कडक चहाने गरीबांचीच तोंडे भाजली

By Admin | Updated: November 16, 2016 07:48 IST2016-11-16T07:48:24+5:302016-11-16T07:48:24+5:30

मी पितो तसा कडक चहा धनवंतांना मानवत नाही’ असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनबदलामुळे देशात उसळलेल्या संतापाविषयी बोलताना

The poor people cheated poor people | कडक चहाने गरीबांचीच तोंडे भाजली

कडक चहाने गरीबांचीच तोंडे भाजली

मी पितो तसा कडक चहा धनवंतांना मानवत नाही’ असे भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनबदलामुळे देशात उसळलेल्या संतापाविषयी बोलताना व्यक्त केले असले तरी ते पचणारे, पटणारे व सध्याचा संताप घालविणारे नाही. चलनबदलाचा निर्णय कडक खरा, पण त्यामुळे आपल्याकडील नोटांचे गठ्ठे बदलून घ्यायला कोणी धनवंत, उद्योगपती, पुढारी वा बडे व्यावसायिक बँकांसमोरच्या रांगांत कुठे दिसले नाहीत. या रांगेत ताटकळणारी (आणि त्यातच काहींचा मृत्यू झालेली माणसे) गरीब आणि मध्यमवर्गी होती. घरात काही पैसे असावेत म्हणून तशी तजवीज करणारी साधी माणसेच या रांगांच्या सापळ््यात दिसली. मध्यमवर्गाची संख्या आता ४० टक्क्यांएवढी वाढली असल्याने या रांगा मोठ्या आहेत आणि त्यातून जमा झालेली रक्कमही तीन लक्ष कोटींएवढी मोठी आहे. मात्र ज्या थोड्या माणसांजवळ त्याहून मोठी रक्कम असल्याचा सरकार व जनतेला वहीम आहे ती माणसे कुठे गेली? त्यांनी तीस हजारांचे सोने पन्नास ते साठ हजारात खरेदी केले. जमिनी घेतल्या, मालमत्तांचे सौदे केले. अशा माणसांचा मोठा पैसा कधीचाच विदेशातही पोहचला असेल. त्यामुळे मोदींच्या निर्णयावर एकाही उद्योगपतीने वा धनवंताने टीका केल्याचे वा त्याविषयीची साधी तक्रार केल्याचेही कुठे दिसले नाही. ज्या राजकीय पक्षांजवळ कोट्यवधींचा निधी जमा होता तो त्यांनी मोदींचा निर्णय जाहीर होण्याआधीच बँकात भरल्याच्या बातम्या आल्या. भरडली गेली ती सामान्य माणसे. त्यांना या निर्णयामुळे देशातला काळा पैसा बाहेर येणार असल्याच्या थापा ऐकवल्या गेल्या. प्रत्यक्षात बाहेर आला तो पैसा पांढराच निघाला आणि तोही हिशेबात बसणाराच होता. मोरारजी देसाईंच्या सरकारने याआधी असा निर्णय घेतला तेव्हा देशाच्या चलनातील बड्या नोटांचे प्रमाण दहा टक्क्यांएवढे होते. आता ते ८६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. एवढ्या नोटा खरोखरीच सरकारात वा बँकात जमा झाल्या काय, हा आताचा खरा प्रश्न आहे. या संबंध काळात धनवंत सुखावलेलेच दिसले. त्यांना मोदींचा कडक चहा तेवढासा जाणवलाही नाही. त्या चहाने ज्यांची तोंडे भाजली ती माणसे सामान्यच होती आणि त्यांचाच संताप आता संघटित होत आहे. काँग्रेसपासून कम्युनिस्टांपर्यंत आणि सपा-बसपापासून तृणमूलपर्यंतचे पक्ष त्यासाठी एकत्र आले आहेत. खरा आक्षेप आपल्या राष्ट्रीय बँकांबाबतचा आहे. या बँकांची कर्जवसुली ८० टक्क्यांएवढी थकली आहे. त्याचा आकडा पाच लक्ष कोटींएवढा मोठा आहे. परिणामी याच उद्योगपतींना द्यावयाच्या वाढीव कर्जांसाठी या बँकांजवळ पैसा नाही. मध्यम व सामान्य माणसांना चलन बदलाचा कडक चहा पाजून सरकारने त्यांच्याकडून आता घेतलेले तीन लक्ष कोटी या बँकांत आले आहेत. परिणामी जुन्या कर्जबुडव्यांना वाढीव कर्जे देण्याची त्यांची क्षमताही बळावली आहे. देशातील सात उद्योगांकडे असलेली या कर्जाची थकबाकी पाच लक्ष कोटी एवढी आहे. त्यातल्या एकट्या अदानींची थकबाकी ७२ हजार कोटींएवढी आहे. देशभरच्या शेतकऱ्यांकडील थकबाकी आणि अदानींची थकबाकी सारखी आहे हे लक्षात घेतले तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करता येणे कसे जमणारे आहे हेही येथे लक्षात यावे. या निर्णयाचा एक लाभ सरकारपासून नगरपालिकांपर्यंतचे थकीत कर वसूल होण्यात झाला हे मान्य करूनही या निर्णयाचे खरे लाभार्थी देशातले कर्जबुडवे व धनवंतच ठरणार आहेत यात शंका नाही. सरकारने काहीही केले आणि त्याचा केवढाही विपरित परिणाम लोकजीवनावर दिसला तरी त्याचे गोडवे गाणाऱ्यांचा एक मोठा वर्ग सरकार पक्षाएवढाच देशातील माध्यमांतही तयार झाला आहे. ‘हा निर्णय कसा क्रांतीकारी आहे आणि येत्या काही दिवसांत त्याचे लाभ देशाला कसे दिसणार आहेत’ हे वर्तमानात गांजविल्या जाणाऱ्या लोकांना ऐकवणारे प्रचारी प्रवक्ते आणि माध्यमांतील विकाऊ लोक याच काळात समाजात आघाडीवर दिसले आहेत. बँकांपुढील रांगांत मृत्यू झालेल्या माणसांविषयी ‘असे मृत्यू रेशनच्या रांगेतही येतात’ असे कमालीचे संवेदनशून्य वक्तव्य भाजपाच्या एका नेत्याने समाजाला ऐकविले आहे. आश्चर्य याचे की चलनबदलाचा ज्यांना खरा फटका बसावा आणि ज्यांचे व्यवहार ठप्प व्हावे असे वाटावे त्यांचे सगळे व्यवहार तसेच निर्वैध व जास्तीच्या तेजीत या काळात झाले. सोन्यानाण्याच्या किंमती पडल्या नाहीत आणि मालमत्तेचे अस्मानाला भिडलेले भावही उतरले नाहीत. रोजच्या रोज कमावणारी आणि हातावर खाणारी माणसे या निर्णयाने खंगली आणि मध्यमवर्गातील माणसे हवालदील झाली. शिवाय मोदींएवढा कडक चहा पिण्याची सवय असलेला वर्ग केवळ गरीब वा मध्यमवर्गातच नाही, तो धनवंतांमध्येही आहे. त्यामुळे आपल्या निर्णयाचा परिणाम केवळ बड्यांची झोप उडविण्यात झाला या समजात मोदींनीही राहण्याचे कारण नाही. जनतेत रोष आहे आणि तो यथावकाश प्रगटणारही आहे.

Web Title: The poor people cheated poor people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.