राजकारण रामदास आठवल्यांचे
By Admin | Updated: April 19, 2015 01:34 IST2015-04-19T01:34:18+5:302015-04-19T01:34:18+5:30
एका चित्रपट गौरव सोहळ्यात सादर झालेल्या कवीसंमेलनात सागर कारंडे नावाच्या नटाने रामदास आठवलेंच्या रूपात कविता सादर केल्या.

राजकारण रामदास आठवल्यांचे
एका चित्रपट गौरव सोहळ्यात सादर झालेल्या कवीसंमेलनात सागर कारंडे नावाच्या नटाने रामदास आठवलेंच्या रूपात कविता सादर केल्या. त्याचा पेहराव, हावभाव हमखास विनोदनिर्मिती करणारे होते. त्याच्या बरेच आठवडे आठवलेच्या नावाने अनेक कविता फेसबुक आणि व्हॉट्सअपवर फिरत होत्या. त्यामुळे रामदास आठवले, त्यांचे सहकारी आणि पक्ष दुखावल्याचेही प्रसिद्ध झाले होते. इतक्या कमी कलावधीत इतकी हास्यास्पदता एखाद्या माणसाने चुकूनच मिळवली असेल. पण हा लेख विनोदनिर्मितीसाठी नाही. रामदास आठवलेंच्या शोकात्म होऊन बसलेल्या राजकारणाचे रूप समजून घेण्यासाठी आहे.
ली दोन-तीन दशके रामदास आठवले राजकारणात आहेत. दलिथ पँथरची शकले होण्यापासून रिपब्लिकन पक्षाच्या चिरफाळ्या होईपर्यंत आणि शरद पवारांचे मांडलिक म्हणून काम करण्यापासून सेना-भाजपाच्या राजकारणाला निळी झालर लावण्यापर्यंत मोठा राजकीय पल्ला त्यांनी गाठलेला आहे. यादरम्यान त्यांना एकदा मंत्रिपद मिळाले. एकदा ते लोकसभेवर गेले. खूप अजीजी करून का होईना ते आता राज्यसभेवर गेले आहेत. अजूनही त्यांना केंद्रातल्या मंत्रिपदाची आस आहे.
त्या काळात त्यांनी आपल्या परीने संघटन बांधण्याचा प्रयत्न केला. पण विधिमंडळात त्याच्या पक्षाला काही स्थान नाही. आमच्यामुळे आधी आघाडीचे आणि मग महायुतीचे उमेदवार निवडून आले असा दावा ते करीत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या पक्षातले किती लोक निवडून आले याचे उत्तर शून्यच आहे. राज्यव्यापी संघटना न बांधता येणे, बिगर दलितांपर्यंत पोचण्यासाठी सोशल इंजिनीअरिंगचा यशस्वी प्रयोग न करता येणे या त्यांच्या प्रमुख मर्यादा आहेत. वर्षानुवर्षे महाराष्ट्रातल्या दलितांचे संघटन जर थेट बोलायचे झाले तर रिपब्लिकन पक्षाचे संघटन हे पूर्वाश्रमीच्या महार समाजापासून आताच्या नवबौद्ध समाजापर्यंत मर्यादित आहे. त्यापलीकडे जाऊन बिगर
दलित समाजाचे संघटन करावे असे प्राधान्याने दलितांच्या असलेल्या संघटनांना वाटलेच
नाही किंवा जमलेच नाही. त्याला रामदास आठवले यांचा पक्षही अपवाद नाही. मात्र सर्व दलितांचे संघटनही त्यांच्या पक्षाला जमले आहे का, हा खरा प्रश्न आहे.
जवळपास एक दशकाहून अधिक काळ रामदास आठवले सुरु वातीला काँग्रेससोबत व नंतर राष्ट्रवादीसोबत होते. त्यांचे शरद पवारांशी असलेले चांगले संबंध हे त्याचे कारण होते. त्यांना समाजकल्याण आणि परिवहन ही खाती असणारे मंत्रिपदही मिळाले. (याच मंत्रिपदाच्या काळात हजारो परप्रांतीयांना रिक्षा-टॅक्सीचे परमिट देऊन मराठी माणसाच्या बोकांडी बसवले असाही त्यांच्याबद्दल आक्षेप आहे.) पण एका टप्प्यानंतर आपला आणि आपल्या पक्षाचा फक्त वापर होत आहे असे वाटल्यानंतर रामदास आठवले यांनी ही सोयरीक मोडली आणि ते शिवशक्ती- भीमशक्तीच्या युतीचा भाग बनले. शिवसेना - भाजपामधले मतभेद तीव्र झाल्यामुळे आणि भाजपाचे दिवस चांगले आहेत असे आठवलेंना वाटल्यामुळे त्यांनी शिवसेनेपासून काडीमोड घेत भाजपाची साथ घेतली. (त्यामुळे अर्जुन डांगळे त्यांच्यापासून दुरावले. ते अद्यापही विधान परिषदेची जागा मिळेल या आशेने शिवसेनेसोबत आहेत.)
सत्ता मिळाल्यानंतरही भाजपाने रामदास आठवलेंना झुलवत ठेवले आहे. केंद्रात मंत्रिपद नाही. राज्यात आमदार नाहीत. पक्षाचा विस्तार होण्याची चिन्हे राहिली नाहीत आणि नवीन मित्र मिळवण्याची जागा राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीत रामदास आठवले अडकले आहेत. त्यांच्या दुर्दैवाने रामदास आठवलेंना फारशी सहानुभूतीही नाही.
रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडानंतर दलित समाज सगळ्याच दलित नेतृत्वावर चिडला होता. तेव्हा रामदास आठवले लोकांना भेटायला गेले. चिडलेल्या लोकांनी त्यांचा अक्षरश: पाठलाग केला. पण लोकांमध्ये जाण्याचे धैर्य दाखिवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. आज दुर्दैवाने त्यांच्या धैर्यापेक्षा त्यांच्या चारोळ्यांची चर्चा अधिक आहे. या हास्यास्पद स्थितीतून स्वत:ला बाहेर काढणे ही रामदास आठवले यांची जबाबदारी आहे. ते त्यांना कितपत जमते यावर त्यांचे अस्तित्व आणि भवितव्य अवलंबून आहे.
आठवलेंनी घेतली भाजपाची साथ
जवळपास एक दशकाहून अधिक काळ रामदास आठवले सुरु वातीला काँग्रेससोबत व नंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत होते. त्यांचे शरद पवारांशी
असलेले चांगले संबंध हे त्याचे कारण होते. एका टप्प्यानंतर आपला आणि आपल्या पक्षाचा फक्त वापर होत आहे असे वाटल्यानंतर ते शिवशक्ती- भीमशक्तीच्या युतीचा भाग बनले. पुढे या दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर भाजपामध्ये आपले काहीतरी होईल असे वाटल्याने त्यांनी भाजपाची साथ घेतली.
डॉ. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर रिपब्लिकन पक्षात जसे गवई, खोब्रागडे, गायकवाड, कांबळे अशी फूट पडली तसे सध्या रिपब्लिकन पक्षामध्ये आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे इत्यादींचे गट आहेत. इतर अदखलपात्र गट आहेत ते वेगळेच. या पक्षांमध्ये रामदास आठवल्यांची लोकप्रियता जास्त आहे असे दिसते. सर्व प्रमुख गटांचे ऐक्याचे प्रयोग इतक्या वेळा आले आहेत की त्याला आता विनोदमूल्यही उरलेले नाही. अशा परिस्थितीत रिपिब्लकन पक्षाचा एक एक गट किती काम करू शकेल व काही नवे सांगु शकेल का, हा खरा प्रश्न आहे.
डॉ. दीपक पवार