट्राने मिळविलेली मुंबईही महत्त्वाची आहे. प्रचंड आर्थिक उत्पन्न देणारी ही महानगरी आहे. यासाठीच मराठी नेत्यांनी संघर्ष केला होता आणि गुजराती लोकांचाही त्यासाठीच आग्रह होता. महानगरीच्या समस्या या जटिल वाटतात. त्या सुटत नाहीत. त्यांच्यात भरच पडते, असे वाटते, पण महाराष्ट्राची तिजोरी भरणारी हीच महानगरी आहे. आपण तिची ताकद ओळखून विकास केला पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही ती ताकद आहे, ती ओळखली पाहिजे. सांगली किंवा नाशिकच्या पूर्व भागात कमी पावसाच्या पट्ट्यात हजारो कोटींची द्राक्षे उत्पादित होतात. सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा बेदाणा तयार होतो. सोलापूरसारख्या कमी पावसाच्या पट्ट्यात द्राक्षे, बोरं, डाळिंबे यांचे उत्पादन होते. मराठवाड्यासाठी नव्या पिकांची उभारणी करावी लागणार आहे. पाणी द्यावे लागेल.पश्चिम घाटातील (सह्याद्री पर्वतरांगा) धरणांतून पश्चिमेकडे वळविलेले पाणी पूर्वेला सोडून त्याचा वापर शेती, उद्योग आणि शहरांच्या विकासासाठी करायला हवा आहे. १४८ टीएमसी पाणी पश्चिमेकडे वळविले जाते. सुमारे दोन हजार मेगावॅट विजेची निर्मिती होते. त्या बदल्यात सोलर एनर्जीला प्रोत्साहन देऊन तूट भरून काढता येऊ शकते. कारखाने, उद्योग-व्यापार आणि रस्त्यावरच्या दिव्यांनाही सोलर एनर्जीचा वापर करायला हरकत नाही. ऊर्जा क्षेत्रात कितीतरी काम करता येण्याजोगे आहे. कृषी क्षेत्राची फेरमांडणी करण्याची गरज आहे. दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करीत असेल, तर रयतेच्या राजाचे नाव घेण्याचाही अधिकार राज्यकर्त्यांना नाही. रयतेला जगविण्याऐवजी स्मारक हवे का? याचाही विचार करावा. महाराष्ट्राचे कोणतेही क्षेत्र घ्या, त्यात आमूलाग्र बदलाची गरज निर्माण झाली आहे. आदित्य ठाकरे, विश्वजित कदम, प्राजक्त तनपुरे, आदिती तटकरे, प्रणिती शिंदे, ऋतुराज पाटील, शंकरराव गडाख अशा तरुणांनी एकत्र यावे. त्यांनी जुन्या मंडळींना बाजूला करावे. नवे काहीतरी करू पाहणा-या अधिकारी, तज्ज्ञ, अभ्यासकांच्या मदतीने नवा महाराष्ट्र उभारण्याचे स्वप्न पाहावे. पैसा, प्रतिष्ठा आणि मिरविण्याची हौस सोडून द्यावी, अशी अपेक्षा करण्यात नवीन काही नाही. पूर्वीच्या काळी अनेक नेत्यांनी अशी कामे केली आहेत.

यशवंतराव चव्हाण यांचा कालखंड आठवून पाहा, मराठी माणसांची मने विखुरली होती. तेव्हा केवळ काही वर्षांत महाराष्ट्राला एक दिशा घालून दिली. कृषी, ग्रामविकास, पंचायतराज, कृषी-औद्योगिक धोरण, सहकार चळवळ, पायाभूत उभारणी (धरणे, वीजनिर्मिती, रस्ते बांधणी), साहित्य मंडळाची स्थापना अशा सर्व पातळीवर त्यांनी साधने, पैसा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ नसताना काम केले. बाळासाहेब देसाई यांचा दरारा महाराष्ट्रभर होता. कुळ कायदा लागू करणे असो की, तरुणाला पोलीस करणे असो! वाघासारखा डरकाळ्या फोडणारा हा माणूस ११ डिसेंबर १९६७च्या पहाटे कोयनानगर परिसरात भूकंप झाला तेव्हा प्रत्येकाच्या घरा-दारापर्यंत जात होता. माणसांना थंडीपासून संरक्षणासाठी हजारो घोंगड्यांची आॅर्डर काढणारा हा नेता होता. त्याचवर्षी लोकांनी त्यांना बिनविरोध निवडून दिले. महाराष्ट्राच्या इतिहासात सार्वजनिक निवडणुकीत विधानसभेवर बिनविरोध निवडून येणारे ते पहिले उमेदवार होते. लोकांना तुमची धडपड दिसली की, ते साथ देतात. लोक बेईमान नसतात. आपण त्यांना बेईमान करतो. कारण आपण कामाऐवजी मिरविण्यात हौस मौज करून घेतो. तेव्हा मतदारही तुमची जिरवितो. लोकांना विश्वासात घेतले की, सर्व काही सुरळीत पार पडते.

महाराष्ट्राला फार मोठी झेप घ्यायची असेल तर बदलायला हवे. कापसाची शेती दुरुस्त करायला हवी. कोरडवाहू शेतीतील बियाणे बदलायला हवे. उत्पादित अन्नधान्याचा व्यापार उभा करायला हवा. त्यांना व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधून चालणार नाही. सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा राज्याला लाभला आहे. एकच नवे बंदर (जवाहरलाल नेहरू पोर्ट) उभे केले. काही खासगी क्षेत्रातील मंडळींनी बंदरे उभी केली आहेत. ती रेल्वे आणि उत्तम रस्त्यांनी जोडायला हवी आहेत. जयगड बंदराला रत्नागिरी जिल्हादेखील नीट जोडला गेला नाही. सांगली जिल्ह्यातील कासेगाव (अर्थमंत्री जयंत पाटील यांचे गाव) येथील शेतकºयाने पपईला भाव मिळाला नाही म्हणून संपूर्ण बागच काढून टाकली. नांगरच फिरविला. मला वाटत नाही की, एकाही कृषी अधिकाºयाने त्यांची भेट घेतली असेल? एकाही लोकप्रतिनिधीने फोन करून तरी चौकशी केली असेल? यावर्षी परतीचा पाऊस पडला नसता तर गुरे-ढोरे रानावनात सोडून द्यावी लागली असती. रेल्वेच्या वॅगन भरून पाण्याचा पुरवठा मराठवाड्याला करावा लागला असता.

यासाठीच तर संपूर्ण राज्याच्या विकासाचा क्रम ठरविण्यासाठी फेरमांडणी करायला हवी आहे. यासाठी नव्या नेतृत्वाने विचार करावा. शेकडो-हजारो कोटींची संपत्ती गोळा करणा-यांचे पुतळे होत नाहीत. निधन झाले तेव्हा बँक खात्यात केवळ चौदा हजार रुपये असणाºया यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे राज्याच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालय, शहरात आहेत. अलीकडेच नांदेडला जाण्याचा योग आला. नांदेडचे नेतृत्व अनेक वर्षे शंकरराव चव्हाण यांनी केले होते. त्यांचे छान स्मारक आहे. त्यासमोर शंकरराव चव्हाण यांचा पुतळा आहे, पण व्हीआयपी रोडवर यशवंतराव चव्हाण यांचा भव्य पुतळा आहे. शिवाय महाराष्ट्राचा इतिहासच

पूर्ण होत नाही, हे वास्तव आहे. त्यांचा हा वारसा आहे. आपण आपल्या वारसदाराला खासदार, आमदार करण्यासाठी धडपड करतो आहोत. लोकांनी काहीवेळा नाकारले तरी प्रयत्न करतो आहे. शरद पवार यांच्यासारख्या आगळ्यावेगळ्या घराण्यालाही तो मोह टाळता आला नाही. त्यांचाही आदर्श पाळता आला नाही, ही शोकांतिका आहे. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा त्यांनी चालविला. त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी नाशिकचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब हिरे यांची एक आठवण पुन्हा लिहावी असे वाटते. भाई माधवराव बागल यांना भेटण्यासाठी ते मंत्री असताना कोल्हापुरात आले. सत्यशोधक बागल यांच्या घरी मंत्र्यांची गाडी आणि पोलीस वाहनांसह जाणे बरोबर दिसणार नाही म्हणून त्यांच्या घरापासून शंभर मीटरवर ते गाडीतून उतरून चालत गेले. ही साधेपणाची कल्पना आहे, समंजसपणा आहे, सौजन्य आहे. महाराष्ट्राला सौजन्य ते बिनधास्तपणा, नीडरपणा अनेक नेत्यांनी शिकविला. त्याग, समर्पण शिकविले. त्यात यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी, माधवराव गायकवाड, श्रीपाद अमृत डांगे, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद जोशी, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील, पंजाबराव देशमुख, शेषराव वानखेडे, भाऊसाहेब हिरे, गणपतराव देशमुख, एन. डी. पाटील, रामभाऊ म्हाळगी, अशी कित्येक नावे घेता येतील. श्रीपाद अमृत डांगे यांनी याच विधिमंडळात औद्योगिक कलह कायद्याच्या मसुद्यावर सलग आठ तास भाषण केले होते.महाराष्ट्राने देशाला एक नवी दिशा दाखविली आहे. त्यात रोजगार हमी, स्वच्छता अभिमान, सहकारी साखर कारखानदारी, आदींचा समावेश आहे. त्यात भर घालण्यासाठी मंत्र्यांनी काम करावे. आता साठीकडे झुकणारे मंत्रिगण फारसे काही करतील असे वाटत नाही. अपेक्षा आहे ती आदित्य ठाकरे ते ऋतुराज पाटील यांच्याकडून! मंत्रिपदे येतील-जातील, तुम्ही पुढील पिढीसाठी काय देऊन जाणार आहात, यावरच तुमची ओळख राहावी!

टॅग्स :ministerमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र