राजापेक्षा राजनिष्ठ !

By Admin | Updated: April 26, 2015 23:11 IST2015-04-26T23:11:41+5:302015-04-26T23:11:41+5:30

लोकशाहीत सारे समान असतात, पण काही अधिक समान असतात’ हे जॉर्ज आॅरवेलचे सुभाषित सारेच जाणतात. या सुभाषिताचे देशीकरण करताना बहुधा

Political than Raj! | राजापेक्षा राजनिष्ठ !

राजापेक्षा राजनिष्ठ !

लोकशाहीत सारे समान असतात, पण काही अधिक समान असतात’ हे जॉर्ज आॅरवेलचे सुभाषित सारेच जाणतात. या सुभाषिताचे देशीकरण करताना बहुधा ‘अधिक समान’चा आधी असमान आणि नंतर त्याचाच पुढे असामान्य असा अपभ्रंश झाला असावा. हिन्दीत त्यालाच अतिविशिष्ट म्हणूनही संबोधले जाऊ लागले, पण हिन्दी असो की मराठी, समोरच्यावर छाप पडत नाही आणि दबदबाही निर्माण होत नाही. त्यामुळे ‘व्हीआयपी’ अशी संज्ञा शोधली गेली असावी. कालांतराने समान कमी आणि अधिक समान जास्त असे होऊ लागले. मग एक शक्कल निघाली. एक जास्तीचा व्ही जोडून व्हीव्हीआयपी म्हणायचे. तरीही स्थिती काही आटोक्यात येईना. हळूचकन मग आणखी एका व्हीची भर पडली. व्हीव्हीव्हीआयपी! पण समान किंवा सामान्य कोण आणि एक ते तीन व्हीवाले आयपी कोण, याच्या व्याख्या काही कोणी ठरवल्या नाहीत. त्यामुळे झाले काय की, प्रत्येकजणच स्वत:ला तीन व्ही आयपी समजू लागला. त्याचीच मग एक संस्कृती तयार झाली. संस्कृती कसली, तो तर एक संसर्गजन्य रोगच म्हणायचा! आम्ही रांगेत उभे राहणार नाही. आम्ही टोलसकट कोणतेही कर भरणार नाही. विमान प्रवासाच्या वेळी आमच्या सामानाची तपासणी आणि आमची स्वत:ची अंगझडती घेऊ देणार नाही. इतरांसाठी भले विमान प्रवासात ज्वालाग्राही पदार्थ नेण्याची बंदी असेल, पण अशी बंदी आम्हाला लागू होणार नाही. आम्ही मंत्री असू तर आम्ही अंथरुणातून बाहेर यायच्या आतच, आम्ही जिथे कुठे जाणार असू, तिथले रस्ते पूर्ण मोकळे झाले पाहिजेत. त्या रस्त्यांवर ठायी ठायी पोलीस उभे केले पाहिजेत. अशा एक ना अनेक तऱ्हा. या तऱ्हा पुन्हा मग तथाकथित अतिविशिष्ट समजल्या जाणाऱ्या लोकांनाच लागू पडतील असे नाही. तर त्यांचे सगेसोयरे आणि गणगोत यांनाही त्या लागू पडू लागल्या. आणि बऱ्याचदा, एकवेळ तो खुद्द व्हीव्हीव्हीआयपी परवडला पण त्याचा सगासंबंधी नको, असाही प्रकार घडू लागला. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नेमका असाच काहीसा प्रकार घडला. छत्तीसगडच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या कोणा नातलगाला म्हणे रेल्वेने प्रवास करायचा होता. खरे तर अतिविशिष्ट व्यक्तीचा दर्जा असलाच तर तो मुख्य न्यायाधीशांना, नातलगाला नव्हे. तरीही या नातलगाला व्हीआयपी कोट्यातून रेल्वेचे आरक्षण मिळावे असा अर्ज केला गेला. पण सध्या रेल्वे गाड्यांना गर्दी असल्याने असेल किंवा अन्य काही कारणाने असेल, नातलग व्हीआयपीला अपेक्षित आरक्षण काही मिळाले नाही. खरे तर यात काही नवल घडले असे नाही. पण सरकारी नोकरांमध्ये राजापेक्षा राजनिष्ठ असणारे म्हणजेच व्यावहारिक भाषेत लांगुलचालनात तरबेज असलेले अनेक लोक असतात, त्या श्रेणीतील एका छोट्या न्यायाधीशाच्या ही बाब अत्यंत जिव्हारी लागली. मुख्य न्यायाधीशांच्या नातलगाला राखीव कोट्यातून आरक्षण मिळत नाही, म्हणजे काय? या न्यायाधीशाने थेट रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला एक नोटीस जारी करून घडल्या प्रकाराचा चक्क जाब विचारला. हे का, कसे आणि कोणामुळे घडले याचे उत्तर तर या नोेटिसीद्वारे मागितले गेलेच, पण नातलगाला ज्या रेल्वेचे आरक्षण राखीव कोट्यातून हवे होते, त्या रेल्वेत राखीव कोट्यात कोणाकोणाला आरक्षण दिले गेले, याची यादीही मागवली गेली. झाल्या प्रकाराने उच्च न्यायालयाने तीव्र खेद आणि नापसंती व्यक्त केली असल्याची पुस्तीदेखील या नोटिसीत जोडली गेली. आता इतक्या कडक नोटिसीमुळे रेल्वेच्या अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली नसती तरच नवल होते. पण कसे कोण जाणे हा प्रकार माध्यमांपर्यंत पोहोचता झाला. आणि मग रेल्वे अधिकाऱ्यांची नव्हे तर संबंधिंत न्यायाधीशाचीच घाबरगुंडी उडाली. त्याला उच्च न्यायालयाची चक्क माफी मागावी लागली. ज्या व्यक्तीसाठी आरक्षण मागितले गेले होते, ती व्यक्ती मुख्य न्यायाधीशांची नातलग नव्हती व ती मुख्य न्यायाधीशांच्या शपथविधीसाठी रायपूरला येण्यास निघाली नव्हती, येथपासून तो आपल्याला उच्च न्यायालयाकरवी काहीही सांगितले गेले नव्हते व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, तेव्हा आपल्या हातून चूक झाली असे लेखी पत्र या न्यायाधीशाने रेल्वेच्या त्याच अधिकाऱ्याला धाडले व त्याची प्रत उच्च न्यायालयाच्या प्रबंधांकडेही पाठविली. काहीशा विस्ताराने या प्रकाराचा परामर्ष घेण्याचा हेतू इतकाच की, अलीकडच्या काळात या व्हीआयपी संस्कृतीचा जनसामान्यांना होणारा जाच आणि ताप वृद्धिंगत होत चालला आहे. पण त्यातूनही अधिक उद्वेगजनक बाब म्हणजे आपल्या व्हीआयपी असण्याचा लोकाना होणारा त्रास त्यांनी सहन केलाच पाहिजे अशी मग्रुरीही वाढत चालली आहे. महाराष्ट्रात रोज लाखो लोक मोटारीने प्रवास करीत असतात व टोल नाक्यांवर तिष्ठत इंधन जाळीत असतात. पण त्यांचे असे तिष्ठणे कोणाच्या गावीही नसते. पण तेच एखादा सचिन तेंडुलकर अडकून पडतो, आपले अडकून पडणे सरकारला कळवितो आणि मग सरकारदेखील घायकुतीला येते, तेव्हा सामान्यांच्या वेळेला काही किंमत नसते पण तेंडुलकरचा प्रत्येक सेकंद लाख नव्हे, कोटी मोलाचा आहे. असेच आवर्जून दर्शवून दिले जाते. आता साऱ्यांनाच सचिन होणे, कसे जमावे?

Web Title: Political than Raj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.