क्रीडांगण ते कारागृह
By Admin | Updated: July 8, 2016 04:35 IST2016-07-08T04:35:36+5:302016-07-08T04:35:36+5:30
लिओनेल मेस्सी... आधुनिक फुटबॉल जगाचा सम्राट. स्पर्धा कोणतीही असो मेस्सी खेळत असताना कोणता तरी विक्रम होणारच ही काळ्या दगडावरची रेघ. नुकत्याच झालेल्या कोपा अमेरिका

क्रीडांगण ते कारागृह
लिओनेल मेस्सी... आधुनिक फुटबॉल जगाचा सम्राट. स्पर्धा कोणतीही असो मेस्सी खेळत असताना कोणता तरी विक्रम होणारच ही काळ्या दगडावरची रेघ. नुकत्याच झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीविरुध्द झालेल्या पराभवामुळे निराश झाल्यानंतर या २९ वर्षीय खेळाडूने निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेत फुटबॉल विश्वाला धक्का दिल्यानंतर, काही दिवसांनी करचुकवेगिरी प्रकरणी न्यायालयाने मेस्सीला धक्का देत २१ महिन्यांचा तुरुंगवास आणि तब्बल १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. फुटबॉल विश्वातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या मेस्सीकडून ही चूक कशी होऊ शकते, याचेच आश्चर्य सर्वसामान्य फुटबॉलप्रेमींना वाटते आहे. त्यामुळे कोटीकोटी डॉलर्सची कमाई करणारे खेळाडू कर भरण्यासाठी का कचरतात हाच प्रश्न सध्या क्रीडाप्रेमींना सतावत आहे. मेस्सीने याबाबत अजब युक्तिवाद केला आहे. तो म्हणतो, ‘मी केवळ फुटबॉलवर लक्ष केंद्रीत करीत असून माझे सर्व व्यावसायिक व्यवहार वडील जॉर्ज पाहातात.’ २००७ ते २००९ दरम्यान जाहिरातींद्वारे केलेल्या कमाईचा कर चुकविल्याचा आरोप मेस्सीवर आहे. एखादा करार करण्यापूर्वी हस्ताक्षर करण्याइतपत सक्षम असलेला मेस्सी कर चुकविताना मात्र ही जबाबदारी आपल्या वडिलांवर कशी टाकू शकतो, हाच मोठा प्रश्न. त्यामुळेच मेस्सीचे वडिल जॉर्ज यांनाही तेवढीच शिक्षा झाली. दुसरीकडे धावपटू ‘ब्लेड रनर’ आॅस्कर पिस्टोरीयस पुन्हा एकदा चर्चेत आला. तीन वर्षांपूर्वी आपल्याच प्रेयसीची हत्त्या केल्या प्रकरणी त्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. पिस्टोरीयसने म्हटले की, ‘माझ्या घरात अनोळखी व्यक्ती शिरल्याचे समजून मी प्रेयसी रिवा स्टीनकँपवर गोळी झाडली.’ पॅरालाम्पिकमध्ये पदक पटकावून हिरो झालेल्या पिस्टोरियसची प्रतिमा या प्रसंगानंतर आणखी खराब झाली. या दोन्ही प्रकरणांमुळे सध्या जागतिक क्रीडाक्षेत्र ढवळून निघाले आहे. ज्या खेळाडूंना आपण आदर्श मानतो, तेच खेळाडू जेव्हा कायद्याचे गुन्हेगार ठरतात, त्यावेळी त्या खेळाडूंसोबतच त्या खेळाचीही प्रतिमा डागाळली जाते. त्यामुळेच युवा व नवोदित खेळाडूंसाठी या ‘स्टार्स’कडून मिळालेला हा धडा यासाठी आहे की, पैसा कमावणे गैर नसले तरी कमावलेल्या पैशासोबत येणाऱ्या कायदेशीर जबाबदाऱ्या टाळणे आणि स्वत:ला कायद्यापेक्षा मोठा आणि महान मानणे नि:संशय गैर आहे.