पिस्तूलवाले मंत्री, तलवारम्यान विरोधक

By Admin | Updated: April 6, 2015 05:22 IST2015-04-05T23:18:43+5:302015-04-06T05:22:44+5:30

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर कार्यक्रमात पिस्तूल कमरेला लावून भाषण दिले. पिस्तूल बाळगल्याचे त्यांनी अन् विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र

The pistol minister, the opponent during the swords | पिस्तूलवाले मंत्री, तलवारम्यान विरोधक

पिस्तूलवाले मंत्री, तलवारम्यान विरोधक

यदु जोशी -
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर कार्यक्रमात पिस्तूल कमरेला लावून भाषण दिले. पिस्तूल बाळगल्याचे त्यांनी अन् विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले. क्षणभर वाटले आपण बिहारमध्येच राहतोय. महाराष्ट्राचे मंत्री असे खुलेआम पिस्तूल घेऊन फिरत असताना, विरोधक मात्र विधिमंडळात या विषयावर काही मिनिटांचा गोंधळ घालून चूप बसले. गिरीश महाजन, रणजित पाटील अशा दोनचार मंत्र्यांना घरी बसविता येईल एवढा दारूगोळा विरोधकांकडे असूनही ते का बोलत नाहीत? भाजपा-शिवसेनेची सत्ता असताना आर. आर. पाटील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून एकमेकांविरुद्धची प्रकरणे आणायचे. आताच्या विरोधकांनी थोडं खोदकाम केलं तरी त्यांना मुद्दे मिळतील. पण तशी कोणाची तयारी नाही. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात झालेला सभात्याग हा जेवणानंतर बाहेर पान खाऊन येण्यासारखा वाटतो. छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी विरोधकांची थोडी लाज राखली आहे. पण या सरकारला विरोध करण्यात राष्ट्रवादीला एकूणच मर्यादा आहेत. ‘सरकारचं काम चालू देणार नाही’ असा एकेकाळचा भुजबळांचा आवाज आज राहिलेला नाही.
खाली सुरू झाली
गाठीभेटी संस्कृती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केले आहे. त्यांचा कित्ता इतर मंत्र्यांनीही गिरविला. एका ज्येष्ठ मंत्र्याने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सचिवांना दिले, पण ‘अशी बदली करताना आपल्याशी चर्चा करावी’, अशी मेख घालून ठेवली हा भाग वेगळा. मात्र, बहुतेक विभागांत झालेल्या अधिकारांच्या या विकेंद्रीकरणामुळे मंत्रालयातील गाठीभेटी संस्कृती आणि ‘अर्थ’पूर्ण व्यवहारांना बराचसा आळा बसला आहे. मात्र, बदल्यांचे अधिकार सचिव आणि विभागप्रमुखांना दिल्याने आता गाठीभेटी संस्कृती आणि ‘अर्थ’पूर्ण व्यवहार खाली सुरू झालेत. या दृष्टीने नगररचना विभागाचे उदाहरण प्रामुख्याने दिले जात आहे. या विभागाच्या प्रमुखांना एकेकाळी ‘अँटी करप्शन’ने पकडले होते. ते आता बदल्या करीत आहेत. वरची संस्कृती आटून ती खाली झिरपत असेल तर विकेंद्रीकरणाचा फायदा काय झाला?
कसं काय पाटील...?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडे विधी व न्याय विभागाचे अवर सचिव मिलिंद कदम याला लाचखोरीच्या प्रकरणात पकडून दिले. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे कार्यालय यानिमित्ताने संशयाच्या भोवऱ्यात सापडले. कारण, कदम आधी उसनवारीवर त्यांच्या कार्यालयात होता आणि नंतरही नियमित ब्रीफिंगसाठी तो पाटलांच्या कार्यालयात जायचा. तशा बातम्या चॅनेलवर सुरू होताच पाटील यांनी हात वर करणारा खुलासा केला. संपत्ती, अपत्याच्या मुद्द्यावरून पाटील आधीच अडचणीत आलेले असताना, कदमचा संबंध त्यांच्या कार्यालयाशी जोडला जाणे ही बाब त्यांची डोकेदुखी वाढविणारी आहे. पाटील ‘तसे’ नसतीलही; पण त्यांच्या कार्यालयात कोण काय दिवे (दीपक) लावतेय ते बघण्याची जबाबदारी त्यांचीच आहे.
हुजूर आएंगे तो सात बजेंगे
नागपूरचे एक पोलीस आयुक्त होते. ते परेडसाठी पोलीस ग्राऊंडवर रोज सकाळी सातच्या ठोक्याला हजर असायचे. गार्डने सात वाजताचा टोल वाजवायचा आणि सीपींनी ग्राउंडवर त्याचक्षणी पाय ठेवायचा इतके अचूक टायमिंग साधायचे. एकदा सीपी साहेब सव्वासातला पोहोचले आणि त्याचक्षणी गार्डने सात वाजले म्हणून टोल वाजवायला सुरुवात केली. परेडनंतर एका पोलीस अधिकाऱ्याने गार्डला विचारले, सीपी साहेब तर सव्वासातला आले तरी तू सातचाच टोल कसा काय वाजवला? त्याने मार्मिक उत्तर दिले, ‘हुजूर आते है तबही सात बजते है’. हा किस्सा आठवण्याचे कारण म्हणजे आयपीएस अधिकाऱ्यांच्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या बदल्या. त्या कधी होणार, हा पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रचंड औत्सुक्याचा विषय आहे. त्याचं उत्तर गृह विभागाच्या मानसिकतेतूनच द्यायचे तर एवढेच, ‘जब हुजूर (सीएम) सोचेंगे तब तबादले होंगे.
ता.क.- मुख्यमंत्री महोदय! आपण विधी व न्याय विभागातील लाचखोर अधिकाऱ्याला पकडून दिले. म्हाडा, एसआरएमध्ये असलेल्या कोट्यधीश बिल्डर अधिकाऱ्यांना कधी पकडणार?

Web Title: The pistol minister, the opponent during the swords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.