तत्वचिंतन- सृजन आणि प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 05:16 IST2016-11-17T05:16:55+5:302016-11-17T05:16:55+5:30
प्रश्न उभा राहणे, प्रश्न पडणे आणि तो सोडविणे हे प्रगत आणि सुसंस्कृत मानवी जीवनाचे लक्षण ठरते. विश्वाचे रहस्य शोधताना ऋषीमुनींपुढे

तत्वचिंतन- सृजन आणि प्रश्न
प्रश्न उभा राहणे, प्रश्न पडणे आणि तो सोडविणे हे प्रगत आणि सुसंस्कृत मानवी जीवनाचे लक्षण ठरते. विश्वाचे रहस्य शोधताना ऋषीमुनींपुढे आणि तत्वचिंतकांपुढे प्रश्न उभा राहिला आणि त्यातूनच तत्वज्ञानाचाही जन्म झाला. भारतीय तत्वदर्शनात वेद, उपनिषदे, आणि भगवद्गीता यांना अनन्यसाधारण महत्व आहे.
सनपूर्व १२०० ते ६०० हा उपनिषदांचा कालखंड म्हणून मानला जातो. उपनिषदे ही वेदांचे ज्ञानकांड असल्यामुळे त्यांना ब्रह्मविद्या असेही म्हणतात. ब्रह्मविद्या हीच पराविद्या किंवा श्रेष्ठविद्या होय. बृहदारण्यक व धांदोग्य ही उपनिषदे सर्वात प्राचीन आहेत तर प्रश्नोपनिषद हे सर्वात अर्वाचिन होय. ब्रह्म हे अंतिम सत्य असून ते त्रिकालाबाधीत आहे. अंतिम वस्तुसत्याचे ज्ञान हेच जीवाचे परमसाध्य आहे असे मानताना उपनिषदांनीही प्रथम प्रश्न विचारला की,
कस्मिन्नु खलु भगवो
विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवति।
ज्याचे ज्ञान झाले असता बाकी सर्व गोष्टींचे ज्ञान होते, असे तत्व कोणते? आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता उपनिषदांना अंतिम सत्याचा शोध लागला आणि त्या सत्याच्या अनुभूतीने जग प्रकाशमान झाले.
मनातील संभ्रमावस्था एकीकडे हळूहळू नाहिशी होत असताना आणि ज्ञानाची एक एक अवस्था गाठत असताना गीतेच्या सातव्या अध्यायापर्यंत विचारांची प्रगल्भता प्राप्त झालेल्या अर्जुनाने गीतेच्या आठव्या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंताला प्रश्न केला,
किं तद् ब्रह्म किं अध्यात्मं...हे पुरुषोत्तमा ब्रह्म म्हणजे काय? कर्म कशाचे नाव आहे? अध्यात्म कशाला म्हणतात आणि अधिभूत व अधिदैव म्हणजे काय? हे मला स्पष्ट करून सांगा. खरे तर अर्जुनाच्या मनात असा प्रश्न निर्माण होणे हेच भगवंताच्या गीता कथनाचे सार आहे. अर्जुनाचा हा प्रश्न केवळ अर्जुनाचा नव्हता तर जगातील सर्व तत्वचिंतकांच्या मनातील तो प्रश्न होता. आणि सूत्रात विचारलेल्या या प्रश्नाचे भगवान श्रीकृष्ण सूत्रातच उत्तर देतात,‘अक्षरं ब्रह्म परमं.’ जे परम अविनाशी आहे तेच ब्रह्म आणि त्या ब्रह्माची स्वरुपस्थिती म्हणजे अध्यात्म. ब्रह्म आणि अध्यात्म याची एवढी सोपी व्याख्या सांगून तत्ववेत्त्यांबरोबर सामान्यांनाही ब्रह्म संकल्पनेचा केवढा बोध भगवंत देतात. अध्यात्मतत्वाचा हा वैश्विक सिद्धांत अर्जुनाच्या एका प्रश्नातून उभा राहिला आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
महाकवी रवींद्रनाथांनाही सर्जनाचे अगम्य गूढ उकलताना प्रश्न पडला आणि विश्वरचनेची तसेच त्यातून प्रगटलेल्या चैतन्याची खरी जाणीव त्यांना झाली. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या ‘अचिंत्यभेदाभेदाचा’ प्रश्न आणि त्याचे उत्तर त्यांनी गीतांजलीतील एक रचनेत व्यक्त केले आहे.
-डॉ. रामचंद्र देखणे