पोलीस चोरांचा खेळ चाले...!
By Admin | Updated: April 22, 2017 04:19 IST2017-04-22T04:19:32+5:302017-04-22T04:19:32+5:30
चोरीचा तपास करणारे पोलीसच चोर बनल्याचे उघड झाल्याने पोलीस खात्याची बेअब्रू झाली आहे. आता याची चौकशी सीआयडी करीत आहे. पोलीस खात्याची विश्वासार्हताच पणाला लागली आहे.

पोलीस चोरांचा खेळ चाले...!
- वसंत भोसले
चोरीचा तपास करणारे पोलीसच चोर बनल्याचे उघड झाल्याने पोलीस खात्याची बेअब्रू झाली आहे. आता याची चौकशी सीआयडी करीत आहे. पोलीस खात्याची विश्वासार्हताच पणाला लागली आहे.
चोरीचा पैसा शोधता.. शोधता, शोधणाऱ्या पोलिसांनीच तब्बल नऊ कोटी रुपयांची चोरी केली. आता त्यांची चौकशी गुप्तचर खात्याचे पोलीस करू लागले तेव्हा चोरांनी तोंड लपवावे, तसे ते पोलीसच घरा-दारातील लोकांसह पळ काढून गेले आहेत. एखाद्या सिनेमात शोभून दिसावी, अशी ही स्टोरी आहे, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पोलिसांची !
सांगली जिल्ह्यातील मिरजेत मैनुद्दीन मुल्ला नामक एक गाडीचालक एका बारमध्ये बसला होता. दारूचे घोट घेत घेत मोबाइलवरून मोठेपणाच्या गप्पा मारत होता. आपण किती मोठी चोरी केली आहे, याचीच माहिती तो प्रेयसीला देत होता. शेजारीच एक पोलीस बसला होता. त्याच्या कानावर या गोष्टी पडत होत्या. त्याचा माग काढत पोलीस त्याच्या घरापर्यंत पोहचले, तेव्हा साडेतीन कोटींच्या नोटाच मिळाल्या. एका झोपडीत इतकी मोठी रक्कम सापडताच ही प्रचंड मोठी भानगड असणार, असे समजून काही पोलीस संगनमताने तपासाच्या नावाखाली पैशाचा शोध घेऊ लागले. मैनुद्दीन मुल्ला याच्या सांगण्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील एका फ्लॅटमधून हा सर्व पैसा चोरल्याचे पुढे आले. पोलिसांनी तेथेही छापा टाकला. दरम्यान, एका बांधकाम व्यावसायिकाने हा पैसा आपला असल्याचा दावा केला; पण हा दावा तीन कोटी अठरा लाखांचा होता. प्रत्यक्षात पोलिसांना या फ्लॅटमध्ये सुमारे चौदा कोटींच्या नोटा सापडल्या. हा सर्व गोंधळ होता. चोराचा पैसा, चोर पळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्या चोरांमध्ये तपास करणारे पोलीसही सामील झाले. तक्रारदाराच्या दाव्यानुसार मिळालेली रक्कम वगळून दोघा अधिकाऱ्यांसह सात पोलिसांनी नऊ कोटी अठरा लाख रुपये परस्पर गायबच केले. तक्रारदार सांगतो त्यापेक्षा कितीतरी पटीने ही रक्कम जादा असल्याने पोलिसांनाही आयतेच कोलीत मिळाले. चोरीचा माल असणार त्यामुळे कोणी विचारण्यास पुढे येणार नाही. तो आपणच खपविला तर? असाच विचार करून सात पोलिसांनी संगनमताने त्या पैशातून संपत्ती खरेदीचा सपाटा लावला. त्यातील काही पोलिसांनी हा पैसा स्वत:च्या खात्यावर भरला. काहींनी जमिनी खरेदी केल्या. कोणी घर खरेदी केले. शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाची चोरी करण्याचा हा प्रकार होता. सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलीस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांनी हा पराक्रम केला आहे.
चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार, मारामाऱ्या आदि प्रकरणांचा तपास करून अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देणारी ही पोलीस यंत्रणा आहे. त्यात अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी उत्तम काम करतात; पण त्यामध्ये असाही एक वर्ग आहे की, चोरी करणाऱ्यांनाच हाताशी धरून त्यात भागीदारी करण्याचा उद्योग करतात. असाच हा प्रकार झाला आहे. आता मूळ चोरी राहिली बाजूला. पोलिसांनी चोरीच्या तपासादरम्यान केलेल्या चोरीचा तपास करण्याची वेळ आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागावर आली आहे. मुळात ही इतकी मोठी रक्कम कोणाची आहे? मैनुद्दीन मुल्लासारख्या भुरट्या चोरास त्याचा पत्ता कसा लागला? इतकी मोठी रक्कम एका फ्लॅटमध्ये उघड्यावर कशी ठेवली गेली आणि हा भुरटा चोर कसा काय तिथे पोहोचला? यापेक्षा गमतीशीर भाग म्हणजे हा मैनुद्दीन मुल्ला हा मूळ चोर काही महिन्यांपासून गायब आहे. त्याला अटक झाली, जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारला; पण उच्च न्यायालयात त्याला जामीन मिळाला. तेव्हापासून तो कोठे आहे, कोणालाच माहीत नाही? इतक्या मोठ्या चोरीच्या प्रकरणातील या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न होत नाही, शिवाय त्याला फरारही घोषित करण्यात येत नाही. कारण पोलिसांनी लाटलेल्या प्रकरणात तोही नव्याने पुन्हा आरोपी आहे. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सात पोलिसांसह मुल्ला याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. सातही पोलिसांच्या घरांवर छापे टाकण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह पलायन केले आहे. ‘मैनुद्दीन मुल्ला की चोरी में, पोलीस की हिस्सेदारी’ म्हणायचे, की त्याच्या चोरीच्या आधारे पोलीसच चोराच्या भूमिकेत उतरले आहेत, असे म्हणायचे, हे कळत नाही.