शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
3
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
4
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
5
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
6
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
7
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
8
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
9
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
10
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
11
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
12
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
13
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
14
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
15
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
16
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
17
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?
18
पराभवाच्या भीतीमुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव; भाजपाची बोचरी टीका
19
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' वस्तूंची खरेदी करेल मोठे नुकसान; ऐन दिवाळीत होईल पश्चात्ताप!

राजकारण ही काय ‘आयपीएल’ आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 09:02 IST

ज्याच्याविरुद्ध लढलो, त्याच विचारांची उपरणी गळ्यात घालणाऱ्या करिअरिस्ट नेत्यांना विचारावेसे वाटते, काहो, थोडाही पश्चात्ताप होत नाही का?

- शशी थरुर(ज्येष्ठ काँग्रेस नेते)

“ज्येष्ठ बंधू” ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पाठोपाठ जितीन प्रसाद भाजपमध्ये गेले ही अत्यंत दु:खदायक गोष्ट आहे.  हे दोघे माझे व्यक्तिगत मित्र. आमचे  एकमेकांच्या घरी जाणे-येणे ! पण म्हणून मला वाटणारा विषाद या दोघांशी संबंधित, दोघांपुरता नाही. या दोघांबद्दल नव्हे, पण या दोघांनी जे केले त्या कृतीबद्दल माझी नाराजी आणि विषाद आहे.  ज्योतिरादित्य आणि जितीन हे  दोघेही भाजप आणि त्या पक्षाच्या जातीयवादी भूमिकेने देशापुढे निर्माण केलेल्या धोक्याविरुद्धचा बुलंद आवाज होते. हे दोघेही अन्य कोणाहीपेक्षा भाजपविरुद्ध हिरीरीने बोलत, आणि आज तेच दोघे भाजपचे भगवे उपरणे गळ्यात घालून मिरवत आहेत. त्यातून पुढे आलेला निर्विवाद प्रश्न हा की, या दोघांना नेमके काय हवे होते? कोणती मूल्ये, निष्ठा घेऊन ते राजकारणात आले? केवळ स्वत:च्या  विकासासाठी की सत्तेसाठी? तत्त्वहीन राजकारण हे करिअर होऊ शकते का?

माणसाने राजकारणात का यावे ? - तर आपल्या विचारांना कृतीत उतरवण्यासाठी साधन मिळावे म्हणून ! विचार असतात, म्हणून त्या विचारांच्या आग्रहासाठी राजकारण असते, असले पाहिजे. विचारच पक्के नसतील तर मग राजकारण कशाचे ? कशासाठी ?तत्त्व, निष्ठा यांच्याशिवाय तुम्हाला करिअर करायची असेल तर बँकर व्हा किंवा वकील, लेखापाल होऊन पैसे कमवा.  राजकारण मात्र वेगळे आहे. परिपूर्ण समाजाविषयी राजकीय पक्षांच्या मनात काही संकल्पना असतात आणि त्या साकार करण्यासाठी ते प्रयत्न करतात. समाजबांधणी कशी करावी, त्याचा गाडा कसा हाकावा याविषयी त्यांच्या काही श्रद्धा असतात. तेच त्यांचे धोरण. तुम्ही तुमच्या निष्ठांचे वाहन म्हणून समानधर्मी पक्षात जाता. तुमची तत्त्व, कल्पना, श्रद्धा यांनाही राजकीय पक्ष संस्थात्मक चौकट उपलब्ध करून देतात. आपल्या राजकीय कारकीर्दीत तुम्हाला त्याच विचारांचा वसा घेऊन पुढे जायचे असते.

राजकारण म्हणजे काही आयपीएल नव्हे, असताही कामा नये. आज तुम्ही एक संघाकडून खेळता तर उद्या दुसऱ्या. आयपीएलमध्ये तुम्ही लेबल्स, गणवेश आणि खेळाडू यांची निवड करायची असते, पण  राजकारणात भूमिका असतात.  तुम्ही सार्वजनिक क्षेत्राचे समर्थक  असता, किंवा तुम्ही खुल्या उद्योगक्षेत्राचे पुरस्कर्ते असता. तुम्हाला सर्व समावेशक समाज हवा असतो किंवा तुकड्या तुकड्यात वाटलेला. उपेक्षितांचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला कल्याणकारी राज्य हवे असते किंवा ज्याने त्याने आपापले पाहावे असे तुम्हाला वाटते. विचारांचा एक संच असतो; त्याविरुद्ध दुसरा विचार असतो. आयपीएलमध्ये तुमचा संघ नीट कामगिरी करत नाही किंवा व्यवस्थापन तुम्हाला फलंदाजीसाठी हव्या त्या क्रमांकावर पाठवत नाही  असे तुम्हाला वाटले आणि तुम्ही या संघातून त्या संघात उडी मारली तर कोणी तुम्हाला दोष देत नाही. अधिक चांगली संधी आणि संघाच्या विजयात वाटा उचलण्याचा मोका दोन्ही साधण्याचा तुमचा अधिकार सगळे मान्य करतात. 

- राजकारणात असे नसते. एका विशिष्ठ राजकीय संघाच्या ध्येयधोरणावर विश्वास आहे म्हणून तुम्ही त्यात असता. मार खात असला तरी तो तुमचा संघ असतो, तुमची तत्वे, मूल्यांचे ते रूप असते. कप्तानाने तुम्हाला वाईट वागणूक दिली म्हणून तुम्ही तुमच्या तत्त्व, निष्ठांच्या विरुद्ध असलेला संघकप्तान निवडायचा नसतो. कारण तुमच्या राजकारणात खोल मुरलेल्या निष्ठा  नाकारणे कठीण असते. अर्थातच पक्ष म्हणजे काही पवित्र देव्हारा नसतो.  ज्याच्या हाती कारभार त्याच्या काही आवडी निवडी, ग्रह उणिवा, मर्मस्थाने असणारच. पक्षाचे तुमचे ध्येय धोरण एकच असेल; पण पक्षाला ते मतदारांपर्यंत प्रभावीपणे नेता येत नाही, पक्ष निष्प्रभ ठरत असल्याने चांगल्या ध्येयधोरणांना भवितव्य नाही असे तुम्हाला वाटत असेल... हे सारे शक्य आहे.

पक्ष सोडलाच पाहिजे असे तुमचे मत व्हायला काही कारणेही असतील. पण आधी तुम्ही ज्यासाठी झगडलात त्या तत्त्वांचा आणि तुमचा स्वत:चा आदर तुम्ही केला पाहिजे आणि जवळपास तशीच ध्येय धोरणे असलेल्या पक्षात गेले पाहिजे किंवा प्रादेशिक का होईना स्वत:चा पक्ष काढला पाहिजे. अगदी विरुद्ध ध्येयधोरणे असलेल्या पक्षात कदापि जाता कामा नये. यापूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्यांची ही धारणा असायची. त्यांनी पक्ष सोडले, फुटले, विलीन झाले, नवे पक्ष काढले, पण त्यांनी आपल्या निष्ठा त्यागल्या नाहीत. गेल्या काही वर्षांपासून मात्र करिअरिस्ट राजकारण्यांचा उदय आपण पाहतो आहोत. केवळ व्यवसाय म्हणून ते राजकारणात येतात. स्वत:च्या विकासापुढे त्यांना तत्त्व, निष्ठा यांची मातब्बरी नसते. कोणत्याही कारणांनी त्यांनी निवडलेला पक्ष चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला यशस्वी करण्यासाठी दीर्घ प्रयत्न करण्याची त्यांची मुळीच तयारी नसते.  राजकारणातील प्रक्रिया, जय पराजय, चढउतार याविषयी ते उतावीळ असतात. फक्त पुढच्या बढतीचा विचार करतात. ती त्यांना आत्ताच हवी असते. फार काळ वाट पाहायची त्यांची तयारी नसते.

आपल्या देशातील राजकारणी मुळातच पुढच्या निवडणुकीपलीकडे विचार करू शकत नाहीत. ते जेथे आहेत तेथे त्यांना काही आशादायी दिसले नाही तर ते जिथे दिसेल तिथे जायला, सरशीच्या बाजूने रहायला ते एका पायावर तयार असतात. कधी कधी त्याना विचारावेसे वाटते की ‘काय हो,तुम्ही आधीच्या पक्षात असताना जे बोलायचात त्याचे व्हिडिओ आता पाहताना तुम्हाला स्वत:चीच लाज वाटत नाही का? की तेव्हापेक्षा आता किती सफाईदार बोलता याबद्दल तुम्ही स्वत:ची पाठ थोपटून घेता? झुगारलेल्या निष्ठांबद्दल तुम्हाला थोडाही पश्चात्ताप होत नाही का?”जितीन प्रसाद भाजपत का गेले याविषयी माध्यमात भरभरून बातम्या येतील. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे : राजकारण नेमके कशासाठी असते? - जितीन जे देईल ते उत्तर बरोबर नसेल्, हे नक्की !

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेShashi Tharoorशशी थरूर