नगरपालिकांत राजकीय इर्जिक
By Admin | Updated: November 10, 2016 00:18 IST2016-11-10T00:18:55+5:302016-11-10T00:18:55+5:30
नगर जिल्ह्यात पक्ष म्हणून कोणताही नेता बांधणी करायला तयार नाही.

नगरपालिकांत राजकीय इर्जिक
नगर जिल्ह्यात पक्ष म्हणून कोणताही नेता बांधणी करायला तयार नाही. विरोधी पक्षनेते एका पालिकेत भाजपासोबत प्रचार करणार, तर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या मतदारसंघातच राष्ट्रवादीचे चिन्ह हद्दपार झाले आहे.
थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांत सगळे पक्ष आपली ताकद अजमावतील. या निवडणुका ‘मिनी’ विधानसभेच्या धर्तीवर होतील, अशी शक्यता होती. पण, प्रत्यक्षात सगळेच पक्ष चाचपडत आहेत. युती झाली नाही तर वेगळे लढण्याची तयारी ठेवा, असा आदेश सेना-भाजपाने सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. नंतर युतीची घोषणा झाली. प्रत्यक्षात खाली वेगळेच चित्र आहे. दोन्ही कॉंगे्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला असल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना आपापली सोय पाहाण्याची मुभाच मिळाली आहे.
स्थानिक पातळीवर सगळाच सोयीचा मामला सुरु आहे. नगर जिल्ह्यातील राधाकृष्ण विखे राज्यात विरोधी पक्षनेते आहेत. ते राहुरी नगरपालिकेत भाजपासोबत आघाडी करतील अशी शक्यता आहे. तशा बैठकाही झाल्या आहेत. म्हणजे विखे यांच्या मतदारसंघातील राहाता व शिर्डी या पालिकांत विखे व भाजपा यांच्यात संघर्ष रंगणार, तर इकडे राहुरीत विखे-भाजपा एका व्यासपीठावर दिसणार.
श्रीरामपूर ही जिल्ह्यातील मोठी नगरपालिका आहे. या पालिकेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजपा व सेना यांची महाआघाडी झाली आहे. येथे नगराध्यक्षपदावरुन भाजपाने माघार घेत ही जागा राष्ट्रवादीला सोडली. माजी मंत्री गोविंदराव आदिक यांची कन्या येथे आता भाजपाच्या पाठिंब्याने लढते आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या मतदारसंघातील पाथर्डी पालिकेतही राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत नाही. तेथे हा पक्ष जगदंबा नावाच्या आघाडीत सामील झाला आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या स्वत:च्या मतदारसंघातच राष्ट्रवादीला आपल्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करता येणार नाही.
सेना-भाजपा सत्तेत आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पाच आमदार भाजपाकडे आहेत. एक खासदार आहे. राम शिंदे यांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रिपद आहे. मात्र, असे असतानाही स्थानिक पातळीवर आपली सत्ता येईल, ही खात्री या पक्षाला नाही. शिवसेनेतही तीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अगदी दोन्ही कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे धोरण या पक्षांना घ्यावे लागत आहे. दोन्ही कॉंग्रेसलाही आपले आहे ते स्थान टिकेल याची खात्री नाही. सर्वच पक्षांनी संघटन बांधणीकडे दुर्लक्ष करुन पक्ष स्थानिक नेत्यांच्या हवाली केले असल्याने अशी राजकीय इर्जिक करण्याची वेळ पक्षांवर आली आहे. पक्षीय ध्येयधोरणांपेक्षा आपला स्थानिक विरोधक कोण, हे बघितले जात आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवितानाही लोकांची व कार्यकर्ऱ्यांची मते घेण्यापेक्षा नेत्यांना सोयीची व्यक्ती कोण, हे पाहिले जात आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सामाजिक कार्यकर्ते अशा राजकीय चाकोरीबाहेरील व्यक्तिमत्त्वांना राजकारणात आणून उमेदवारी देण्याचा विचार याही निवडणुकीत अभावानेच झाला.
नगर जिल्हा पदवीधर निवडणुकीलाही सामोरा जात आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात नगरचा समावेश होतो. या मतदारसंघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे डॉ. सुधीर तांबे हे कॉंग्रेसकडून उमेदवारी करत आहेत. मात्र, नगर जिल्ह्यातून कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अथवा विखे गटाने त्यांच्यासाठी मतदारनोंदणी करण्याचे साधे आवाहनही केले नाही. तांबे हेही पक्षाऐवजी स्वत:ची यंत्रणा वापरुन ही निवडणूक लढत आहेत. तेच चित्र भाजपात आहे. भाजपाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांच्यासाठीही त्यांच्या पक्षाचे आमदार, नेते राबताना दिसत नाहीत. पक्षही या उमेदवाऱ्या बऱ्याचदा थेट वरुनच जाहीर करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही उमेदवार स्वीकारावे लागतात. पक्ष नावाची यंत्रणा यात कमजोर होऊन नेते बलवान होत आहेत.
- सुधीर लंके